19 March 2019

News Flash

जे आले ते रमले.. : सलीम दुराणी

१९३४ मध्ये काबूल येथे जन्मलेला सलीम हा अब्दुल अझीज यांचा मुलगा.

त्याचा दिलदार स्वभाव आणि क्रिकेटमधील कौशल्य यामुळे ‘प्रिन्स सलीम’ या नावाने क्रिकेट वर्तुळात ओळखला जाणारा सलीम दुराणी हासुद्धा एक गुजराती पठाण आहे. १९६० ते १९७३ या काळात भारतीय संघामधून कसोटी सामने आणि १९५४ ते १९७८ या काळात भारतातील प्रथम श्रेणी सामन्यांतून खेळलेला हा खेळाडू भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार मिळवणारा पहिला क्रिकेट खेळाडू!

१९३४ मध्ये काबूल येथे जन्मलेला सलीम हा अब्दुल अझीज यांचा मुलगा. सलीमच्या जन्मानंतर अब्दुल अझीज कराचीत येऊन स्थायिक झाले आणि पुढे जामनगरच्या महाराजांकडे नोकरीस लागले. ते स्वत: एक उत्तम यष्टीरक्षक म्हणून तत्कालीन क्रिकेट वर्तुळात नावाजलेले होते. घरातल्या क्रिकेटच्या वातावरणात वाढलेल्या सलीमला त्याच्या शालेय जीवनात वडिलांकडून क्रिकेटची दीक्षा मिळाली होतीच. भारतीय स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणीत सलीमचे वडील पाकिस्तानात जाऊन कराचीत स्थायिक झाले तर सलीम त्याच्या आईबरोबर जामनगरातच राहिला.

सलीमचा प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश झाला १९५४ साली सौराष्ट्र संघातून रणजी करंडक सामन्यांमध्ये. त्यानंतर सलीम गुजरातच्या आणि उदयपूरच्या महाराणांच्या आग्रहाखातर १९५८ साली राजस्थानच्या क्रिकेट संघातून रणजी करंडक सामने खेळला. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही डाव्या हाताने करणाऱ्या या चतुरस्र खेळाडूने १९५४ ते १९७८ या काळात १७० प्रथम श्रेणी सामने खेळताना ४८४ बळी घेतले आणि ८५४५ धावा चोपल्या. त्यात १४ शतके तर ४५ अर्धशतके होती. आंतरदेशीय क्रिकेटमध्ये १९६० ते १९७३ या काळात भारतीय संघातून २९ कसोटी सामने खेळताना सलीमने ७५ बळी घेतले तर १२०२ धावा काढल्या. षटकार मारण्यावर हुकूमत असलेला सलीम प्रेक्षकांच्या मागणीनुसार षटकार मारीत असे!

१९७१ साली वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातून खेळताना सलीमने क्लॉइव्ह लॉइड आणि गॅरी सोबर्सना बाद करून आपल्या संघाला विजयश्री मिळवून दिली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सलीमने परवीन बाबीबरोबर बी. आर. इशारांच्या ‘चरित्र’ या चित्रपटात नायकाची भूमिका केली.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.comc

First Published on June 6, 2018 1:21 am

Web Title: salim durani