23 March 2019

News Flash

कुतूहल : रुबिडिअम

मऊ चंदेरी पांढरट रंगाचा रुबिडिअम अल्कली धातू कुटुंबातील सदस्य असून इतर अल्कली धातूंप्रमाणेच अत्यंत क्रियाशील आहे.

रुबिडिअमचा शोध १८६१ला नव्याने अवगत झालेल्या ज्वालोत्सर्जी वर्णपंक्तिदर्शन (फ्लेम स्पेक्ट्रोप्स्कोपी) तंत्रज्ञानामुळे लागला. तत्पूर्वी याच तंत्रज्ञानामुळे सिझियमचा शोध लागला होता. रॉबर्ट बन्सन व गुस्ताव किचरेफ या द्वयीला स्पेक्ट्रोस्कोपीच्या शोधानंतर वर्षभरातच लेपिडोलाइट या खनिजाचा वर्णपट अभ्यासताना दोन गडद लाल रंगाच्या रेषा दिसल्या, त्यावरून त्यांनी या खनिजात नवीन मूलद्रव्य असल्याचे अनुमान काढले व लॅटिन शब्द रुबिडसवरून नामकरण केले रुबिडिअम. कालांतराने बन्सनला रुबिडिअम वेगळे करण्यात यश आले. या खनिजात रुबिडिअमचे प्रमाण कमी असल्यामुळे १५० किलो खनिजातून केवळ ९.२ ग्रॅम रुबिडिअम प्राप्त झाले.

मऊ चंदेरी पांढरट रंगाचा रुबिडिअम अल्कली धातू कुटुंबातील सदस्य असून इतर अल्कली धातूंप्रमाणेच अत्यंत क्रियाशील आहे. म्हणूनच निसर्गात तो मुक्त स्वरूपात आढळत नाही. याचा पाण्याशी संपर्क येताच अत्यंत स्फोटक क्रियेद्वारे हायड्रोजन मुक्त होतो, ज्याची क्षमता पोटॅशिअम आणि पाणी या अभिक्रियेपेक्षा अधिक असते. सोडिअमप्रमाणे रुबिडिअमलाही तेलात बुडवून ठेवावे लागते. सामान्य तापमानाला घन असलेला हा धातू ३९ अंश सेल्सिअसला वितळून द्रवात रूपांतरित होतो.

लेपिडोलाइट, पोल्युसाइट व कार्नालाइट ही रुबिडिअमची मुख्य खनिजे. समुद्राच्या पाण्यात व भूगर्भातील झऱ्यांत त्याचे प्रमाण सापडते. परंतु अनिश्चितता व मिळणारे अत्यल्प प्रमाण यामुळे रुबिडिअमचे उत्पादन आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. लिथियमच्या उत्पादनात शुद्धीकरण करताना उपउत्पादन म्हणून रुबिडिअम मिळते.

पूर्वी रुबिडिअमचा उपयोग फक्त संशोधन क्षेत्रात केला जाई परंतु हल्लीच्या तंत्रयुगात रुबिडिअमचा वापर अनेक क्षेत्रांत होतो. मुख्यत: रुबिडिअमचा वापर आण्विक घडय़ाळात उच्चकोटीच्या अचूकतेसाठी तसेच फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्यासाठी व व्हॅक्यूम टय़ूबमध्ये अल्प प्रमाणातील वायूंचे उच्चाटन करण्यासाठी केला जातो. शोभेच्या फटाक्यांत जांभळ्या रंगासाठी रुबिडिअम वापरतात तर वैद्यकीय क्षेत्रात रक्ताभिसरणातील इस्चेमिक (अल्प रक्त) अवस्थेचे सर्वेक्षण करण्यासाठी वापरतात.

रुबिडिअमची किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग कर्करोगग्रस्त पेशी तसेच टय़ूमर शोधण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे जुन्या खडकाचे वय मोजण्यासाठी रुबिडिअमच्या समस्थानिकाचा उपयोग होतो.

श्रीमती मीनल टिपणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२

office@mavipamumbai.org

First Published on June 6, 2018 1:22 am

Web Title: rubidium chemical element