भारतीय शास्त्रज्ञांनी सुमारे ६० वर्षांपूर्वीच ओळखले होते की, भाताच्या खाचरात जर नीलहरितशैवाले वाढत असतील तर अशा पिकापासून अधिक उत्पन्न मिळते. याची कारणमीमांसा म्हणून प्रस्तुत लेखकाने असा विचार मांडला की, भातखाचरात नीलहरितशैवालांची हरितशैवालांबरोबर स्पर्धा चालते. भातपिकाची पाने आणि हरितशैवाले या दोन्हींमध्ये प्रकाशसंश्लेषणासाठी क्लोरोफिल अ आणि ब हीच रंगद्रव्ये असल्याने भातपिकाच्या सावलीत हरितशैवाले चांगली वाढू शकत नाहीत. नीलहरितशैवालांमधील प्रकाशसंश्लेषणाचे रंगद्रव्य भिन्न असल्याने ती भाताच्या पर्णसंभाराखालीही प्रकाशसंश्लेषण करू शकतात. त्यामुळे भातपिकाची वाढ चांगली होणे हे नीलहरितशैवालांच्या फायद्याचे ठरते. नीलहरितशैवाले हवेतल्या नट्रोजनचे स्थिरीकरण करू शकतात आणि अधिक वाढ झालेल्या भातपिकातही अधिक नट्रोजन आढळून आल्याने नीलहरितशैवाले भातपिकाला नट्रोजन पुरवतात असाही निष्कर्ष त्या वेळी काढला होता, पण तो चुकीचा असावा असे प्रस्तुत लेखकाला वाटते, कारण त्याने केलेल्या प्रयोगात असे दिसून आले की, नीलहरितशैवाले वृद्धिजनक संप्रेरक पाण्यात सोडतात आणि त्यामुळे केवळ भातपिकाचीच नाही तर इतर वनस्पतींचीही वाढ अधिक चांगल्या प्रकारे होते. अन्य वृद्धिजनक संप्रेरकांवर प्रयोग करताना लक्षात आले होते की, वृद्धिजनक संप्रेरकांद्वारे पिकामध्ये घडून येणाऱ्या ज्यादा वाढीइतकी वाढ नट्रोजनयुक्त खतांद्वारे घडवून आणावयाची असेल तर आपल्याला त्या पिकाला प्रति हेक्टर ५० किलोग्राम नट्रोजन द्यावा लागेल. हवेतल्या नट्रोजनचे स्थिरीकरण करण्यास प्रचंड ऊर्जा खर्चावी लागते. त्यामुळे स्वत:ची ऊर्जा खर्चून निर्माण केलेले नट्रोजनयुक्त जैवरासायनिक खत भातपिकाला देण्याऐवजी तेच काम जर काही ग्रॅम संप्रेरकांद्वारे करता आले तर ते ऊर्जेच्या दृष्टीने खूपच काटकसरीचे ठरते. हवेतल्या नट्रोजनचे स्थिरीकरण करणाऱ्या अझेटोबॅक्टर या जिवाणूच्या बाबतीतही आता हीच गोष्ट लक्षात आली आहे की, या जिवाणूंमुळे वनस्पतींमध्ये घडून येणारी ज्यादा वाढ ही नट्रोजनमुळे नसून त्यांनी निर्माण केलेल्या वृद्धिजनक संप्रेरकांमुळे घडते. भारतीय शेतकरी वृद्धिजनक संप्रेरकांचा फारसा वापर करीत नाहीत, पण आजकालचे रासायनिक खतांचे भाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी संप्रेरकांचा वापर करावा, असे प्रस्तुत लेखकाचे मत आहे.

आजचे महाराष्ट्रसारस्वत        
२६ जानेवारी
१६१६ : मराठवाडय़ातील ‘प्रचंडकवी’ म्हणून नावाजले गेलेले दासोपंत दिगंबर देशपांडे यांचे देहावसान. त्यांचा अध्यात्माचा अभ्यास प्रचंड होता व ‘पासोडी’ या कापडी ग्रंथावर त्यांनी चित्रमय शैलीत आध्यात्मिक आशय मांडण्याचा प्रयोग केला. आंबेजोगाईत दासोपंतांच्या १६व्या पिढीने ही पासोडी आजही सांभाळली आहे.
१८९७ : पाश्चात्त्य लोकप्रिय साहित्य मराठीत आणणारे ‘परभृत सुशील’ ऊर्फ गंगाधर गोवर्धन कुंटे यांचा जन्म.
