श्रुती पानसे contact@shrutipanse.com

घरात शिस्त कशी लावावी, हा कळीचा मुद्दा असतो. वास्तविक चांगली शिस्त लागणं ही एक सकारात्मक गोष्ट आहे. पण ती अंगवळणी पडण्यासाठी नकारात्मक मार्गाचा अवलंब केला जातो. इथे थोडा गोंधळ आहे.

मुलांनी वेडंवाकडं वागू नये, त्यांच्या आयुष्याला नीटनेटकेपणा असावा यासाठी मुलांना तयार करावं लागतं. त्यामुळे शिस्त ही एक आवश्यक गोष्ट आहे. पण केवळ धाकापोटी नाही, तर स्वत:ला हवं म्हणून आणि पालक किंवा शाळेत शिक्षकांबद्दल असलेला आदर म्हणून अंगी शिस्त यायला हवी.

पसारा आवरायचा आहे; अभ्यास करायचा आहे; गृहपाठ करून ठेवलेली वही विसरायची नाही; वर्गात शिक्षक बोलत असतील तर ते ऐकायचं; हे का ऐकायचं? शिक्षा होईल म्हणून ऐकायचं की स्वत:ला योग्य वाटतं म्हणून ऐकायचं?

यासाठी घरातल्या सर्वानी शिस्तीनं वागायला हवं. कोणाचीही तक्रार असू नये यासाठी घरातली कामं वाटून घेणं, प्रत्येकानं आपापली कामं करणं यावर सर्वाची सहमती घडवून आणावी लागेल. घरातली शिस्त ही धाक दाखवल्याशिवायही लागू शकते.

कदाचित हा मार्ग थोडा अवघड असेल. पण शांतपणा, संयम आणि प्रत्येकाची स्वयंशिस्त हे जमलं तर परिणाम कायमस्वरूपी होतील.

जेव्हा मुलं इतरांच्या संगतीत येतात, तेव्हा ही शिस्त काहीशी बिघडणं नैसर्गिक आहे. एकदा स्वयंशिस्तीचा पाया पक्का असेल तर अशी वळणं येऊन जातील; पण मूळ सवयींत फरक पडणार नाही.

शिस्त लागणं म्हणजे विशिष्ट प्रकारची सवय लागणं. सवय ही बाब न्यूरॉन्सच्या जोडण्यांवर अवलंबून असते. न्यूरॉन्सचं ‘हार्डवायिरग’ झालं, की सवय अंगवळणी पडते. सकारात्मकरीत्या न्यूरॉन्स जुळणं हे फार महत्त्वाचं आहे. एकदा ही जोडणी झाली, की ती सवय लागते.

पण जेव्हा जेव्हा शिस्त लावण्यासाठी मुलांच्या मनात धाक निर्माण करून ठेवणं, प्रत्यक्ष मारहाण करणं, जोरात ओरडणं, अपमानकारक बोलणं आणि मोठय़ा शिक्षा.. अशा गोष्टींची भीती दाखवली जाते, तेव्हा शिस्तीशी नकारात्मक जोडण्या करून ठेवल्या जातात. नकारात्मक जोडण्या असल्यामुळेच शिस्त मोडण्याची इच्छा होते, बंड करावंसं वाटतं. लपूनछपून शिस्त मोडण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. याने कधीही स्वयंशिस्त लागत नाही हे एकप्रकारे सिद्ध होतं.