News Flash

नवदेशांचा उदयास्त : काँगो : स्वातंत्र्य आणि संहार

१९९६ ते २००३ या काळात डीआर काँगोमध्ये दोन युद्धे झाली. या युद्धांत मोठा मानवी संहार झाला.

३० जून १९६० रोजी बेल्जियमकडून स्वातंत्र्य मिळवून अस्तित्वात आलेल्या सार्वभौम काँगोचे पहिले पंतप्रधान म्हणून पॅट्रिक लुमुम्बा यांची निवड झाली. या ‘रिपब्लिक ऑफ काँगो’ला लागूनच असलेल्या शेजारी देशाचे नावसुद्धा ‘रिपब्लिक ऑफ काँगो’ असल्यामुळे या नवजात काँगोला त्याच्या किन्शासा या राजधानीमुळे ‘काँगो-किन्शासा’ या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे १९६४ साली येथील राज्यव्यवस्थेत बदल होऊन ते लोकशाही प्रजासत्ताक काँगो म्हणजे ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो’ झाल्यावर हा देश ‘डीआर काँगो’ या नावाने ओळखला जाऊ लागला.

लुमुम्बा यांचे सरकार सत्तेवर आले, परंतु दोनच महिन्यांत काही प्रांतीय नेत्यांनी लुमुम्बा सरकारविरोधात उठाव केला. या उठावामुळे निर्माण झालेल्या अस्थैर्य आणि गोंधळात लुमुम्बा सरकार बरखास्त झालेच, पण लुमुम्बा यांची हत्याही केली गेली. पुढे १९६५ ते १९९७ या काळात लष्करी अधिकारी जोसेफ मोबुटु याचे सरकार डीआर काँगोमध्ये सत्तेवर होते. शीतयुद्ध काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या महासत्तांकडून मोबुटु सरकार आणि त्याविरोधी बंडखोरांनाही मदत होती. त्यामुळे डीआर काँगोत एकापाठोपाठ यादवी युद्धांची धुमश्चक्री चालूच होती. या यादवीत सुमारे एक लाख लोकांचा बळी गेला असावा. १९७१ ते १९९७ या काळात डीआर काँगोचे नाव मोबुटु सरकारने बदलून ‘रिपब्लिक ऑफ झैरे’ असे केले होते.

१९९६ ते २००३ या काळात डीआर काँगोमध्ये दोन युद्धे झाली. या युद्धांत मोठा मानवी संहार झाला. या युद्धांनी संपूर्ण देश उद्ध्वस्त करून टाकला. शेजारच्या रवांडा या देशातल्या सरकारच्या दडपशाही कारभारामुळे आणि अतिरेक्यांच्या कारवायांमुळे तिथले लाखो लोक काँगोमध्ये आले. या आश्रितांपाठोपाठ घुसलेले रवांडाचे सैन्य आणि काँगोचे सैन्य यांतही युद्धे सुरू झाली. पण पुढे या युद्धांमध्ये एकूण नऊ आफ्रिकी देश आणि २४ सशस्त्र संघटना यांचा सहभाग होऊन सुमारे ५४ लाख लोक मारले गेले. १९९७ मध्ये काँगोच्या अध्यक्षपदावर आलेल्या लॉरेन्ट काबिला यांचा २००१ मध्ये खून झाल्यावर त्यांचा मुलगा जोसेफ काबिला अध्यक्षपदी आला. दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगातले सर्वाधिक संहारक युद्ध असे काँगोतील या दोन युद्धांचे वर्णन केले जाते.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 2:27 am

Web Title: republic of the congo zws 70
Next Stories
1 नवदेशांचा उदयास्त : काँगोची स्वातंत्र्याकडे वाटचाल
2 कुतूहल : आदर्श गणिताचार्य महावीर
3 नवदेशांचा उदयास्त : बेल्जियन काँगो
Just Now!
X