१९२६ : प्राचीन वैदिक व पौराणिक ग्रंथांचे भाषांतरकार गंगाधर वामन लेले यांचे निधन.
१९४८ : ‘कवी आनंद’ या नावाने मराठीत स्वतंत्र काव्यलेखन आणि इंग्रजी कविता, कादंबऱ्यांचे अनुवादही करणारे वि. ल. बर्वे यांचे निधन. कोकण व तेथील संस्कृती त्यांनी काव्यातून मांडली.  
१९६८ : लोकनायक बापूजी अणे तथा माधव श्रीहरी अणे यांचे निधन. ‘विदर्भाचे टिळक’ म्हणून गौरवले गेलेले स्वातंत्र्यसेनानी, खासदार व पुढे राज्यपाल असा त्यांचा राजकीय प्रवास होताच, परंतु ‘तिलक यशोर्णव’ हा संस्कृत चरित्रग्रंथ तसेच विपुल मराठी लेखन त्यांनी केले. ग्वाल्हेर येथील १९२८च्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
– संजय वझरेकर

वॉर अँड पीस 
दुबळेपणा
दुबळेपणा म्हणजे ओजक्षय. वेळेवर घेतलेल्या आहाराचे नीट पचन होऊन; रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र या धातूंचे क्रमाने पोषण झाले की शरीरात सर्वाचे परिणमन, ओजस्वरूपी तेजतत्त्व तयार होते. या ओजामुळे शरीर व मन दोन्हीही कितीही काम केले तरी थकत नाही. संकटे, शोक, आघात, श्रम, भीती हे सर्व ओजामुळे लांब राहतात. शरीराचा वर्ण काळा असला तरी शरीर तेज:पुंज दिसते. त्वचा स्निग्ध, डोळे तेजस्वी, नसानसात जोश भरलेला, उत्साही व प्रसन्न व्यक्तिमत्त्व ही ओज धातूची, प्राकृत वाढीची लक्षणे आहेत. या उलट ओजक्षयामुळे माणूस चटकन रागावतो, घाबरतो, शोक करतो, दीन, दु:खी, लीन असा होतो. त्याच्या मनात वेडेवाकडे विचार येतात. शरीरावरील त्वचा काळंवडते. डोळे खोल जातात.
दुबळेपणा म्हणजे संतती न होणे किंवा संभोगशक्ती नसणे किंवा शुक्राणू कमी असणे एवढाच मर्यादित अर्थ न घेता जीवनसंघर्ष दमदारपणे लढविता येतो की नाही हा विचार वैद्यकांत हवा. तसा विचार आयुर्वेदात आहे. याचा आम्हा सर्व वैद्यांना अभिमान आहे. दुबळेपणाच्या मूळ कारणांकडे लक्ष देऊन उपचार करावयास लागतात. मानसिक दुबळेपणा दूर होण्याकरिता ब्राह्मीवटी ६ गोळ्या, लघुसूतशेखर ३, चंद्रप्रभा ३ अशा दोन वेळा व सारस्वतारिष्ट दोन्ही जेवणानंतर ४ चमचे, झोपताना आस्कंद चूर्ण १ चमचा व निद्राकरवाटी ६ गोळ्या अशी योजना करावी. पुरुषांच्या शुक्राणू समस्येकरिता लक्ष्मीविलास व हिम्मत प्र. ३ गोळ्या, मधुमालिनी वसंत ६ गोळ्या, पुष्टीवटी १ गोळी असे दोन वेळा, पांडुता असल्यास चंद्रप्रभा व सुवर्णमाक्षिकादि वटी प्र. ३ गोळ्या वरील औषधांबरोबर द्यावे. शुक्राणूचे प्रमाण खूपच कमी असल्यास धात्री रसायन, अश्वगंधापाक, च्यवनप्राश, कुष्मांडपाक यातील एकाची निवड करावी. जंत, कृमी, मलावरोध, सर्दी, दमा अशा तक्रारी असल्यास खाल्लेले अंगी लागत नाही हे लक्षात घेऊन ती ती लक्षणे प्रथम समूळ नाहीशी करावी. स्त्रियांचे दुबळेपणाकरिता शतावरी, आस्कंद, भूईकोहळा, चोपचिनी व वाकेरी भाते असे मिश्रण उत्तम काम देते. स्त्रियांचा मासिक पाळीचा त्रास व मानसिक चिंता दूर करण्यावर भर द्यावा. शुभं भवतु।
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. 
