News Flash

शंकरन्कुट्टी पोट्टेक्काट  – मल्याळम्

१९८० चा ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम् साहित्यिक

१९८० चा ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम् साहित्यिक शंकरन्कुट्टी कुन्हीरमन पोट्टेक्काट यांना त्यांच्या मल्याळम् कादंबरी ‘ओरू देशत्तिन्ते कथा’साठी प्रदान करण्यात आला. ही कादंबरी १९६४ ते १९७३ च्या दरम्यान प्रकाशित भारतीय भाषांमधील सर्जनात्मक साहित्यातील सर्वश्रेष्ठ म्हणून घोषित करण्यात आली आहे.

एस. के. पोट्टेक्काट यांचा जन्म १४ मार्च १९१३ रोजी कालिकत येथे एका  मध्यमवर्गीय परिवारात झाला. आताचे कालिकत म्हणजे पूर्वीचे अतिराणीप्पाट हे होय. इथेच त्यांचं बालपण, शालेय शिक्षण झालं. शंकरन् यांचे वडील शाळेत शिक्षक होते. इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शंकरन् यांनी एका गुजराती शाळेत शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. १९३९ मध्ये नोकरी सोडून ते मुंबईला आले आणि याच सुमारास त्रिपुरा काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झाले. मग मुंबईला अनेक नोकऱ्या केल्या. नंतर परत कालिकतला आले आणि इथेच स्थायिक झाले.  सूक्ष्म निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती, साहित्याची उपजत आवड, निसर्ग सहवासाची आवड यातूनच त्यांच्या साहित्यजीवनाची सुरुवात झाली. कित्येक चांगल्या कथा, प्रवासवर्णने त्यांच्या लेखणीतून उतरली. यादरम्यान त्यांनी कविताही लिहिल्या.  त्यांचा ‘प्रभात कांति’ हा १९३६ मध्ये प्रकाशित झालेला पहिला काव्यसंग्रह. दुसरा काव्यसंग्रह ‘संचरियुते गीतांगुल’ (१९५४) यामध्ये त्यांनी केलेल्या प्रवासाचे प्रतिबिंब दिसते. ‘प्रेमशिल्पी’ (१९४५) या काव्यसंग्रहातून तीन महाद्वीपांचा समावेश आहे. १९४५ मध्ये जेव्हा मुंबई सोडून कालिकतला आपल्या घरी गेले तेव्हा लेखन हेच त्यांनी आपले जीवन बनवले.

कवितेबरोबरच त्यांनी कथालेखनही केले. एकूण २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची कथा साप्ताहिक ‘मातृभूमि’मध्ये प्रकाशित झाली आणि कथालेखक म्हणून त्यांना मान्यता मिळाली. त्यांच्या रोमँटिक कथा तर त्या काळाच्या वाचकांसाठी सर्वस्वी नव्या होत्या. मल्याळम् साहित्याला स्वच्छंदवादी कथेची नवीन शैली त्यांनी प्रदान केली.  त्यांच्या साहित्याचे भारतीय भाषांसह इंग्रजी, इटालियन, रशियन, जर्मन इ. भाषांत अनुवाद झाले आहेत.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

दुग्धमापक (लॅक्टोमीटर)

दुधाची शुद्धता तपासण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात. रंग, चव, गंध, घट्टपणा यावरून दुधाची गुणवत्ता पारखली जाते.

१५.५ अंश सेल्सिअस तापमानाला गाईच्या शुद्ध दुधाची घनता १.०२८ ग्रॅम/लिटर ते १.०३० ग्रॅम/लिटर तर म्हशीच्या शुद्ध दुधाची घनता १.०३० ग्रॅम/लिटर ते १.०३२ ग्रॅम/लिटरदरम्यान असते.  दुधातील पाण्याचे प्रमाण, स्निग्धांश (फॅट) आणि इतर घटकांनुसार दुधाची घनता बदलते. स्निग्धांश काढलेल्या दुधाची घनता १.०३६ ग्रॅम/लिटरच्या जवळपास असते.

साखर, स्टार्च (पीठ), युरिया यांसारख्या पदार्थाची भेसळ करून दूध कृत्रिमरीत्या घट्टही केले जाते. दुधात कुठल्या प्रकारची भेसळ आहे, हे वेगवेगळ्या चाचण्यांद्वारे तपासता येते. दुधात पाणी मिसळले आहे का, याचा अंदाज लॅक्टोमीटरसारख्या साध्या, सोप्या उपकरणाने सहज बांधता येतो.

दुधाची घनता मोजण्यासाठी लॅक्टोमीटर वापरले जाते. हा एक प्रकारचा तरकाटाच असून तो आíकमिडीजच्या तत्त्वावर काम करतो. जास्त घनतेच्या द्रवात तरकाटा कमी बुडतो तर कमी घनतेच्या द्रवात जास्त बुडतो. दुधाच्या घनतेची चाचणी करण्यासाठी, लॅक्टोमीटर उभा ठेवल्यास बुडू शकेल, असे उभट आकाराचे भांडे (जार) घेतात. दुधाचे तापमान थर्मामीटरच्या साहाय्याने मोजतात आणि दूध जारमध्ये भरतात. दूध भरल्यानंतर त्यात बुडबुडे राहणार नाहीत, याची काळजी घेतात. स्वच्छ व कोरडा केलेला लॅक्टोमीटर जारमध्ये दुधात बुडवतात. लॅक्टोकमीटर दुधात बुडवल्यानंतर लॅक्टोमीटरचा काही भाग दुधावर तरंगतो. दुधाच्या पातळीशी लॅक्टोमीटरच्या पट्टीवरचा जो आकडा जुळेल, तो आकडा नोंद करतात.

दुधातील घन पदार्थामुळे त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते. दुधात पाण्याचे प्रमाण वाढले की त्याची घनता कमी होते. त्यामुळे लॅक्टोमीटर पाणी मिसळलेल्या दूधात, शुद्ध दुधाच्या तुलनेत अधिक बुडतो आणि लॅक्टोमीटरवरचे वाचन कमी दाखवले जाते.

लॅक्टोमीटरवर ‘ट’ ही खूण असते. दुधाच्या पातळीच्यावर ट ही खूण असेल, तर ते दूध पाणी न मिसळलेले शुद्ध दूध आहे, असे समजावे. पण ही खूण दुधात बुडली म्हणजेच लॅक्टोमीटर कमी वाचन दाखवत असेल तर, त्या दुधात पाणी मिसळलेले आहे, असे समजावे.

लॅक्टोमीटरमुळे दुधातल्या इतर घटकांविषयी माहिती मिळत नसली तरी दुधात पाणी मिसळले आहे की नाही, हे मात्र नक्की समजते.

डॉ. हिरण्मयी क्षेमकल्याणी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2017 4:08 am

Web Title: sankarankutty pottekkatt
Next Stories
1 घनता
2 आकारमान
3 वस्तुमान आणि वजन
Just Now!
X