१५३४ साली सूरजगढ येथे झालेल्या लढाईत घियासुद्दीनला पराभूत करून शेरखान सुरी या पठाणाने मोगलांची बिहारची सुभेदारी मिळवली. पुढे चार वर्षांनी शेरखानने बंगालवर हल्ला करून काही प्रदेशाचा ताबा मिळवला. त्याचे वाढते लष्करी सामर्थ्य पाहून तत्कालीन मोगल बादशाह हुमायून याने आपली फौज शेरखानावर पाठवली. १५३९च्या जूनमध्ये चौसा येथे शेरखानचे सन्य आणि मोगलांची फौज यांची समोरासमोर गाठ पडून झालेल्या लढाईत शेरखानाने मोगलांचा पराभव केला आणि बंगालचा ताबा घेतला. बिहार, बंगालवर आपला स्वतंत्र अंमल बसवल्यावर आपले साम्राज्य स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्याने स्वत:ला ‘फरीद अल्-दीन शेरशाह’ असा खिताब लावून स्वत:च्या नावाची नाणीही पाडली. आता हे तर मोगल बादशाह हुमायूनला सरळसरळ आव्हान होते. संतप्त झालेल्या हुमायूनने आपले सर्व लष्कर एकत्र करून शेरखानावर पाठविले. कनोज येथे १५४० साली या दोन्ही फौजांमध्ये झालेल्या लढाईत मोगलांचा निर्णायक पराभव होऊन सरभर झालेल्या हुमायूनने हिंदुस्तानातून पळ काढून पर्शियात आश्रय घेतला. अशा प्रकारे दिल्ली येथे राजधानी ठेवून १५४० साली आपले सुरी साम्राज्य स्थापन करणारा शेरशाह एक चोख, प्रतिभाशाली प्रशासक आणि सक्षम सेनापती होता.

शेरशाहने त्याच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अभिनव नागरी आणि सनिकी प्रशासन दिले. ऐतिहासिक पाटलीपुत्र शहराचा विकास करून त्याचे पाटणा हे नामकरण करून त्याने आजचा प्रसिद्ध चितगांव ते काबूल हा ग्रँट ट्रंक रोड रस्ता बांधला. त्या काळात त्याचे नाव होते ‘सडक ए आजम’. टपाल व्यवस्था सुरू करून त्याने रुपया हे १७८ ग्रेन चांदीचे प्रमाणबद्ध चलनी नाणे सुरू केले.

१५४५ साली किलजर किल्ल्याच्या वेढय़ात, सुरुंगाच्या झालेल्या स्फोटात शेरशाह सुरी मारला गेला. त्याच्यानंतर हे सुरी साम्राज्य पुढे १५५५ पर्यंत टिकले. शेरशाहच्या कारकीर्दीत पठाण जमातीचे अफगाण लोक मोठय़ा संख्येने, विशेषत: बिहारमध्ये येऊन स्थायिक झाले.

sunitpotnis@rediffmail.com