25 April 2019

News Flash

सीबोर्जिअम : हयात शास्त्रज्ञाचा सन्मान

सीबोर्गनी जेव्हा कारकीर्द सुरू केली तो काळ होता अणूची रचना उमगण्याचा.

शास्त्रज्ञ जिवंत असताना त्याचे नाव मूलद्रव्याला देण्याची परंपरा नसताना, १०६ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याचे नामकरण सीबोर्ग यांच्या नावावरून त्यांच्या हयातीत केल्याचे प्रथमच घडले.

जून १९६४मध्ये रशियातील डबनास्थित संशोधकांनी शिसे-२०७ व शिसे-२०८ समस्थानिकांवर क्रोमिअम-५४ च्या विद्युतभारित कणांचा मारा करून १०६ अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्याची नोंद केली. त्याच सुमारास अमेरिकेतील बर्कले येथील चमूने रशियाच्या संशोधकांचा दावा फोल ठरवत आपले निष्कर्ष मांडले. त्यांनी कॅलिफोíनअमवर ऑक्सिजन-१८ च्या विद्युतभारित कणांचा मारा करून सदर मूलद्रव्य तयार केले. १९९३ साली बर्कले चमूचे संशोधन ग्राह्य़ धरत त्यांना सीबोर्जिअमच्या निर्मितेचे श्रेय दिले. त्या संशोधकांच्या गटातील एक सदस्य होते ग्लेन सीबोर्ग.

सीबोर्गनी जेव्हा कारकीर्द सुरू केली तो काळ होता अणूची रचना उमगण्याचा. आवर्तसारणीतील शेवटचे मूलद्रव्य युरेनिअम(९२) असावे हा समज जेव्हा पक्का होता त्या काळात काही मूलद्रव्यांचे अणुसंमीलन (fusion) अथवा विखंडन (fission) करून मूलद्रव्याच्या प्रोटॉन्सच्या संख्येत बदल घडवत नवीन मूलद्रव्य निर्माण होऊ शकेल या विचाराने झपाटलेल्या काही मोजक्या शास्त्रज्ञांच्या पंक्तीत होते नोबेल पदक विजेते ग्लेन सीबोर्ग. परंतु असे नवनिर्मित कृत्रिम मूलद्रव्य अत्यंत सूक्ष्म असून त्याला इतर मलब्यापासून वेगळं करणं एक आव्हान होतं. सीबोर्गनी अशा मूलद्रव्यांसाठी रासायनिक विभेद पद्धत विकसित केली.

आवर्तसारणीत सीबोर्जिअमचे स्थान सहाव्या गणात टंग्स्टनच्या खालोखाल असून त्यांच्या काही रासायनिक गुणधर्मात साधम्र्य आढळते. निसर्गात न आढळणारे व प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या तयार होणारे सीबोर्जिअम किरणोत्सर्गी असून त्याच्या १२ समस्थानिकांचे अर्धायुष्यमान ९० मायक्रो सेकंदपासून ३.१ मिनिटांपर्यंत नोंदवले आहे. यापकी रॠ  -२७१ हा समस्थानिक सर्वात स्थिर असून त्याचे अर्धायुष्यमान फक्त ३.१ मिनिटे आहे. तासाला एका अणूची निर्मिती व सहज क्षयाची जलद गती यामुळे त्याच्या गुणधर्माची माहिती मर्यादित आहे. तो घन स्वरूपी असावा व त्याच्या रेणूंची रचना टंग्स्टनसारखी केंद्रित क्युबिक असावी. घनतेच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर असून फक्त तीन मूलद्रव्यांची घनता त्याच्यापेक्षा जास्त आहे.

– मीनल टिपणीस

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org

First Published on December 7, 2018 12:03 am

Web Title: seaborgium chemical element