News Flash

नवदेशांचा उदयास्त : सेशल्स : फ्रेंचांकडून ब्रिटिशांकडे

फ्रेंच आणि ब्रिटिश सत्तांमध्ये १७५६ ते १७६३ असे सात वर्षं कॅनडा, मॉरिशस वगैरे वसाहतींच्या स्वामित्वासाठी युद्ध झाले

(संग्रहित छायाचित्र)

– सुनीत पोतनीस

मॉरिशस ताब्यात घेऊन पुढे १७४२ साली फ्रेंचांनी समुद्री मार्गाने भारतात कमी वेळात जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी खलाशांना पाठविले. ते खलाशी चुकून मादागास्करच्या उत्तरेला काही बेटांवर आले. काही काळ तिथे थांबून ते खलाशी पुढे निघाले. ती बेटे म्हणजेच आजचे ‘सेशल्स’ होते. पुढे १७५६ साली फ्रेंचांनी फ्रेंच राजाच्या नावाने या द्वीपसमूहांचा ताबा घेऊन त्याला नाव दिले ‘सेशल्स’. फ्रेंच सम्राट लुई पंधराव्याच्या काळात व्हिस्कॉन्ट डी सेशल्स हा एक लोकप्रिय अर्थमंत्री होऊन गेला. त्याच्या नावाने या बेटांचे नामकरण करून मालकी ‘फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी’कडे देण्यात आली.

फ्रेंच आणि ब्रिटिश सत्तांमध्ये १७५६ ते १७६३ असे सात वर्षं कॅनडा, मॉरिशस वगैरे वसाहतींच्या स्वामित्वासाठी युद्ध झाले. या युद्धात ब्रिटनचा विजय होऊन फ्रेंचांनी मॉरिशस सोडण्याचा करार ब्रिटिशांशी केला. १७६४ साली फ्रेंचांनी सेशल्स बेटांची पाहणी करून तिथे वसाहत वाढविण्यासाठी १५ गोरे फ्रेंच, सात गुलाम, पाच हिंदुस्तानी, काही आफ्रिकन स्त्रिया सेशल्सच्या बेटावर पाठविल्या. पुढे फ्रेंचांनी मॉरिशसमधून आणून मोठ्या संख्येने मुक्त गुलाम सेशल्समध्ये वसवले आणि लवंग, दालचिनी, काळीमिरी वगैरे मसाल्यांच्या पदार्थांची लागवड करून घेतली. १७७० मध्ये सेशल्सच्या फ्रेंच वसाहतीत फ्रेंच लोक आणि त्यांचे आफ्रिकन गुलाम येऊन स्थायिक झाले. त्यांनी प्रामुख्याने कापूस आणि उसाची शेती केली व जगात फक्त सेशल्समध्ये आढळणाऱ्या प्रचंड मोठ्या कासवांची शिकार सुरू केली.

पुढे नेपोलियनबरोबर ब्रिटिशांची चाललेली युद्धांची धुमश्चक्री संपल्यानंतर १८१४ साली या दोन साम्राज्यांमध्ये पॅरिस येथे तह झाला. या तहान्वये सेशल्स बेट समूह औपचारिकरीत्या ब्रिटिश अमलाखाली आला. १८१४ पासून १९०३ पर्यंत सेशल्सचा प्रशासकीय कारभार ब्रिटिशांच्या मॉरिशस वसाहत प्रशासनामार्फत चालविला जात होता. या आधीच ब्रिटिशांनी गुलामांचा व्यापार कायद्याने बंद केला होता. या काळात स्पॅनिश आणि अरब दलाल जहाजांमधून गुलामांची ने-आण करीत, त्यांच्यावर ब्रिटिश नौदल हल्ला करून गुलामांना मुक्त करीत आणि त्यांना सेशल्समध्ये मजूर म्हणून काम देत. ब्रिटिशांनी १९०३ साली सेशल्सची एक वसाहत म्हणून स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था नेमून दिली.

sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 12:14 am

Web Title: seychelles from french to british abn 97
Next Stories
1 कुतूहल : सात पुलांची गोष्ट
2 नवदेशांचा उदयास्त : सेशल्स द्वीपसमूह
3 कुतूहल : ऑयलरचा कळीचा स्थिरांक : e
Just Now!
X