कच्छचे मिस्त्री या नावाने ओळखले जाणारे कच्छ गुर्जर क्षत्रीय (केजीके) यांच्या समाजाने इ.स.१८५० पासून आजतागायत भारतीय रेल्वेच्या रेल्वेमार्ग आणि त्यावरील पुलांच्या बांधकामात मोठे योगदान दिले आहे. कच्छचे मूळ रहिवासी असलेले केजीके सोळाव्या शतकापासून किल्ला,  महाल आणि मंदिर स्थापत्य आणि बांधकामातील कुशल कारागीर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कौशल्यामुळे पोर्तुगीजांनी या समाजाला ‘मिस्त्री’ हे नाव ठेवले.
१८५०ते १८६० या दशकात कच्छचा जीवन चौहान या कारागिराने प्रथम रेल्वेमार्ग बांधकाम ठेकेदारीच्या व्यवसायात प्रवेश केला. ब्रिटिशांनी सिंध रेल्वेच्या कराची-कोट्री या १०६ मल लांबीच्या रेल्वेमार्गाचे बांधकामाचा ठेका प्रथम जीवन चौहानला दिला. हे काम त्याने उत्तमरीत्या पार पाडले. पुढे जीवनचा मुलगा गोमल चौहान आणि कच्छचे रामजी लढानी, नारायण राजा यांनीही सिंध रेल्वेच्या ठेकेदारीत मोठे यश मिळविले. याच काळात १८५२ ते १८५८ मध्ये रणछोड राठोड याने ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेसाठी बोरीबंदर ते ठाणे रेल्वेमार्ग, पुणे ते खंडाळा रेल्वेमार्ग, सँडहर्स्ट ब्रिज वगरे कामे पूर्ण करून तो कल्याणमध्ये स्थायिक झाला.
रेल्वेमार्गाचे बांधकाम व रूळ जोडणी करण्याबरोबरच रेल्वे स्थानकांच्या इमारती तसेच फलाट बांधणे, रेल्वेच्या पाणीपुरवठा योजना यांमध्येही हे मिस्त्री लोक तरबेज झाले. जगमल राजा चौहान, खोडा रामजी चावडा, मुळजी सवारिया, जयराम चौहान इत्यादी ठेकेदारांनी रेल्वेची मोठी कामे पूर्ण केली.
रेल्वेमार्गासाठी जमीन तयार करताना जंगलतोड, नदीपात्रात रेल्वेचे पूल बांधणे, सुरूंग लावणे, डोंगरांमध्ये बोगदे खणणे इत्यादी कष्टाची कामे करण्यासाठी मोठय़ा मनुष्यबळाची आवश्यकता होती. मुख्य ठेकेदार अनेक कामे उपठेकेदारांवर सोपवीत. जगमल चौहान, जयराम चौहान, कुंवरजी राठोड या रेल्वेच्या जुन्या ठेकेदारांना ब्रिटिश राजवटीने ‘रायबहादूर’ हा किताब देऊन सन्मान केला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल: म्यूल – सूतकताई साचा (भाग ३)
क्रॉम्प्टनने सुरुवातीला म्यूल साचा हा लाकडापासून बनविला होता. सुरुवातीला साच्यावर ४८ चाती बसविली होती. या म्यूलची चाती एका मिनिटाला १७०० फेरे या गतीने फिरत असत आणि ६० सूतांकाचे सूत एका दिवसामध्ये ४५५ ग्रॅम इतके उत्पादन या साच्यावर निघू शकत असे. म्यूलवर प्रथमच अतिशय तलम आणि चांगल्या ताकदीच्या आणि सर्व प्रकारच्या वस्त्रांसाठी लागणाऱ्या सुताची निर्मिती करता येणे शक्य झाले. म्यूल साच्याचा उपयोग सुरुवातीला कापसापासून सूत बनविण्यासाठी करण्यात येत असे. कालांतराने इतर तंतूंसाठीही म्यूल साच्याचा उपयोग केला जाऊ लागला. क्रॉम्प्टनने बनविलेल्या म्यूलमध्ये पुढे मोठय़ा प्रमाणावर सुधारणा होत गेल्या. हॉर्वचि येथील एक यांत्रिक हेन्री स्टोन्स याने या म्यूलची चौकट आणि दातेरी चक्रे धातूपासून बनविली, त्यामुळे म्यूल अधिक वेगाने चालविणे शक्य झाले.
याचबरोबर एका म्यूल साच्यावरील चात्यांच्या संख्येतसुद्धा वाढ होत गेली. एका म्यूलवर १३२० पर्यंत चाती बसविली जाऊ लागली. यामुळे म्यूलची लांबी ४६ मीटपर्यंत असे आणि यावरील चात्यांची गाडी एका मिनिटाला ४ वेळा १.५ मीटर इतकी मागेपुढे करत असे.
 सुरुवातीला म्यूल माणसांकरवी हातांनी चालविले जात असे. पुढे ते प्राणी आणि नंतर पाणी यांच्याने चालविले जाऊ लागले. पहिल्या औद्योगिक क्रांतीनंतर वाफेच्या इंजिनाचा शोध लागला व त्यानंतर ते वाफेच्या इंजिनाच्या साहाय्याने चालविले जाऊ लागले.
म्यूल साचा इतका प्रसिद्ध झाला की, एका वेळी मॅचेस्टरमधील गिरण्यातून म्यूलची ५० कोटी चाती कार्यरत होती. अठराव्या शतकाच्या अंतिम काळापासून विसाव्या शतकाच्या अंतिम दशकापर्यंत  जगातील वस्त्रोद्योगात म्यूल सूतकताईचे मुख्य साधन म्हणून वापरात होते.
म्यूलमधील कताई प्रक्रिया ही खंडित होती, कारण वातीला खेच रुळांच्या साहाय्याने खेच देताना आणि चात्यांची गाडी रुळांपासून दूर नेत पीळ देत असताना उत्पादन सुरू असते; परंतु गाडी परत रुळांकडे नेत तयार झालेले सूत बॉबिनवर गुंडाळले जात असताना खेच रुळांची गती थांबविली जाते आणि यामुळे उत्पादन थांबते.
वरवर पाहाता साध्या वाटणाऱ्या या दोषामुळे पूर्ण वेळ उत्पादन होऊ शकत नाही आणि उत्पादनावर मर्यादा येतात. त्यामुळेच म्यूलच्या कार्यतत्त्वाचा हा मोठा दोष होता, असे मानले जाते. याशिवाय म्यूलला मोठय़ा प्रमाणावर जागा लागत असे आणि गाडीसारखी मागेपुढे होत असल्यामुळे यंत्राच्या भागांची मोठय़ा प्रमाणावर झीज होत असे.
चं. द. काणे  (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  
चुनाभट्टी,  मुंबई २२ – office@mavipamumbai.org