News Flash

नवदेशांचा उदयास्त : सिएरा लिओन : शेतीप्रधान हिरेनिर्यातदार!

सुमारे ९० लाख लोकसंख्या असलेल्या सिएरा लिओनमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.

भातशेती

– सुनीत पोतनीस

पश्चिम आफ्रिकेत सिएरा लिओन, कांगो आणि अंगोला या देशांची भूमी हिऱ्यांनी समृद्ध आहे. परंतु सिएरा लिओनमधील हिऱ्यांच्या खाणींवर अतिरेकी संघटनांनी कब्जा केल्यामुळे तेथील सरकारचे हिरेउद्योगातून मिळणारे उत्पन्न थांबले आणि अनेक समस्या उभ्या राहिल्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी २००० साली हिरे उत्पादक कंपन्या, हिऱ्यांचे व्यापारी आणि सरकारचे प्रतिनिधी यांची दक्षिण आफ्रिकेतील किम्बर्ली येथे परिषद भरली. हिऱ्यांच्या व्यापारातला गैरव्यवहार संपविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने काही उपाय योजले गेले. त्यामध्ये ब्लॉकचेन आदी तंत्रज्ञानांचाही पुढे वापर केला गेला. त्यामुळे गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये सिएरा लिओनचा हिरेउद्योग बराचसा सरकारी नियंत्रणाखाली आला आहे.

सुमारे ९० लाख लोकसंख्या असलेल्या सिएरा लिओनमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. येथे प्रामुख्याने भातशेती केली जाते. हिरे, सोने, बॉक्साइट या खनिजांचा निर्यात-उत्पन्नामधला हिस्सा ८० टक्के असून त्यांपैकी केवळ हिरे निर्यातीतून मिळणारा उत्पन्नवाटा हा ४८ टक्के इतका आहे. इथे मिळणारे हिरे त्यांच्यावर कोणतीही प्रक्रिया न करता, म्हणजे अनघड अवस्थेत निर्यात केले जातात. पुढे दुसऱ्या देशांमध्ये या कच्च्या हिऱ्यांवर कर्तन, चकाकीकरण वगैरे क्रिया केल्या जातात. अलीकडे या प्रक्रियासुद्धा सिएरा लिओनमध्येच करण्याचा तेथील सरकारचा प्रयत्न आहे. २०१४ साली सिएरा लिओनमध्ये एबोला या संसर्गजन्य रोगाची साथ आली. वर्षभरात तिने सुमारे तीन हजार लोकांचा बळी घेतला, उद्योग-व्यवसाय बंद पडून अर्थव्यवस्था कोलमडली. मग तिथल्या सरकारने आणीबाणी जाहीर केली होती.

१६ वांशिक गट सिएरा लिओनमध्ये असले, तरी इस्लाम धर्मीय तिथे बहुसंख्याक आहेत. एकूण लोकसंख्येत इस्लाम धर्मीय ७८ टक्के आणि ख्रिस्ती धर्मीय २१ टक्के आहेत. सारे एकोप्याने राहतात. धार्मिक विद्वेषामुळे या देशात दंगली झाल्याचे ऐकिवात नाही. इंग्रजी ही इथली राजभाषा असली, तरी क्रिओ ही प्रचलित भाषा अधिक बोलली जाते.

sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 12:02 am

Web Title: sierra leone agricultural diamond exporter abn 97
Next Stories
1 कुतूहल : ऑयलरची अद्भुत रेषा
2 नवदेशांचा उदयास्त : सिएरा लिओनचे रक्तहिरे…
3 कुतूहल : प्रतिभावंत गणिती ऑयलर
Just Now!
X