29 May 2020

News Flash

कुतूहल : पक्षीविज्ञानाचे माहेरघर

डॉ. सालीम अली यांचा पक्षीविज्ञान या शास्त्रशाखेचे जनक म्हणून नावलौकिक आहे.

डिसेंबर-जानेवारी या महिन्यांत भारतामध्ये परदेशी पक्ष्यांची स्थलांतरे मोठय़ा संख्येने होत असतात. परंतु बदललेल्या जागतिक हवामानामुळे, बदलत्या ऋतुचक्रामुळे मागील काही वर्षांपासून या परदेशी पाहुण्यांची संख्या कमी झाली आहे. नुकत्याच ठाणे येथे झालेल्या पक्षीगणनेमध्ये याची प्रचीती आली. नेहमी आढळणाऱ्या स्थानिक पक्ष्यांचे दर्शनही आता कमी झाले आहे. या समस्यांचा सखोल वैज्ञानिक अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्याचे काम ‘डॉ. सालीम अली पक्षीविज्ञान आणि नैसर्गिक इतिहास केंद्र’ करत आहे.

डॉ. सालीम अली यांचा पक्षीविज्ञान या शास्त्रशाखेचे जनक म्हणून नावलौकिक आहे. १९९० मध्ये केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’च्या सहकार्यातून तमिळनाडूतील कोइम्बतूरजवळील अनकट्टी येथे या केंद्राची स्थापना केली. पक्ष्यांच्या अभ्यासाबरोबरच भारतातील जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी या केंद्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पर्यावरणस्नेही वास्तुविशारद लॉरी बेकर यांनी या केंद्राची ‘इकोफ्रेण्डली’ इमारत उभारलीच; त्याचबरोबर इथे विविध प्रकारची उद्याने विकसित करून त्यांनी इमारतीच्या सौंदर्यात भर घातली आहे.

भारतात आढळणारे विविध प्रजातींचे पक्षी, त्यांची जीवनशैली, त्याचबरोबर जैवविविधता, तिथला नैसर्गिक इतिहास यावर संशोधनात्मक अभ्यास या केंद्रात प्रामुख्याने होतो. पक्षीविज्ञानाशी संबंधित एम.एस्सी., एम.फील., पीएच.डी. हे अभ्यासक्रम केंद्राकडून चालविले जातात.

अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळा आणि पक्षीविज्ञान विषयावरील हजारो पुस्तके येथील वाचनालयात उपलब्ध आहेत. मुंबईतील सागरी महामार्ग (सी लिंक) प्रकल्प, अंदमानची खाडी, आंध्र प्रदेशातील ‘स्पॉट-बिल्ड पेलिकन’ (महाराष्ट्रात हा ढोक, पिवश्या ढोक, करढोक, थैलीवाले ढोकी, पांढरा भुज्या या नावांनी ओळखला जातो.) या पाणपक्ष्याचे संवर्धन, भरतपूरमधील अजगर आदींबाबत सखोल अभ्यास आणि संशोधन करून केंद्राने अहवाल तयार केले आणि ते संबंधित राज्य सरकार आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला सादर केले आहेत. या केंद्रामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठीही अनेक उपक्रम राबविले जात असून त्यामधून आजवर हजारो विद्यार्थी ‘पक्षीमित्र’ म्हणून तयार झाले आहेत. त्यामुळे भारतातील ‘पक्षीविज्ञानाचे माहेरघर’ अशी या केंद्राची ओळख दृढ झाली आहे. केंद्राच्या- www.sacon.in या संकेतस्थळावर त्याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.

कविता वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 2:39 am

Web Title: salim ali bird sanctuary dr salim ali research on migratory birds zws 70
Next Stories
1 मनोवेध : मेंदूतील ‘अफू’
2 मनोवेध : मेंदूतील रसायने
3 कुतूहल : छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र   
Just Now!
X