होरेस विल्सन हा हरहुन्नरी तरुण वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून ईस्ट इंडिया कंपनीत शल्यचिकित्सक म्हणून कलकत्त्यात रुजू होतो काय, त्याच बरोबर धातुशास्त्रतज्ज्ञ म्हणून कलकत्त्याच्या टांकसाळीतही काम करतो काय आणि संस्कृतचा पंडित बनून संस्कृत नाटय़शास्त्रावर ग्रंथ लिहितो काय, संस्कृत खंडकाव्य, नाटकांची इंग्रजीत भाषांतरे करतो काय, सगळंच विस्मयकारक! तो भारतात आला शल्यचिकित्सक म्हणून, पण पुढे त्याला प्राचीन भारतीय भाषा, साहित्य, नाटय़शास्त्र यांनी एवढी भुरळ घातली की, शल्यचिकित्सा बाजूला ठेवून त्याने बनारसमध्ये राहून संस्कृत भाषा, वेद, पुराणे, नाटय़शास्त्राचा अभ्यास करून त्यात स्वतची निर्मिती केली.

विल्सनने भारतीय शल्यचिकित्सा आणि आयुर्वेदाचाही अभ्यास केला होता. कलकत्त्याच्या मेडिकल अँड फिजिकल सोसायटीच्या प्रकाशनांमध्ये त्याने कॉलरा आणि कुष्ठरोगावरील निरीक्षण नोंदवलं आहे. संस्कृत साहित्यातली त्याची मोठी कामगिरी म्हणजे १८१९ मध्ये त्याने तयार केलेला, जगातला पहिला संस्कृत-इंग्रजी शब्दकोश ही होय. या शब्दकोशाचे काही काम रुडॉल्फ रोथ आणि ओटो फोन यांनी १८५३ मध्ये केले. १८१३ साली विल्सनने संस्कृतातील कालिदासाच्या ‘मेघदूत’ या महाकाव्याचे इंग्रजीत भाषांतर केले. त्याने संस्कृत आणि बंगाली भाषांमधील नाटकांची पुस्तके मिळवून भारतीय नाटय़शास्त्राचा अभ्यास केला आणि त्यावर ‘थिएटर ऑफ हिंदूज’ हा मोठा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये नाटय़ सर्वेक्षण करून सहा पूर्ण नाटकांचे इंग्रजीत अनुवाद केले आहेत.  ‘दासकुमारचरित’, ‘महाभारत’ आणि ‘विष्णुपुराण’ यांचे इंग्रजीत केलेले भाषांतर प्रसिद्ध आहे. त्याने लिहिलेला १८०५ ते १८३५ या काळातला ब्रिटिश भारताचा इतिहास प्रसिद्ध आहे. १८३६ साली त्याला ईस्ट इंडिया कंपनीचे प्रमुख ग्रंथपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. १८६० मध्ये विल्सनचे निधन झाले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com