15 February 2019

News Flash

कुतूहल : स्कँडिअम-‘डी’ खंडातील पहिले!

आता भौतिक गुणधर्म पाहू! स्कँडिअमचा अणुभार ४५ आहे.

आवर्त सारणीमध्ये तिसऱ्या गणातील ‘डी’ खंडातलं स्कँडिअम हे पहिलं मूलद्रव्य! ‘डी’ खंडातल्या मूलद्रव्यांना संक्रामक (transition) मूलद्रव्य म्हणतात आणि त्यांच्या बाह्यतम दोन कक्षा अपूर्ण असतात. इलेक्ट्रॉन्सच्या मांडणीनुसार स्कँडिअमला चौथ्या आवर्तनात ‘डी’ खंडात जरी बसवलं असलं तरी त्याचं हे स्थान काही शास्त्रज्ञांना मान्य नाही. त्यांच्या मते स्कँडिअमचे गुणधर्म ‘डी’ खंडातल्या इतर मूलद्रव्यांपेक्षा वेगळे असून, ते लँथेनाइड गटातल्या मूलद्रव्यांशी जास्त जुळतात.

आता भौतिक गुणधर्म पाहू! स्कँडिअमचा अणुभार ४५ आहे. चमकदार चांदीसारख्या पांढरट रंगाचा हा मऊ पोताचा धातू सामान्य तापमानाला स्थायूरूपात आढळतो. स्थायू असताना त्याची घनता पाण्याच्या तिप्पट म्हणजे २.९८५ ग्रॅम प्रति घनसेंमी इतकी असते, तर द्रवरूपातली घनता २.८ ग्रॅम प्रति घनसेंमी इतकी असते. स्कँडिअमचा  वितळणिबदू (१५४१ अंश सेल्सिअस) जरा जास्त आहे;  तसाच त्याचा उत्कलनिबदूही (२८३६ अंश सेल्सिअस) जास्त आहे. नैसर्गिकरीत्या २४ न्यूट्रॉन्स असलेलं स्कँडिअम म्हणजे Sc४५ हे एकच समस्थानिक आढळतं. पण प्रयोगशाळेत स्कँडिअमची १३ कृत्रिम समस्थानिकं तयार केली गेली आहेत.

स्कँडिअमचे रासायनिक गुणधर्म म्हणजे ते आम्लांशी पटकन संयोग पावतं, पण त्या तुलनेत हवेतील ऑक्सिजनशी तितक्या लवकर संयोग पावत नाही. त्याची ऑक्सिजनशी अभिक्रिया झाली की पिवळ्या-गुलाबी रंगाचं स्कँडिअम ऑक्साइड तयार होतं.

स्कँडिअम अणूची इलेक्ट्रॉनिक संरचना [Ar] ३d१४s२ आहे. म्हणजेच स्कँडिअमची इलेक्ट्रॉन संयुजा ३ आहे. याचा अर्थ स्कँडिअम अणूला स्थिरता येण्यासाठी हे ३ इलेक्ट्रॉन्स काढावे किंवा द्यावे लागतील. सर्वसाधारणपणे दुसऱ्या मूलद्रव्यांशी संयोग होताना बाह्यतम कक्षांतील हे ३ इलेक्ट्रॉन्स दिले जातात. त्यामुळे स्कँडिअम आयन दर्शवताना Sc+३असं लिहिलं जातं. दिलेल्या इलेक्ट्रॉन्सच्या संख्येनुसार स्कँडिअमचे  Sc+२ व  Sc+१ असेही आयन असू शकतात. पण ते Sc+3 इतके स्थिर नसतात.

पृथ्वीवर स्कँडिअम जास्त प्रमाणात आहे, पण संयुगांच्या स्वरूपात! त्याची खनिजं विखुरलेली असल्यानं त्यापासून शुद्ध स्कँडिअम मिळवणं जिकिरीचं काम आहे. शुद्ध स्कँडिअम आपल्याला सहज मिळत नाही व पाहताही येत नाही; त्यामुळेच ते आपल्या खूप परिचयाचं नाही.

चारुशीला जुईकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on April 17, 2018 3:54 am

Web Title: scandium d