17 November 2019

News Flash

कुतूहल : आवर्तसारणीचा पितामह मेंडेलिव्ह

मूलद्रव्यांना योग्य स्थान देऊन त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने मांडणी करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता.

महान रशियन शास्त्रज्ञ ‘दिमित्री मेंडेलिव्ह’ रसायनशास्त्राला मान्य असलेल्या आवर्तसारणीचे जनक! त्यांना रसायनशास्त्राविषयी आत्मीयता होतीच, पण मूलद्रव्यांना योग्य स्थान देऊन त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने मांडणी करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने करताना समान गुणधर्म असलेली मूलद्रव्ये एकाखालोखाल येऊन त्यांचे उभे स्तंभ तयार झाले. मेंडेलिव्हने मूलद्रव्यांची विभागणी केलेल्या आठ उभ्या स्तंभांमधील पहिल्या स्तंभामध्ये हायड्रोजन, लिथिअम, सोडिअम, पोटॅशिअम इत्यादी मूलद्रव्ये टाकली. परंतु आडव्या रांगेत लिथिअम, बेरिलिअम, बोरॉन, कार्बन अशी चढत्या अणुवस्तुमानानुसार मांडणी केली. तिसऱ्या उभ्या गटामध्ये या आडव्या रांगेत त्यांनी जागा रिकाम्या सोडल्या. असे का ते आता पाहू! मेंडेलिव्हने असे बघितले की टिटॅनिअमचे रासायनिक व भौतिक गुणधर्म कार्बन व सिलिकॉनसारखे आहेत. म्हणून त्यांनी कार्बन-सिलिकॉननंतर टिटॅनिअम ठेवला. परंतु कॅल्शिअमनंतरची जागा रिकामी ठेवली. त्यानंतर दोन जागाही िझकनंतर रिकाम्या ठेवल्या. त्यांना खात्री वाटत होती की बोरॉन, अ‍ॅल्युमिनिअम व सिलिकॉनच्या गुणधर्माप्रमाणे नवीन मूलद्रव्ये भविष्यात शोधली जातील. रिकाम्या जागेतील मूलद्रव्यांना नावे देताना ‘इका’  (ी‘ं) या शब्दाचा वापर त्यांनी केला. इका बोरॉन (स्कँडिअम), इका अ‍ॅल्युमिनिअम (गॅलिअम ), इका सिलिकॉन (जम्रेनिअम), इका मँगनीझ (टेक्निशिअम) अशा शोध न लागलेल्या चार मूलद्रव्यांच्या अस्तित्वाची त्यांना खात्री होती. खरोखरच काही काळानंतर स्कँडिअम, गॅलिअम, जम्रेनिअम, टेक्निशिअम यांनी मेंडेलिव्हच्या रिकाम्या जागा घेतल्या.

खरे तर जसजसे मूलद्रव्यांविषयी अधिक संशोधन होत गेले तसतसे त्यांचे रासायनिक गुणधर्म निश्चित होत गेले, तसेच त्यांच्या अणुभारामध्येही अचूकता आली.  पण अगदी सुरुवातीला म्हणजे इ.स. १८६७ मध्ये मेंडेलिव्हने अगोदर निश्चित केलेल्या काही अणुवस्तुमानांबद्दल शंका व्यक्त केली होती. प्रयोगानंतर ती शंका खरी ठरली. या प्रकारे मेंडेलिव्ह हा द्रष्टा वैज्ञानिक ठरला. मेंडेलिव्हना तीन वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळूनसुद्धा त्यापासून वंचित राहावे लागले. म्हणून त्यांच्या योगदानाचे महत्त्व कमी होत नाही. १०१ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याला मेंडेलेव्हिअम तसेच चंद्रावरील एका विवराला त्यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जगाने त्यांना आवर्तसारणीचा पितामह मानले.

जयंत श्रीधर एरंडे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on April 24, 2018 2:38 am

Web Title: russian chemist dmitri mendeleev