17 January 2019

News Flash

कुतूहल : सीमॅप

१९५९ साली लखनौ येथे सेंट्रल इंडियन मेडिसीनल प्लांटस् ऑर्गनायझेशन ही संस्था स्थापन झाली, जी आता सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिसीनल अ‍ॅण्ड एरोमेटिक प्लांट्स (सीमॅप) या

| February 5, 2013 12:42 pm

१९५९ साली लखनौ येथे सेंट्रल इंडियन मेडिसीनल प्लांटस्  ऑर्गनायझेशन ही संस्था स्थापन झाली, जी आता सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिसीनल अ‍ॅण्ड एरोमेटिक प्लांट्स (सीमॅप) या नावाने ओळखली जाते. नंतर संस्थेच्या बंगळूरू (कर्नाटक), हैदराबाद (आंध्र प्रदेश) आणि पंतनगर व पुरारा (उत्तराखंड) अशा वेगवेगळ्या हवामानासाठी प्रयोगशाळा स्थापन झाल्या.
मुख्यत: पुदिन्याच्या विविध जातींवर संशोधन करून जागतिक पातळीवर भारताची ओळख करून देण्यात व आपल्या अर्थव्यवस्थेला मोलाचा हातभार लावण्यात या संस्थेचा मोठा सहभाग आहे. पचौली, दवणा, लेमनग्रास, पामरोझा, जिरॅनियम, अश्वगंधा, शंखपुष्पी अशा अनेक औषधी व सुगंधी वनस्पतींची मूळ वाणं बिया, पेशी, ऊती, डीएनए अशा रूपात जपण्यासाठी जगातील एक मोठी जीन बँक हे या संस्थेचे एक महत्त्वाचे कार्य आहे. याच्या साहाय्याने या बहुमोल वनस्पतींच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या नव्या जाती शोधता येतात, ज्यांची लागवड काहीशा निकृष्ट जमिनीतही करता येईल. अशा वनस्पतींतून अधिक मौल्यवान अशी औषधी व सुगंधी द्रव्ये मिळू शकतात.  
भारतातील सूक्ष्मजीव वैविध्याचा शोध, वातावरणाचे पुनस्र्थापन, जलप्रदूषणाचे नियंत्रण अशा विविध विषयांवर संस्थेचे कार्य सुरू असते. त्याशिवाय पूर्वापार चालत आलेल्या ज्ञानाचे शास्त्रोक्त टिपण तयार करणे, कडुिनब व दवणा यांचा सखोल अभ्यासही सुरू आहे. शतावरी, गुलाब, कालमेघ, रोजमेरी, तुळस अशा वनस्पतींच्या लागवडीसाठी त्यांची रोपे व छोटय़ा पुस्तिका सर्व प्रादेशिक भाषांतून संस्थेत उपलब्ध आहेत. संस्थेच्या जर्नल ऑफ मेडिसीनल अ‍ॅण्ड एरोमॅटिक प्लान्ट्स सायन्सेस या वैज्ञानिक मासिकातून नवनवीन शोधांची, प्रणालींची अद्ययावत माहिती प्रसारित होत असते.                
आज नव्या शोधांचे पेटंट घेणे अनिवार्य बनले आहे. त्यानुसार संस्थेने दवणा, िमट अशा काही व्यापारी उपयोगाच्या बहुमोल वनस्पतींची लागवड व त्यातून द्रव्ये वेगळी करण्याच्या प्रक्रियेची १३५ पेटंट्स घेतली आहेत, ज्यायोगे त्यांच्या उत्पादनावर आपले स्वामित्व राहील. या संस्थेला राष्ट्रीय जीव वैविध्याचे संग्रहालय म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. संस्थेने पंख पसरून आता अधिक संशोधनासाठी मलेशिया व गुलाब अत्तरासाठी बल्गेरिया या देशांशी करार केला आहे.
डॉ. विद्याधर ओगले
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