स्वयंचलित शारीरिक संस्था आणि पातंजली
हृदय क्रिया, जठर आणि पचन, रक्तदाब वगैरे क्रिया मी स्वयंचलित आणि सार्वभौम म्हटल्या खऱ्या, परंतु जगात काहीही- अगदी संपूर्णपणे सार्वभौम नसते. आपण जे बघतो, ऐकते, अनुभवतो ते शेवटी मेंदूच्या साहाय्यानेच घडते. वाघ दिसला, तर माणूस पळू लागतो त्यामागची भीती मेंदूत खोलवर दडलेली असते. त्यामुळे आपल्याला पळून जाण्याचा हुकूम सुटतो; पण या पळण्यासाठी हृदयाचे स्पंदन वाढते. जास्त ठोके पडतात, आणि दर ठोका जास्त जोराचा असतो, कारण पळून जाण्यासाठी स्नायूंना जास्त रक्तपुरवठा लागतो. त्या वेळी शरीरातील स्वयंचलित संस्था मोठय़ा हुशारीने त्वचेचा रक्तप्रवाह स्नायूंकडे वळवतात. हल्लीच्या आधुनिक जगात आपण आपल्यामागे वाघ लागला आहे अशा तऱ्हेने दिवस काढतो आणि हे बस, आगगाडीने प्रवास करणाऱ्यांच्या बाबतीत खरे असते असे नाही. वातानुकूलित गाडीत प्रवास करणाऱ्यांचे वाघ निराळे असतात. त्यांचे उंचावलेले जीवनमान टिकवण्यासाठी तो माणूसही घायकुतीला येतो. या घायकुतीत शरीरातल्या स्वयंचलित संस्था बेजार होतात. शेवटी त्यांनाही मर्यादा असतात. या  वातावरणात हृदय धावते आणि जठर जास्त अ‍ॅसिड निर्माण करते. या स्वयंचलित आणि गुप्त संस्थेकडे पोहोचायचे कसे, हा प्रश्न आहे. या संस्थेच्या अतिरेकामुळे निर्माण होणारी रसायने मेंदूलाही सोडत नाहीत आणि त्याला आणखीनच चिडवतात. ‘जणू अन्न खाऊनी वाढली भूक’ अशा अर्थाची रचना ज्ञानेश्वर आणि शेक्सपियर या दोघांनी केली आहे.
शरीरात एकच अशी गोष्ट आहे जी स्वयंचलित आहे आणि आपल्या कवेतही आहे, ती म्हणजे आपली श्वसनक्रिया. ही क्रिया नेहमीच चालू असते, परंतु ती आपण कमीजास्त करू शकतो. पातंजल ऋषींच्या योगशास्त्रात हा गोम दडलेली असावी. श्वासाकडे लक्ष द्या, श्वासोच्छ्वास विशिष्ट पद्धतीने करा, या ज्या सूचना आहेत, त्या आपल्यासाठी आहेतच, परंतु आपल्या स्वयंचलित संस्थेला मारलेल्या हाका ठरतात. ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. हे श्वासाचे नियमन करताना मन झोपलेले नसते. ते एखाद्या माकडासारखे उडय़ा मारतेच, परंतु आपल्याला वाकुल्याही दाखवते आणि मग आपले श्वासोच्छ्वासावरचे लक्ष उडते. काही मिनिटे जरी श्वासावर लक्ष केंद्रित केले, तर त्या काळात मन झोपते, शरीर स्थिरावते, रसायनांचा भडिमार थंडावतो. मेंदूही नि:श्वास टाकतो.
माझ्या सगळ्यांत कळीचा काळ असतो सकाळी साडेसहा. या वेळी वर्तमानपत्र येते आणि माझी योगासनाची वेळ होते. अंतरंग ताजेतवाने असते. याला रामप्रहर म्हणतात. त्या वेळी मी वर्तमानपत्रांतल्या दैत्यांच्या गोष्टी वाचणे म्हणजे धारोष्ण दुधात मिठाचा खडा टाकणे. दिवसभरात होणाऱ्या गोष्टींची गर्दी मनात घुसत असताना त्यांचा अवरोध करत शांत बसून फक्त श्वास ऐकणे कठीणच असते, पण मनाला लगाम सकाळी घालावाच लागतो.
रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com