स्वातंत्र्यपूर्व काळात काही संस्थानांनी स्वत:ची रेल्वे सेवा सुरू केली. रेल्वे सेवा सुरू करणाऱ्या सुरुवातीच्या संस्थानांमध्ये कच्छ संस्थान होते. ‘कच्छ स्टेट रेल्वे’ असे नाव असलेल्या या नॅरो गेज (रुंदी अडीच फूट) रेल्वेचे काम महाराव खेनगारजी तृतीय यांनी १९०० साली सुरू केले. त्यावेळी कच्छ हे ब्रिटिश संरक्षित संस्थान असले तरी सर्व खर्च कच्छच्या शासकांनीच केला. १९०० साली तुना बंदर ते अंजर या रेल्वे मार्गाचे उभारणीचे काम सुरू झाले. ते १९०५ साली पूर्ण होऊन त्याच वर्षी ही रेल्वे सेवा सुरू झाली. १९०२ साली अंजर ते राज्याची राजधानी भूज या रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले आणि १९०८ साली ते पूर्ण होऊन रेल्वे सेवा सुरू झाली. तुना बंदर ते अंजर आणि अंजर ते भूज हे एकूण ३६ मल लांबीच्या रेल्वे मार्गावरून रेल्वे धावू लागली. या रेल्वे सेवेचा उपयोग प्रवाशांपेक्षा धान्य, कापूस आणि साखर अशा मालवाहतुकीसाठी अधिक केला जात होता. अंजर ते कांडला हा आणखी ४७ मल लांबीचा रेल्वे मार्ग १९३२ साली तयार होऊन ती रेल्वे सेवा सुरू झाली. कच्छ रेल्वेची मालकी, रेल्वेचे व्यवस्थापन आणि देखभाल संपूर्णपणे कच्छच्या राजांकडेच होती. रेल्वे मार्गाचे तंत्रज्ञान आणि आराखडा ब्रिटिश तंत्रज्ञांनीच बनविले होते, परंतु रेल्वे मार्गाची उभारणी आणि बांधकाम मात्र कच्छमधील के. जी. के. (कच्छ, गुर्जर, क्षत्रिय) या समाजाच्या लोकांनी केले. कच्छ स्टेट रेल्वेचे प्रशासन इतके उत्तम होते की स्वतंत्र भारतात कच्छ संस्थान विलीन झाल्यावरही तिचे स्वतंत्र अस्तित्व राखण्यात आले. पुढे ५ नोव्हेंबर १९५१ रोजी कच्छ स्टेट रेल्वे पश्चिम रेल्वेत विलीन करण्यात आली.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल: म्यूल – सूतकताई साचा (भाग २)
सर्वात प्रथम विकसित केलेल्या म्यूलमध्ये एक स्थिर अडणी (क्रिल) असून त्यामध्ये वातीच्या बॉबिन्स बसविल्या जात होत्या. या बॉबिनवरील वात पुढे चार रूळ जोडय़ांच्या खेच व्यवस्थेमधील खेच रुळांतून पुढे पाठविली जात असे. या रुळांमधून जाताना वातीची जाडी कातल्या जाणाऱ्या सुतास आवश्यक तेवढी कमी केली जात असे.  
या खेच रुळांच्या पुढे एक चाकाची गाडी (कॅरेज) ठेवलेली असते. या गाडीवर कताईची चाती बसवलेली sam02असतात आणि या चात्यांवर ज्यावर सूत गुंडाळले जाणार असते त्या बॉबिन बसविलेल्या असतात. या गाडीची चाके खालील बाजूस असलेल्या आगगाडीच्या रुळांसारख्या रुळांवर टेकलेली असतात. या रुळांवरून ही गाडी मागे-पुढे करून खेच रुळांच्या जवळ किंवा त्यांपासून दूर नेता यते. बॉबिनच्या मागील बाजूस खाली व वर होणारे आकडे (फॉलर्स) बसविलेले असतात. या आकडय़ांच्या साहाय्याने बॉबिनवर गुंडाळले जाणारे सूत आवश्यक तेव्हा वर किंवा खाली करता येते.
कताई सुरू करताना चात्यांची गाडी ही खेच रुळांच्या जवळ नेली जाते. खेच रुळांना गती देऊन बॉबिन्सवरील वात ओढली जाते व ती मागील रुळांमधून पुढे पाठविली जाते. या प्रक्रियेमध्ये वात खेचली जाऊन तिची जाडी कमी केली जाते. जेव्हा ही वात सर्वात पुढे असलेल्या खेच रुळांमधून बाहेर पडते त्यावेळी तिची जाडी ही कातल्या जाणाऱ्या सुतास लागते तेवढी झालेली असते. खेच रूळ फिरत असताना गाडी ही त्यांच्यापासून दूर नेली जाते आणि त्याच वेळी चात्याला व त्यामुळे बॉबिनला गती देण्यात येते. याच वेळी बॉबिन मागील आकडय़ांनी सूत वर उचलले जाते, त्यामुळे सूत बॉबिनवर न गुंडाळता त्याला पीळ बसू लागतो. गाडी पूर्णपणे मागे गेल्यावर खेच रुळांचे फिरणे थांबविले जाते. यावेळेपर्यंत खेच रूळ ते गाडीवरील चाते या अंतराएवढे सूत पीळ देऊन तयार झालेले असते. नंतर गाडी हळूहळू पुढे नेण्यात येते. याच वेळी बॉबिनमागील आकडे खाली आणण्यात येतात व बॉबिन धीम्या गतीने फिरविण्यात येते. यामुळे तयार झालेले सूत बॉबिनवर गुंडाळले जाते. अशा रीतीने म्यूल साच्यावर सूतकताई केली जाते. म्यूलवर उत्पादित होणाऱ्या सुताची गुणवत्ता ही आधीच्या सर्व यंत्रांच्या तुलनेने खूपच वरच्या दर्जाची होती.
– चं. द. काणे  (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ – office@mavipamumbai.org