आजचे महाराष्ट्रसारस्वत : ५ फेब्रुवारी
१८४५ – भाषांतरकार आनंदराव सखाराम बर्वे यांचा जन्म. शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ नाटकाचे ‘हिंमत बहाद्दर’ आणि कॅप्टन मॅडोजच्या पुस्तकाचे ‘ढगाची जबानी’ ही त्यांची पुस्तके.
१९१४ – संत साहित्याचे अभ्यासक डॉ. शंकर गोपाळ तुळपुळे यांचा जन्म. प्राचीन मराठी शब्दकोश तयार करण्यात त्यांचे मोठे योगदान ठरते. त्याव्दारे सहा हजार प्राचीन मराठी शब्दांचा आढावा घोतला गेला.
१९२० – वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळणारे भागवतधर्मप्रचारक, किर्तनकार, प्रवचनकार, लेखक विष्णु नरसिंह जोग यांचे निधन. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १८६४ रोजी पुणे येथे झाला. औपचारिक शिक्षण बेताचेच झाले असले तरी त्यांनी मोठी साहित्य सेवा केली. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे अर्थ लावून सार्थ गाथा सिद्ध केली. त्याचप्रमाणे ‘आर्य अमृतानुभव’ प्रसिद्ध केला. याशिवाय निळोबांच्या व ज्ञानेश्वरमहारांच्या वर्गीकृत गाथा, सार्थ हरिपाठ, चांगदेव पासष्ठी, एकनाथी भागवतादी सहा ग्रंथ, वेदांत विचार, महिपतीकृत ज्ञानेश्वरीतील सार्थ व सविवरण अनुभवामृत, नामदेवाची गाथा आदी ग्रंथ लिहिले. वारकरी संप्रदायाचे शिक्षण देण्यासाठी स्वखर्चाने त्यांनी वारकरी संस्था स्थापन केली.
१९३३ – कथाकथनकार, कथालेखिका गिरिजा उमाकांत कीर यांचा जन्म.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस : केसांचे विकार : भाग २
केसांच्या विकाराची कारणे अनेक आहेत. दिवसेंदिवस तरुण मुलेमुली किंवा व्यवसायामुळे बाहेर जेवणारी मंडळी शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ, दही, लोणचे, पापड, पाव, मांसाहार अशांचा ‘लगातार-बेसुमार’ वापर करताना दिसतात. अकारण साबण, शाम्पू वापरतात. केसांत कोंडा असतानाही तेल लावतात. काही मंडळींना अंघोळीकरिता मिळणारे पाणी, त्यांच्या दुर्दैवाने खूप प्रदूषित असते.  विविध विकारांकरिता स्ट्राँग औषधे घेतल्यास केसांच्या मुळाशी रक्तपुरवठा कमी पडतो. चाई या विकारात एक अत्यंत सूक्ष्म कीड डोक्याला वा चेहऱ्याला नकळत लागते, चाई पडते. आपण केस गळणे, टक्कल पडणे, केस पिकणे, केसांत कोंडा, खवडे वा उवा होणे, चाई लागणे व केसांच्या मुळाशी उष्णता वाढणे यांचाच विचार करत आहोत. समस्त केसविकारात मीठ हा शत्रू आहे असे समजून चालावे. लोणची, पापड, दही, शिळे अन्न, हॉटेलिंग, मांसाहार, जागरण, साबण, सोडा कटाक्षाने टाळावे. कोंडा असताना, फारच आवश्यक असल्यास करंजेल तेल कापूर मिसळून रात्री लावावे.सर्व प्रकारच्या केसाच्या तक्रारींकरिता आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा प्रत्येकी ३ गोळय़ा, रसायनचूर्ण अर्धा चमचा, सुंठचूर्ण पाव चमचा दोन वेळा जेवणाअगोदर घ्यावे. काहींना आरोग्यवर्धिनीच्या कडू चवीचा त्रास होतो, पोट दुखते, त्यांनी लघुसूतशेखर तीन गोळय़ा हे जादा औषध घ्यावे. केस गळणे हीच समस्या असल्यास वटजटादि/आमलक्यादि तेल सायंकाळी लावावे. ओला नारळ खवून ते ओले खोबरे थोडय़ा पाण्यात मिसळावे, एकत्र पिळावे, ते दूध आटवावे. उत्तम नारिकेल बनते. ते वापरावे. केस पिकत असल्यास महाभृंगराज तेल लावावे. केसात कोंडा असल्यास आवळकाठी, नागरमोथा, बावचीचूर्णयुक्त केश्यचूर्णाचा केस धुण्याकरिता वापर करावा. खवडे, उवा याकरिता कापूरयुक्त करंजेल तेल रात्री लावावे. सकाळी शिकेकाई किंवा केश्यचूर्णाने केस धुवावे. चाई लागल्यास त्या जागी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, थंड हवामान असताना, सायंकाळी बिब्बा किंवा जमालगोटय़ाचा युक्तिपूर्वक लेप लावावा.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..  : कर्करोग
