इसवी सन १८००च्या सुमारास, विल्यम हाइड वॉलस्टन नावाचा रसायनशास्त्रज्ञ आपल्या प्रयोगशाळेत प्लॅटिनमच्या खनिजांवर संशोधन करत होता. अनेक रासायनिक अभिक्रिया करून बघत होता. आणि अचानक सुरेख गुलाबी- गुलाबाच्या रंगाचं, पण चकाकणारं एक संयुग तयार झालं. वॉलस्टनने या संयुगाचा सखोल अभ्यास केला आणि १८०३ साली त्याला एका नवीन मूलद्रव्याचा शोध लागला. ग्रीक भाषेत गुलाबाला ‘ऱ्होडॉन’ म्हणतात, म्हणून या मुलद्रव्याला ‘ऱ्होडिअम’ असं नाव दिल गेलं. प्लॅटिनमच्या कुटुंबातलं हे आणखी एक मूलद्रव्य!

प्लॅटिनमच्या कुटुंबात प्लॅटिनम धरून एकूण सहा मंडळी! रुथेनिअम, पॅलॅडिअम, ऑस्मिअम आणि इरिडीअम हे प्लॅटिनमच्या कुटुंबातले आणखी इतर चार जण! या सर्वाचे रासायनिक आणि भौतिक दोनही गुणधर्म बरेचसे सारखे! सारे जण चकचकीत चांदीसारखे पांढरे! सुरुवातीला आढळलेलं ‘ऱ्होडिअम’चं संयुग जरी गुलाबी रंगाचं असलं तरी शुद्ध ‘ऱ्होडिअम’ चकचकीत शुभ्रच! आणि ‘ऱ्होडिअम’चं संयुग जरी सापडलं असलं तरी ‘ऱ्होडिअम’ हे मूलद्रव्य सहसा कुठलीही रासायनिक अभिक्रिया ‘न’ करणारं! ‘ऱ्होडिअम’वर कोणत्याही तीव्र आम्लाची क्रिया होत नाही. खूप तापवलं तर ते हळूहळू ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया करतं. खूप जास्त तापमानाला क्लोरीन किंवा ब्रोमिनबरोबर रासायनिक अभिक्रिया करणार ‘ऱ्होडिअम’, फ्लुओरिनबरोबर मात्र अजिबात क्रिया करत नाही. पृथ्वीच्या पाठीवर ‘ऱ्होडिअम’चा आढळही खूप कमी म्हणजे अगदी अतिदुर्मीळ म्हणावा एवढा! प्रति दशलक्ष भागात ०.०००१ भाग एवढय़ा कमी प्रमाणात ‘ऱ्होडिअम’ सापडतं!

‘ऱ्होडिअम’चं आवर्तसारणीतलं स्थानही खास आहे. अणुक्रमांक ४५ असलेलं हे मूलद्रव्य आवर्तसारणीच्या अगदी मध्यभागी (पाचव्या आवर्तनात आणि नवव्या गणात) आहे. प्लॅटिनमच्या कुटुंबातलं ‘ऱ्होडिअम’ तसं बघायला गेलं तर चांदी, सोनं यांसारख्या ‘मौल्यवान’ धातूंच्याही यादीतलं! किंबहुना ‘ऱ्होडिअम’ हे चांदी आणि सोनं यापेक्षाही मौल्यवान आहे. म्हणूनच तर एखाद्याच्या असामान्य कर्तृत्वाचा गौरव करायला जेव्हा चांदी, सोनंही कमी वाटायला लागतात; तेव्हा ‘ऱ्होडिअम’चं मानचिन्ह देऊ केलं जातं.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org