26 February 2021

News Flash

कुतूहल : पृथ्वीच्या पोटात..

१८८०च्या दशकात त्याने तयार केलेल्या उपकरणातल्या लंबकाला एका यंत्रणेद्वारे लेखणी जोडलेली होती.

भूपृष्ठापासून वर थेट चंद्रापर्यंत माणूस पोहोचला, पण भूपृष्ठाच्या खाली फार खोलवर जाणे मात्र माणसाला जमले नाही. तरीही पृथ्वीच्या पोटात काय दडले आहे, हे माणसाने भूकंपाच्या मापनांद्वारे शोधून काढले. भूकंपाच्या अचूक मापनासाठी साधन तयार करण्याचे प्रयत्न अठराव्या शतकात सुरू झाले. या भूकंप मापनाच्या साधनांत एक लंबक टांगलेला असे. या लंबकाचे टोक खाली ठेवलेल्या वाळूला स्पर्श करत असे. भूकंप झाल्यावर वाळू कंप पावत असे, पण लंबक मात्र जडत्वामुळे स्थिर राहात असे. त्यामुळे वाळूत रेषा उमटून भूकंपाची नोंद व्हायची. मात्र यावरून भूकंप ‘झाला’ एवढेच कळत असे. या उपकरणात महत्त्वाची सुधारणा केली ती भूकंपग्रस्त जपानमधील, टोकिओच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील इंग्लिश प्राध्यापक जॉन मिल्ने याने. १८८०च्या दशकात त्याने तयार केलेल्या उपकरणातल्या लंबकाला एका यंत्रणेद्वारे लेखणी जोडलेली होती. ही लेखणी एका सतत फिरणाऱ्या ड्रमला स्पर्श करत असे. भूंकपाच्या वेळी लंबक स्थिर असे, परंतु ड्रम हलत असे. फिरत्या ड्रमच्या या हालचाली, त्यावरील कागदावर वेळेनुसार या लेखणीद्वारे नोंदल्या जात. ही उपकरणे अनेक ठिकाणी बसवण्यात आली व त्यांवरील एकत्रित नोंदींवरून एखाद्या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली कुठे आहे, हे कळू लागले.

प्रत्येक भूकंपाच्या वेळी पी (प्रायमरी), एस (सेकंडरी) अशा लहरी निर्माण होतात व त्या जमिनीखालून प्रवास करत उपकरणापर्यंत पोहोचतात. पृथ्वीच्या अंतर्भागातून प्रवास करत या लहरी दूरवरच्या भूंकपमापन उपकरणाशी कोणत्या तीव्रतेने आणि किती काळाने पोहोचल्या, यावरून त्यांच्या मार्गात येणाऱ्या पदार्थाचे स्वरूप सांगता येते. या लहरींच्या स्वरूपावरूनच १९१० सालच्या दशकात, क्रोएशियाच्या आंद्रिया मोहोरोविसिकने पृथ्वीच्या खडकाळ कवचाची जाडी फक्त पन्नास किलोमीटर असल्याचे मत व्यक्त केले, तर इंग्लंडच्या रिचर्ड ओल्डहॅमने या कवचाखाली घट्ट द्रवासारखे, सुमारे तीन हजार किलोमीटर जाडीचे, खडकांचे प्रावरण (मँटल) असल्याचे दाखवून दिले. या प्रावरणाखाली वितळलेल्या लोह-निकेलचा द्रवरूपी गाभा सुरू होतो. परंतु या गाभ्यातला केंद्राजवळचा बाराशे किलोमीटर त्रिज्येचा, आत्यंतिक दाबाखालचा भाग घन स्वरूपाचा असल्याचे डेन्मार्कच्या इंगे लेहमान या संशोधिकेने, या लहरींच्या मदतीनेच १९३६ साली शोधून काढले..  आणि याचबरोबर पृथ्वीच्या अंतरंगाचे सर्वसाधारण स्वरूप स्पष्ट झाले!

– डॉ. विद्याधर बोरकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 4:50 am

Web Title: seismometer device to find out earthquake center earthquake warning device
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : मुलांमधल्या भावना
2 मेंदूशी मैत्री : भावनिकदृष्टय़ा समर्थ  =  यशस्वी
3 कुतूहल : संसर्गजन्य प्रथिने
Just Now!
X