कर्करोगाचा- कॅन्सरचा रोगी मी मेडिकलच्या तिसऱ्या वर्षांत बघितला. त्याच्या तोंडाच्या आसपास एक गोळा तयार झाला होता. त्यावरची त्वचा नासली होती. त्यातून रक्त गळत होते. तोंड नीट उघडता येत नव्हते आणि अनेक आठवडे नीट न जेवल्यामुळे त्याचे शरीर सापळ्यासारखे भासत होते. कर्करोग तंबाखूमुळे होतो, चुन्यामुळे होतो, सुपारीमुळे होतो, सिगरेटमधल्या धुरामुळे होतो. पान मसाल्यातल्या एखाद्या रसायनामुळे होतो की एकच दाहक गोष्ट एकेच ठिकाणी तासन्तास ठेवल्यामुळे होतो की असे ठेवल्यामुळे तोंडाचे आरोग्य बिघडल्यामुळे होतो याचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. तरीही तंबाखू नावाच्या उत्तेजक द्रव्याच्या अवतीभोवतीच हे सर्व होत असल्यामुळे तंबाखूलाच मूळ सूत्रधार धरून त्याबद्दल मोहीम चालवणे अगदीच योग्यच. शेवटी झिंग चढते तंबाखूमुळे म्हणूनच ती मिश्रण करून चघळतात आणि कागदाच्या वेष्टणात घालून पेटवतात. आणखीही त्यात एक गोम आहे. वरील वर्णन दहा वर्षे त्याच प्रमाणात लागू पडणाऱ्या सगळ्यांनाच कर्करोग होत नाही. याचे एक कारण असे दिसते की, कर्करोग होणार की नाही हे काही प्रमाणात आपल्या जनुकांवर (genes) वर ठरते. अर्थात एकेच ठिकाणी जर इजा होत असेल आणि ती जखम बरी करण्याच्या प्रयत्नात जर निसर्गाचा तोल गेला आणि तो रागवला तर बरे करण्याची प्रक्रिया भस्मासुरासारखी वाढते आणि त्याचे रूपांतर कर्करोगात होते. आणि तरीही भूक भागत नाही म्हणून त्या पेशी इतर भागांवर स्वारी करतात. मी शिकत होतो तेव्हा कर्करोगाकडे बघण्याचा दृष्टिकोण या पेशींकडे दुर्लक्ष करत असे किंवा या दहशतवादी पेशींचे स्वरूपच त्या वेळी कळलेले नव्हते. तेव्हा दिसला Cancer की काप त्याला एवढेच उपचाराचे स्वरूप होते. एका गाढवाने मडक्यात डोके घातले. ते मडके त्याच्या मानेत अडकले. मग ते गाढव रेकू लागले. तेव्हा गाव जमले आणि मडके निघेना तेव्हा त्या गाढवाचे शिरच उडवले. अशी एक गोष्ट आहे. तसेच थोडे फार पूर्वी कर्करोगाबद्दल होते असे म्हणता येईल. जे Cancer उघड दिसत नसत उदा. रक्ताचे कर्करोग यांना जवळजवळ औषधेच नव्हती कारण अब्जावधी पेशी कापणार किंवा काढणार तरी कशा? मग    Xx-rays चा शोध लागला आणि त्याच्या किरणांमुळे कॅन्सरच्या पेशी मरतात हे कळल्यामुळे ती उपचार पद्धती काही तरी जालीम औषध सापडले म्हणून भरमसाट वापरण्यात येऊ लागली. X-ray ना थोडीच अक्कल असते त्यांनी कर्करोगाच्या पेशी आणि इतर सर्व पेशी यांची कत्तल सुरू केली. तेव्हा मग कर्करोगाच्या पेशींच्या अंतरंगाची, त्यांच्या स्वभावाची, त्यांच्या गरजांची, त्यांच्या रचनेची सूक्ष्म तपासणी होऊ लागली आणि कर्करोगाविरुद्धच्या लढय़ाला नवी दिशा मिळाली.
रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com

First Published on February 5, 2013 12:42 pm

Web Title: see map
टॅग Navneet