सुनीत पोतनीस

अ‍ॅनोफेलिस या जातीचे डास मलेरिया म्हणजे हिवतापाच्या जंतूंचे वहन करतात आणि त्यामुळेच त्या आजाराचा फैलाव होतो हे संशोधनांती सिद्ध करणारे ब्रिटिश डॉक्टर रोनाल्ड रॉस हे १८८१ साली बंगलोर येथे, इंडियन मेडिकल सíव्हसेसमध्ये गॅरिसन सर्जन या हुद्दय़ावर रुजू झाले. त्या काळात डासवाहक आजारांवर संशोधन अनेक ठिकाणी चालू होते. पीतज्वर, हत्तीरोग हे डासवाहक रोग असल्याचे सिद्ध झाले होते, परंतु मलेरियाबाबत संशोधनात विशेष प्रगती झाली नव्हती. त्यामुळे रोनाल्ड यांनी डास आणि मलेरिया हा आपला अभ्यासाचा विषय बनवला. १८८८ मध्ये रोनाल्ड वर्षभर लंडनमध्ये राहिले आणि त्यांनी तिथे सार्वजनिक आरोग्य आणि जिवाणूशास्त्रातील एक अभ्यासक्रम पुरा केला.

भारतात परतल्यावर त्यांची नियुक्ती सिकंदराबादेतील लष्करी तळावर लष्करी सर्जन म्हणून झाली. इथे त्यांनी डासांबद्दल संशोधन करण्यासाठी शोधपथके नेमली. ही पथके हैदराबाद, सिकंदराबादच्या विविध भागांमधून डासांचे नमुने गोळा करून आणत आणि रोनाल्ड त्यांचे विच्छेदन करून माहितीची नोंद करीत. तीन-चार वर्षांच्या संशोधनानंतर काहीही निष्कर्ष निघाला नाही, परंतु १८९७ साली रोनाल्डकडे हिवतापग्रस्त रुग्णांवर पोसलेले डास एका बाटलीत घालून एकाने आणून दिले. त्यातील काही डास अ‍ॅनोफेलिस जातीचे होते. सूक्ष्मदíशकेखाली या डासांचे विच्छेदन करताना त्यांच्या पोटात काही जिवाणू सापडले.  संशोधन केल्यावर हेच ते मलेरिया ऊर्फ हिवतापाचे जिवाणू असे सिद्ध झाले. १९९८ साली रोनाल्ड यांची बदली कलकत्त्यास झाली. तिथे ‘काली बिमारी’ या रोगावर संशोधन करण्याची सूचना सरकारने केली. परंतु रोनाल्ड यांना मलेरियाच्या जिवाणूंचा मानवी शरीरात शिरकाव झाल्यावर होणाऱ्या क्रिया आणि परिणामांवर संशोधन करावयाचे होते, म्हणून राजीनामा देऊन ते इंग्लंडमधील लिव्हरपूल येथील, इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेत दाखल झाले.  मलेरियासंबंधी संशोधनाबद्दल रोनाल्ड रॉसना १९०२ साली  नोबेल पारितोषिक मिळाले. १९३२ मध्ये लंडन येथेच त्यांचा मृत्यू झाला.

sunitpotnis@rediffmail.com