सर रणजीतसिंहजी जडेजा बहादूर यांची जामनगरचे महाराजा म्हणून झालेली सन १९०७ ते  १९३३ अशी कारकीर्द संस्मरणीय ठरली. जामनगरचा राजा जामश्री विभाजी याचा पुत्र कालुभा वयात आल्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीचा, िहसक होत गेला. एकदा वडिलांना विषप्रयोग करून मारण्याच्या कटात तो सापडला व शेवटी वडिलांनी त्याला राज्यातून हद्दपार केले. त्यानंतर राजाच्या नात्यातील शेतकऱ्याचा मुलगा जामनगरच्या राज्याला वारस म्हणून निवडण्यात आला. हाच मुलगा पुढे जामनगरचा प्रसिद्ध, लोकप्रिय शासक जाम श्री रणजीतसिंहजी विभाजी या नावाने विख्यात झाला. परंतु त्यापूर्वी त्याला एका दिव्यातून बाहेर पडावे लागले.
विभाजी लहान रणजीतला बरोबर घेऊन राजकोट येथे गेला व तिथे असलेल्या ब्रिटिश उच्चाधिकाऱ्याची या दत्तकविधानासाठी त्याने परवानगी घेतली. पण नेमके त्याच काळात जाम विभाजीच्या एका राणीस पुत्ररत्न होऊन गादीला नसíगक वारस मिळाला. त्यामुळे जाम विभाजीने दत्तकपुत्राला आपला वारस न नेमता नसíगक पुत्र जसवंतसिंहालाच वारस नेमले. व्हाइसराय लॉर्ड रिपनच्या आग्रहावरून सहानुभूती म्हणून रणजीतला इंग्लंडमध्ये शिक्षण घेण्यास पाठविण्यात आले. तिकडे जामनगर गादीचा वारस जसवंतसिंह याची कारकीर्द सन १८९५ ते १९०६ अशी झाली व त्याच्या मृत्यूनंतर, १९०७ साली रणजीत याची जाम श्री म्हणून नियुक्ती झाली.
सन १९०७ ते १९३३ अशा कारकीर्दीत रणजीतसिंहाने जामनगरचा उत्कर्ष घडवून आणला. जामनगर बंदर आधुनिक तंत्राने विकसित करून त्याने राज्यात रेल्वे सेवा सुरू केली. रस्ते बांधणी व पाणीपुरवठा या क्षेत्रांतही त्याने अनेक प्रकल्प सुरू केले. पहिल्या महायुद्धात फ्रान्समध्ये ब्रिटिश सन्याधिकारी म्हणून त्यांनी काम केले. १९२० साली जीनिव्हा येथे झालेल्या लीग ऑफ नेशन्सच्या सभेमध्ये रणजितसिंहजीने भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधित्व केले.
सुनीत पोतनीस –  sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल: कापसापासून सूतनिर्मिती – भाग १
वस्त्रोद्योगामध्ये वापरल्या जाणाऱ्या तंतूंमध्ये कापूस हा प्रमुख तंतू आहे. वस्त्रोद्योगामध्ये वापरल्या जाणाऱ्या एकूण तंतूंमध्ये कापसाचा वाटा ५०% पेक्षा अधिक आहे. कापूस हा शेतामध्ये पिकविला जातो. सूतकताईसाठी जाण्यापूर्वी कापसातील सरकी काढून टाकावी लागते. ही प्रक्रिया वटण कारखान्यात केली जाते. वटण कारखान्यात कापसामधील सरकी काढून वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून कापसाच्या sam05घट्ट अशा गाठी किंवा गासडय़ा बांधल्या जातात. या गाठींचे वजन भारतात साधारणपणे १७० कि. ग्रा. एवढे असते. वेगवेगळ्या देशांत गाठींचे वजन वेगवेगळे असते. ऑस्ट्रेलिया व  अमेरिकेमध्ये ते ५०० पौंड म्हणजे २२७ कि.ग्रा. इतके असते, तर इजिप्तमध्ये ते ३२७ कि.ग्रा. इतके असते.
कापसाच्या या गाठी सूतगिरणीमध्ये कच्चा माल म्हणून कताईसाठी आणल्या जातात. या गाठींमध्ये कापूस हा मोठय़ा दाबाखाली ठासून भरलेला असतो. याशिवाय कापूसवेचणीच्या वेळी कापसाबरोबर वेचले गेलेले अनेक पदार्थ यामध्ये समाविष्ट असतात. यामध्ये कापसाच्या झाडाची वाळलेली पाने, बोंडाची देठे व कवचाचे तुटके भाग, माती व वाळू यांचा समावेश असतो.
गाठीतील कापसापासून सूत बनविताना त्यामुळे प्रथम गाठीतील कापसाचे गठ्ठे मोकळे करून कापूस पूर्णपणे िपजावा लागतो. कापूस िपजतानाच त्यामधील सर्व कचरा काढून टाकून कापूस स्वच्छ करावा लागतो. कापूस पूर्णपणे िपजणे म्हणजे कापसातील प्रत्येक तंतू एकमेकापासून सुटा करणे. अशा रीतीने कापसातील तंतू सुटे केल्यानंतर त्यांचा सलग असा पेळू तयार करावा लागतो. नंतर या पेळूची जाडी कमी कमी करत सुताला आवश्यक एवढी केल्यानंतर त्याला पीळ देऊन सूत बॉबिनवर गुंडाळावे लागते. या सर्व प्रक्रिया एकाच टप्प्यात करणे अशक्य असते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांत करणे आवश्यक ठरते. ज्या टप्प्यात पेळूची जाडी सुतास आवश्यक तेवढी कमी करून सुताला पीळ देऊन ते बॉबिनवर गुंडाळले जाते त्या अंतिम टप्प्यास कताई प्रक्रिया (स्पििनग) असे म्हणतात. या आधीच्या अनेक टप्प्यांत जेथे कापूस पूर्णपणे िपजला जातो, कचरा काढून टाकला जातो, पेळू तयार केला जातो आणि पेळूची जाडी काही प्रमाणात कमी केली जाते या सर्व टप्प्यांना कताईपूर्व प्रक्रिया असे म्हणतात.
चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ – office@mavipamumbai.org