एखादा रोग ठरावीक सूक्ष्मजीवांमुळेच होतो, या सिद्धांताशी लुई पाश्चर या फ्रेंच वैद्यकतज्ज्ञाबरोबर जर्मन वैद्यकतज्ज्ञ रॉबर्ट कॉख याचेही नाव निगडित झाले आहे. विशिष्ट जंतूंमुळे एखादा रोग होतो, हे सिद्ध करण्यासाठी हव्या असणाऱ्या विशिष्ट जंतूंना शुद्ध स्वरूपात कसे वाढवावे, हे रॉबर्ट कॉखपुढे मोठे आव्हान होते. कारण एखाद्या जीवाणूचा एखाद्या आजाराशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी, तो जीवाणू शुद्ध स्वरूपातच उपलब्ध व्हायला हवा. त्यात इतर जीवाणूंची ढवळाढवळ होता कामा नये.

तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यामधे अनेक प्रकारचे जीवाणू असतात. जर तो नमुना अगदी विरल (डायल्यूट) केला, तर या जीवाणूंचे एकमेकांपासूनचे अंतर वाढते. त्यानंतर त्यांच्या प्रत्येक पेशीच्या विभाजनातून, त्या त्या पेशींचे समूह निर्माण होतात. विशिष्ट प्रक्रिया आणि विशिष्ट रंगद्रव्यांद्वारे यातील हव्या असलेल्या समूहांना ‘रंगवून’ (स्टेनिंग) त्यांना इतर समूहांपासून वेगळे करता येते. मात्र यासाठी योग्य असे पोषक घनस्वरूपातील ‘माध्यम’ मिळायला हवे. कॉखने यासाठी अंडय़ाचा पांढरा भाग, स्टार्च, बटाटय़ाचे काप असे अनेक पदार्थ वापरून पाहिले. अखेर मांस आणि जिलेटीनचे मिश्रण यासाठी उपयुक्त असल्याचे त्याला आढळले. कालांतराने, जिलेटिनऐवजी अगार हा सागरी झुडपांपासून कॉखच्याच प्रयोगशाळेत तयार केलेला पदार्थ अधिक सोयीस्कर असल्याचे सिद्ध झाल्याने, जीवाणूंच्या वाढीसाठी अगारचा वापर सुरू झाला. या तंत्रामुळे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या काळात, युरोपमधे पसरलेल्या अनेक रोगांचे जीवाणू शुद्ध स्वरूपात मिळवून त्यावर पुढील चाचण्या करणे शक्य झाले.

रॉबर्ट कॉख यांनी जंतू आणि विशिष्ट रोग यांच्यातील कार्यकारणभाव सिद्ध  करण्यासाठी, आपल्या या संशोधनावर आधारलेले काही निकष मांडले. ते असे – ‘जंतुसंसर्गाने बाधित झालेल्या प्रत्येकात तो विशिष्ट रोगजंतू आढळला पाहिजे, मात्र निरोगी प्राण्यात तो आढळता कामा नये. बाधित प्राण्याच्या शरीरातून हा जंतू वेगळा करून प्रयोगशाळेत त्याची वाढ करता आली पाहिजे. प्रयोगशाळेत वाढवलेल्या या जंतूंद्वारे हा रोग निरोगी प्राण्यात संक्रमित करता आला पाहिजे. रोग संक्रमण करण्यात आलेल्या प्राण्यांच्या शरीरामधून हा रोगजंतू पुन: वेगळा केल्यावर, तो मूळ जंतूंशी मिळताजुळता असला पाहिजे.’ ही ‘कॉख-हेन्ले आधारतत्त्वे’ जीवाणू आणि विशिष्ट रोग यांच्यातील कार्यकारणभाव सिद्ध करण्यासाठी आजही मार्गदर्शक मानली जातात.

डॉ. रंजन गग्रे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org