जर्मनीतील डार्मस्टॅडस्थित जीएसआय प्रयोगशाळेत १३ आंतरराष्ट्रीय अणुशास्त्रज्ञांचा एक गट कृत्रिम मूलद्रव्य निर्माण करण्यात गढला असताना ८ डिसेंबर १९९४ ला १११ अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्याच्या एका अणूची निर्मिती करण्यात त्यांना यश आले. परंतु पुरेशा पुराव्याअभावी त्यांचा दावा फेटाळण्यात आला. त्यांनी सरळ रेषेतील वेगवर्धकात बिस्मथ-२०९ वर निकेल- ६४च्या आयनांचा मारा केला. त्यांच्या मते बिस्मथ आणि निकेल या दोन मूलद्रव्यांच्या केंद्रकांचे एकत्रीकरण होऊन एक मोठा नवीन अणू तयार होऊ  शकतो. या प्रयोगात दोन धनभारित केंद्रकांचे प्रतिकर्षण टाळण्यासाठी निकेलच्या आयनांना जास्त ऊर्जा देत वेगवान करणे गरजेचे होते. परंतु ही ऊर्जा किंचितही जास्त झाल्यास, तयार झालेल्या संयुग केंद्रकात अतिऊर्जा निर्माण होऊन एकत्रीकरणाऐवजी विखंडन होऊन प्रयोग फसण्याची शक्यता जास्त असे, म्हणून टक्कर घडवण्यासाठी लागणारी योग्य प्रमाणातील ऊर्जा काळजीपूर्वक नियंत्रित करणे अत्यंत जिकिरीचे होते. अशा प्रकारे यशस्वी टक्कर घडण्याचे प्रमाण फार कमी असल्याने २००० साली केवळ ३ अल्पजीवी अणूंची निर्मिती होऊ  शकली. पुढे जपानने २००३ मध्ये १४ अणूंची निर्मिती करून या प्रयोगाला दुजोरा दिला. आयुपॅकने जीएसआयचे संशोधन ग्राह्य़ धरीत जर्मन चमूला त्याचे श्रेय दिले व त्यांनी सुचविल्यानुसार जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व क्ष-किरण शोधाचे जनक विल्यम रॉण्टजेन यांच्या सन्मानार्थ याचे नामकरण रॉण्टजेनिअम असे केले.

किरणोत्सारी रॉण्टजेनिअमची ९ समस्थानिके अत्यंत अस्थिर असून सर्वात स्थिर समस्थानिक रॉण्टजेनिअम-२८२चा अर्धायुष्यकाल २.१ मिनिटांचा आहे. रॉण्टजेनिअम-२८६चा अर्धायुष्यकाल १०.७ मिनिटे असण्याचे भाकीत केले असले तरी त्याबाबत अजून अनिश्चितता आहे. रॉण्टजेनिअम-२८६च्या निर्मितीवर शिक्कामोर्तब झाल्यास तो अस्तित्वात असलेल्या सुपरहेवी मूलद्रव्यात सर्वात दीर्घजीवी ठरेल.

रॉण्टजेनिअम संक्रमणधातूंच्या श्रेणीतील सदस्य असून त्याचे स्थान ११व्या गणात सोन्याखालोखाल आहे. सामान्य दाब व तापमानाला तो स्थायू (घन) स्वरूपात असेल. सैद्धांतिक आकडेमोडीनुसार त्याचे मूळ गुणधर्म त्याच्या कुटुंबातील इतर मूलद्रव्ये तांबे, चांदी व सोन्याप्रमाणे असण्याची अपेक्षा असल्याने त्याची गणना राजधातूमध्ये केली जाण्याची शक्यता आहे तसेच काही गुणधर्मात विसंगती असणेसुद्धा अपेक्षित आहे. तथापि सापेक्ष परिणामांमुळे तो चंदेरी असण्याची दाट शक्यता आहे.

– मीनल टिपणीस

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org