23 February 2019

News Flash

जे आले ते रमले.. : भारतीय मोगल

मध्य आशियातील तुर्क, अफगाण आणि मंगोल मोठय़ा संख्येने उत्तर हिंदुस्थानात येऊन स्थायिक झाले

मंगोलियन सम्राट तमूर हा लंगडा असल्याने युरोपियन लोक त्याला ‘तमूर द लेम’ म्हणत. पुढे त्याचे तमूरलंग झाले. अत्यंत क्रूर आणि कट्टर मुस्लीम असलेल्या तमूरने १३९८ मध्ये दिल्लीवर हल्ला केला त्यात मोठय़ा संख्येने हिंदूंची कत्तल केली. हिंदुस्थानात १५२६ साली मंगोल (मुघल) साम्राज्य स्थापन करणारा झहीर उद्दीन मुहम्मद बाबर हा तमूरलंगचा पणतू. त्याच्या आईकडूनही चंगीझ खानाशी त्याचे नाते होते.

उझबेकिस्तानच्या फरगाना खोऱ्यात जन्मलेल्या बाबराचे मूळ नाव झहीर उद्दीन मुहम्मद बाबर. पर्शियन भाषेत बाब्र म्हणजे वाघ. केवळ १९व्या वर्षी समरकंद आणि काबूल घेऊन त्याने आपले राज्य थाटले. त्या वेळी दिल्लीत इब्राहिम लोदीचे आणि राजपुतान्यात राणा संगाचे राज्य होते. दौलतखान लोदीच्या आग्रहावरून बाबराने इब्राहिमवर हल्ला करून पानिपत येथे झालेल्या लढाईत लोदी साम्राज्य नष्ट केले आणि त्याच वर्षी राणा संगाचा पराभव करून आपल्या मोगल साम्राज्याचा पाया घातला. बाबरानंतर हुमायून, अकबर, जहांगीर, शाहजहान, औरंगजेब वगैरे मोगल बादशहांची कारकीर्द १८५७ नंतर अस्त पावली. बहादूरशाह जफर हा अखेरचा मोगल बादशाह.

मध्य आशियातील तुर्क, अफगाण आणि मंगोल मोठय़ा संख्येने उत्तर हिंदुस्थानात येऊन स्थायिक झाले. मोगल राज्यकत्रे फारसी भाषा आणि संस्कृतीने प्रभावित झाले आणि त्यांच्यामुळे हिंदुस्थानी प्रजेवरही फारसी भाषा, फारसी स्थापत्यशास्त्र, संगीत आणि खाद्यान्न यांच्यावर पडलेला प्रभाव अजूनही टिकून आहे. मोगलांच्या हिंदुस्थानातील पुढच्या पिढय़ांमधील वंशज अधिक संख्येने उत्तर प्रदेशात आढळून येतात. सहा लाखांहून अधिक असलेले हे मोगल वंशज मोरादाबाद, मीरत, बरेली, आग्रा, अझमगढ या भागांत अधिक स्थायिक झालेले आहेत. हे मोगलवंशीय लोक स्वत:ला मिर्झा, बेग अशी आडनावे लावतात. यातील अनेक जणांच्या मोठय़ा अमराया असून ते शेती, पशुपालन हा व्यवसाय करतात तर काही काष्ठ कोरीव काम, हस्तिदंती वस्तू बनवणे, विणकाम, जरीकाम करतात. बिर्याणी, रुमाली रोटी, कबाब हे त्यांचे खाद्यपदार्थ आता देशभरात लोकप्रिय झालेत. दक्षिणेत हैद्राबाद, मच्छलीपट्टण या भागांतही मोगल जमात आढळते. मोगल जमात प्रतिष्ठित म्हणून त्यांना ‘अशरफ’ ही उपाधी लावली जाते.

sunitpotnis@rediffmail.com

First Published on July 17, 2018 1:01 am

Web Title: rise and fall of mughal empire in india