13 December 2019

News Flash

कुतूहल : विखुरणारा प्रकाश

रामन यांनी आपल्या प्रयोगांसाठी प्रकाशाचा स्रोत म्हणून सूर्यप्रकाशाचा वापर केला.

(संग्रहित छायाचित्र)

सन १९२१ मधली गोष्ट. भारतीय संशोधक चंद्रशेखर वेंकट रामन हे लंडनला भेट देऊन परतताना भूमध्य सागरातून प्रवास करत होते. यावेळी समुद्राच्या निळ्या रंगाविषयी त्यांच्या मनात विचार आले-‘समुद्र निळा दिसण्याचे कारण, पाण्याच्या पृष्ठभागावरून झालेले आकाशाच्या निळ्या रंगाचे परावर्तन (रिफ्लेक्शन) हे नसून, पाण्याच्या रेणूंकडून होत असलेले या प्रकाशाचे विखुरणे (स्कॅटरिंग), हे असावे!’ या काळात प्रकाशाच्या विखुरण्यावरच त्यांचे संशोधन चालू असल्याने, प्रकाशाच्या विखुरण्यावर त्यांचे विचारचक्र चालू असायचे. कोलकात्याला परतल्यावर त्यांनी कृष्णन या त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर प्रकाशाच्या विखुरण्यावर आपले प्रयोग सुरू केले.

रामन यांनी आपल्या प्रयोगांसाठी प्रकाशाचा स्रोत म्हणून सूर्यप्रकाशाचा वापर केला. जांभळ्या रंगाच्या काचेचे फिल्टर वापरून, या सूर्यप्रकाशातील फक्त जांभळा प्रकाश त्यांनी पुढे जाऊ  दिला. हा प्रकाश बेंझिन भरलेल्या काचेच्या कुपीतून पार झाला. या कुपीतील बेंझिनच्या रेणूंमुळे वेगवेगळ्या दिशांना विखुरल्या गेलेल्या प्रकाशाचे त्यांनी निरीक्षण केले. प्रथम त्यांनी फक्त जांभळा प्रकाश जाऊ देणारे जांभळे फिल्टर वापरले. या फिल्टरमधून त्यांना विखुरलेला जांभळा प्रकाश दिसला. विखुरलेल्या प्रकाशाचा रंग किंवा तरंगलांबी ही मूळ प्रकाशाइतकीच असणे, हे लॉर्ड रेले या इंग्लिश शास्त्रज्ञाच्या सिद्धांतानुसार अपेक्षितच होते. बेंझिनने विखुरलेल्या प्रकाशाच्या पुढील निरीक्षणांसाठी त्यांनी इतर रंगांची फिल्टर वापरली. यातील हिरव्या रंगाच्या फिल्टरमधून त्यांना अतिशय अंधूक असा हिरवा प्रकाश दिसला. मूळचा प्रकाश जांभळा असताना विखुरलेल्या प्रकाशात हिरवा प्रकाश दिसणे, हे मात्र अनपेक्षित होते. विखुरल्यानंतर मूळ प्रकाशापेक्षा वेगळ्या तरंगलांबीचा प्रकाश निर्माण होणे, हाच तो रामन परिणाम!

सुरुवातीला डोळ्यांनी केलेल्या निरीक्षणांनंतर रामन यांनी विखुरलेल्या प्रकाशाच्या तरंगलांबीच्या अचूक मापनासाठी वर्णपटमापक वापरला, तसेच सूर्यप्रकाशाऐवजी प्रखर मक्र्युरी लॅम्पचा वापर केला. साठाहून अधिक अतिशुद्ध पदार्थासाठी हा परिणाम तपासून आपल्या निष्कर्षांची खात्री केल्यानंतर, रामन यांनी आपले निष्कर्ष १९२८च्या मार्च महिन्यातील ‘इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स’मध्ये प्रसिद्ध केले. विखुरलेल्या प्रकाशाची तरंगलांबी ही रेणूंनुसार वेगवेगळी असते. त्यामुळे अशा विखुरलेल्या प्रकाशाच्या मापनाद्वारे पदार्थातील रेणूंची ओळख पटू शकते. रसायनशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरू शकणाऱ्या या शोधासाठी रामन हे १९३० सालच्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरले.

डॉ. वर्षां चिटणीस

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

First Published on July 30, 2019 12:09 am

Web Title: scatter light reflection abn 97
Just Now!
X