पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या मूलद्रव्यांच्या साठय़ामध्ये रुथेनिअमचं प्रमाण अगदी कमी आहे. साधारणपणे प्रति दशलक्ष भागांमध्ये ०.०००४ भाग, एवढं रुथेनिअमचं प्रमाण कमी असतं. त्यातही त्याचे गुणधर्म प्लॅटिनमसारखेच असल्यामुळे त्याला प्लॅटिनमच्या खनिजापासून वेगळं करणं खूप कठीण जातं.

पण गेल्या काही दशकात, वैज्ञानिकांना रुथेनिअम मिळवण्याची नेमकी रासायनिक पद्धत माहीत झाली. ‘निकेल’ या धातूच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत प्लॅटिनम, पॅलॅडिअम आणि ऑस्मिअम ही मूलद्रव्ये उप-उत्पादन म्हणून तयार होतात आणि काही रासायनिक अभिक्रिया करून हे तीनही धातू एकमेकांपासून वेगळे करता येतात. त्यामुळे वर्षांगणिक १२ ते २० टन रुथेनिअम आता उपलब्ध व्हायला लागलं आहे.

‘रुथेनिअम’चा स्वभाव मुळातच थोडासा निष्क्रिय! इतर कुठल्याही धातूंशी किंवा आम्लांशी रुथेनिअम फारशी सलगी करत नाही, म्हणजेच रासायनिक अभिक्रिया करत नाही. सर्वसाधारण तापमानाला त्याची ऑक्सिजनबरोबरही अभिक्रिया होत नाही. त्यामुळे ते गंजत नाही. शिवाय रुथेनिअमचा आणखी एक गुणधर्म असा की इतर काही धातूंबरोबर त्याची संमिश्रं तयार होतात. रुथेनिअम अशा संमिश्रांना दोन गुणधर्म बहाल करतं. पहिलं म्हणजे ते समिश्रांना कठीणपणा देतं आणि दुसरं म्हणजे ते समिश्रांना ऑक्सिजनशी किंवा इतर काही पदार्थाशी अभिक्रिया होण्यापासून रक्षण करतं.

टिटॅनिअम हे मूलद्रव्य सहसा गंजत नाही, ऑक्सिजनशी किंवा इतर आम्लांशी फारशी रासायनिक अभिक्रिया करत नाही. जर टिटॅनिअममध्ये ०.१ टक्के इतक्या कमी प्रमाणात रुथेनिअम मिसळलं तर टिटॅनिअमची ऑक्सिजनशी क्रिया ‘न’ करण्याची क्षमता आणखी १०० पटींनी वाढते.

रुथेनिअमचं, पॅलॅडिअम किंवा प्लॅटिनमबरोबरचं संमिश्र, अनेक वैद्यकीय उपकरणं तयार करण्यासाठी, अतिउच्च किंवा अतिशीत तापमान मोजण्यासाठीची साधनं तयार करण्यासाठी किंवा काही विद्युत उपकरणांमध्ये अतिशय उपयोगी पडतं.

रुथेनिअमची जवळपास नऊ समस्थानिकं (आयसोटोप्स) किरणोत्सार करतात. त्यापकी रुथेनिअम-१०६ हे समस्थानिक ‘बीटा किरणोत्सार’ करते. हे किरण कर्करोगग्रस्त पेशींना मारक असतात. म्हणून रुथेनिअम-१०६ हे समस्थानिक कर्करोगावर.. विशेषत: डोळ्यांच्या कर्करोगासाठी उपचार म्हणून वापरले जाते.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org