News Flash

नवदेशांचा उदयास्त : सिंहिणीचा पर्वत… सिएरा लिओन!

सिएरा लिओनच्या राजधानीचे शहर आहे फ्रिटाऊन. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांमध्ये बहुतेक देशांमध्ये गुलामगिरी आणि गुलामगिरीचा व्यापार कायद्याने बंद झाला.

सिएरा लिओन

प्रजासत्ताक सिएरा लिओन हा अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरील पश्चिम आफ्रिकेतील छोटासा देश. बहुतेकांच्या खिजगणतीतही नसला तरी, या देशाविषयी जाणून घ्यायला हवे. १९६१ साली ब्रिटिशांकडून स्वायत्तता मिळवून हा नवदेश निर्माण झाला. त्यानंतर दहा वर्षांनी- १९७१ मध्ये तिथे प्रजासत्ताक राज्य स्थापन झाले. सिएरा लिओनच्या पश्चिमेला अटलांटिक महासागर, उत्तरेला गिनी हा देश, तर पूर्व व दक्षिणेस लायबेरिया हा देश आहे. ‘सलोन’ या संक्षिप्त नावाने ओळखल्या जाणाऱ्या सिएरा लिओनचे मूळ नाव होते- सेरा लिओ! पोर्तुगीज भाषेत याचा अर्थ होतो- सिंहिणीचा पर्वत! १४६२ साली पेड्रो डी-सिण्ट्रा या पोर्तुगीज खलाशाने हे नाव दिले.

सिएरा लिओनच्या राजधानीचे शहर आहे फ्रिटाऊन. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांमध्ये बहुतेक देशांमध्ये गुलामगिरी आणि गुलामगिरीचा व्यापार कायद्याने बंद झाला. त्यानंतर जगभरातून मुक्त झालेले गुलाम परतले ते फ्रिटाऊनच्या पंचक्रोशीत. या ठिकाणी नव्याने मुक्त झालेल्या गुलाम निर्वासितांच्या वस्तीला ‘फ्रिटाऊन’ असे नाव पडले. पुढे ते गाव आणि गावाचे शहर बनून सिएरा लिओनची राजधानी बनले. आफ्रिकी-अमेरिकी आणि वेस्ट इंडियन वंशाच्या मुक्त झालेल्या गुलामांना या प्रदेशात ‘क्रिओ’ म्हणतात. सध्या सिएरा लिओनमध्ये लोकवस्तीच्या चार टक्के क्रिओ आहेत. ते जी भाषा बोलतात, तीही ‘क्रिओ’ म्हणूनच ओळखली जाते.

बाराव्या शतकापासून या प्रदेशात येणाऱ्या अरबी आणि पश्चिमेकडील व्यापाऱ्यांनी लहान लहान वस्त्या केल्या. त्यांच्याकडून या प्रदेशात इस्लामचाही प्रसार झाला. वर उल्लेख केल्याप्रमाणे १४६२ साली या भागात पोर्तुगीज खलाशी पेड्रो डी-सिण्ट्रा येऊन गेल्यानंतर येथे पोर्तुगीज व्यापारी येऊन त्यांनी व्यापारी ठाणी वसवली. त्यांच्यापाठोपाठ, पुढच्या चाळीसेक वर्षामध्ये पोर्तुगीजांचे व्यापारी स्पर्धक डच आणि फ्रेंचही या प्रदेशात येऊन त्यांनी त्यांची व्यापारी ठाणी वसवली. पोर्तुगीज, डच व फ्रेंचांना सिएरा लिओनच्या किनारपट्टीतून चालणाऱ्या गुलामांच्या व्यापारात स्वारस्य होते. गुलामांचे आफ्रिकी दलाल येथील अंतर्गत प्रदेशातून गुलाम आणून या युरोपीय व्यापाऱ्यांना विकत असत.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 12:14 am

Web Title: sierra leone is a small country in west africa in the atlantic ocean akp 94
Next Stories
1 कुतूहल : ध्येयाची होतसे पूर्ती…
2 नवदेशांचा उदयास्त : आजचे आयव्हरी कोस्ट
3 कुतूहल : आर्किमिडीजची पशुसमस्या…
Just Now!
X