प्रतिजन आणि प्रतिपिंडे हे आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीचे प्रतिकात्मक वर्णन करणारे दोन शब्द आहेत. प्रतिजनांत जिवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस), विषद्रव्ये (टॉक्सिन), शरीराच्या संपर्कात येणाऱ्या बाहेरील पेशी, अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. असे प्रतिजन (अँटिजेन) शरीरात शिरल्यानंतर त्यांच्या प्रतिकारार्थ प्रतिपिंडांची (अँटिबॉडी) निर्मिती होते. या प्रतिजन व प्रतिपिंडांवरील संशोधनाची सुरुवात, १८९० सालाच्या सुमारास जर्मनीच्या एमिल फॉन बेहरिंगने केलेल्या संशोधनातून झाली. घटसर्प झाल्यावर शरीरात विशिष्ट विषद्रव्ये निर्माण होतात. बेहरिंगने ही विषद्रव्ये गिनी पिगना टोचून त्यांना घटसर्पाची लागण घडवली. त्यानंतर ज्या प्राण्यांना पूर्वी घटसर्प झाला होता, त्या प्राण्यांचा रक्तद्रव (सिरम) त्याने या गिनी पिगना टोचला. त्यामुळे गिनी पिगना झालेला घटसर्प बरा झाला. त्यानंतर त्याने हेच प्रयोग माणसांवर करून त्यांचा घटसर्प बरा केला. बेहरिंगच्या या संशोधनाने प्राण्याच्या शरीरात विषद्रव्याचा उद्भव झाल्यास, त्या व्याधीविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचे दाखवून दिले.

जर्मनीच्या पाऊल एहर्लिशला विषद्रव्यांविरुद्धची ही प्रतिकारशक्ती कशी निर्माण होते याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. यावर त्याने १८९०च्या दशकात प्रयोग हाती घेतले. विषद्रव्याचा परिणाम अभ्यासण्यासाठी त्याने एरंडाच्या बियांतील रिसिन हे विषद्रव्य उंदरांना टोचले. प्रथम या उंदरांना रिसिनची अत्यंत कमी मात्रा दिली आणि नंतर ती वाढवत नेली. एरवी उंदरांना मारण्यासाठी या द्रव्याची छोटी मात्रा पुरते. परंतु वाढत्या मात्रेनंतर, या प्रयोगातील उंदीर पुढे रिसिनची शेकडोपट तीव्र मात्रा पचवू शकले. या मात्रेमुळे उंदरांच्या प्रतिकारशक्तीत बदल घडत असल्याची एहर्लिशला कल्पना आली. त्यानंतर ही प्रतिकारशक्ती केवळ रिसिनपुरतीच मर्यादित आहे का हे पाहण्यासाठी, त्याने याच उंदरांना अ‍ॅब्रिन हे दुसरे विषद्रव्य टोचले. अ‍ॅब्रिनच्या छोटय़ा मात्रेतच हे उंदीर मृत्युमुखी पडले. त्यामुळे एका विषद्रव्यामुळे झालेली प्रतिकारशक्ती ही त्या विषद्रव्यापुरतीच मर्यादित असल्याचे सिद्ध झाले. एहर्लिशच्या मते, शरीरातील पेशी या विषद्रव्यांना बांधून ठेवण्यासाठी साखळीच्या स्वरूपातील प्रतिविषद्रव्ये निर्माण करत असाव्यात. एहर्लिशच्या या साखळी सिद्धांताला फारसा पाठिंबा मिळाला नाही. परंतु विषद्रव्यांना धरून ठेवणारी ही प्रतिविषद्रव्ये (प्रतिपिंडे) म्हणजे, विषद्रव्यांच्या प्रतिकारार्थ निर्माण होत असलेली विशिष्ट प्रकारची प्रथिनेच असल्याचे १९६० सालाच्या सुमारास सिद्ध झाले.

डॉ. रमेश महाजन

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org