डेहराडूनमध्ये स्थायिक झालेले अँग्लो इंडियन समाजाचे रस्किन बाँड हे इंग्रजी भाषेतल्या त्यांच्या साहित्यातील योगदानामुळे बालसाहित्य क्षेत्रातले एक मापदंड बनले आहेत. मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे रस्किनना त्यांच्या १७ व्या वर्षी लंडनमध्ये साहित्याचा मोठा पुरस्कार मिळूनही त्यांनी आपल्या साहित्यिक कारकीर्दीसाठी भारतातच येऊन स्थायिक होणे पसंत केले. डेहराडून येथे आल्यावर त्यांनी काही दिवस दिल्ली आणि डेहराडूनमधल्या वृत्तपत्रांमधून आणि इतर नियतकालिकांमधून लघुकथा आणि कविता लिहून उपजीविका केली.

१९८० साली प्रसिद्ध प्रकाशक पेंग्विन भारतात आल्यावर त्यांनी रस्किननी पूर्वी लिहिलेल्या ‘व्हॅग्रांट्स इन द व्हॅली’ आणि ‘द रूम ऑन द रूफ’ या दोन कादंबऱ्यांचा एकत्रित ग्रंथ प्रकाशित केला. पुढच्याच वर्षी पेंग्विननी रस्किनच्या सत्यकथांवर आधारित लघुकथा संग्रह ‘द बेस्ट ऑफ रस्किन बाँड’ प्रकाशित केला. पुढे रस्किननी लघुकथा, ललित लेखन, कादंबऱ्या, पर्यावरण, निसर्ग या विषयांवरचे मुबलक लिखाण केले. त्यांची आजवर छोटीमोठी ५०० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मुलांसाठी ५० पुस्तके आहेत. त्यापैकी ‘द ब्ल्यू अम्ब्रेला’, ‘ए फाइट ऑफ पिजन्स’ विशेष प्रसिद्ध आहेत. ‘ऑन बिइंग अ‍ॅन इंडियन’ या त्यांच्या निबंधात त्यांना ते भारतीय असल्याचा अभिमान असल्याचे सांगतात. त्यांच्या कथांमध्ये त्यांनी उभे केलेले ‘रस्टी’ हे पात्र अनेक वेळा दिसते. रस्किननी लिहिलेल्या २४ कादंबऱ्यांपैकी ‘द रूम ऑन द रूफ’, ‘अ फाइट ऑफ पिजन्स‘, ‘अँग्री रिव्हर’, ‘द ब्ल्यू अम्ब्रेला’, ‘महारानी’, ‘दिल्ली इज नॉट फॉर’, ‘द इंडिया आय लव्ह’ आदी विशेष लोकप्रिय झाल्या. रस्किनच्या ‘फाइट ऑफ पिजन्स’वर आधारित ‘जुनून’ हा शशी कपूर यांनी काढलेला चित्रपट लोकप्रिय झाला. तसेच ‘सात खून माफ’ हा चित्रपट विशाल भारद्वाज यांनी काढला. ‘एक था रस्टी’ या नावाने ‘रस्टी’ कथांवर आधारित दूरचित्रवाणी मालिका निघाली. रस्किन बाँड यांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल १९९२ साली साहित्य अकादमी पुरस्कार, १९९९ मध्ये पद्मश्री आणि २०१४ साली पद्मभूषण हे सन्मान मिळाले.

‘‘मला माझा पुढचा जन्म लेखक म्हणून भारतातच हिमालयाच्या कुशीत घेणे आवडेल,’’ असं रस्किन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलंय!

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com