रेशमी वस्त्र हे रेशमाच्या किडय़ाने तयार केलेल्या कोषापासून धागा तयार करून विणलेले असते, हे आपल्याला माहीत असेलच. रेशमी वस्त्राचे वैशिष्टय़ म्हणजे त्याला एक प्रकारचा नसíगक चमकदारपणा असतो. प्रकाश त्यावरून थोडय़ा प्रमाणात परावíतत होतो, या कारणाने हे वस्त्र आकर्षक आणि रुबाबदार दिसते.
रेशीम मूलत: नाजूक आहे. त्यामुळे रेशमाचा तंतू, धागा किंवा वस्त्र धुऊन स्वच्छ करणे काळजीपूर्वक करावे लागते. यासाठी जो निर्मलक (डिर्टजट) वापरायचा त्याच्या द्रावणाचा सामू(पीएच) ५.५० ते ७.५० इतकाच असायला हवा. हे लक्षात ठेवून निर्मलकाची खरेदी करावी. अन्यथा रेशमी कापड, त्याचा रंग खराब होऊ शकतो. पीएच मूल्य शून्य ते १४ या दरम्यान असते. त्यापकी शून्य ते सातपेक्षा कमी ही आम्लाची ओळख, सात पीएच असेल तर ते द्रावण उदासीन असते (आम्लही नाही आम्लारीही नाही). पाणी हे उदासीन द्रावण म्हणून लक्षात ठेवावे. सातपेक्षा जास्त ते १४ पीएच ही आम्लारीची ओळख देतात (पीएचचे मूल्य घातांकाधारित असल्यामुळे प्रत्येक एक परिणामाचा बदल दहापट जास्त किंवा कमी मूल्य दर्शवितो.). पीएचची मोजणी पी.एच. पेपरच्या साहाय्याने सहज करता येते.
रेशमी वस्त्र पाण्यामध्ये बुडवल्यास ओले होते. त्या वेळी त्याची शक्ती कमी होते, परिणामी ओले वस्त्र फाटू शकते किंवा वस्त्राचे धागे सल होऊन ठिसूळ होऊ शकतात. तसेच हे वस्त्र जोरात पिळल्यासही फाटू शकते. त्या दृष्टीने रेशमी वस्त्र धुताना काळजी घ्यावी लागते. रेशमावर विरंजन चूर्णाचा (ब्लिचिंग पावडर) विपरीत परिणाम होतो, ते लालसर रंगाचे होऊन खराब होते.
रेशमी वस्त्रावर खायचे पदार्थ, अन्नपदार्थ किंवा द्रावण पडले तर तिथे डाग पडून तो पक्का होऊ शकतो. विशेषत: चहा, कॉफी सांडल्यास त्याचे डाग जाता जात नाहीत. याचप्रमाणे खाद्यतेल, मसाले, हळद इत्यादी पदार्थाचे डाग पडल्यास ते निघणे अवघड होऊन बसते. गडद रंगाचा रेशमाचा कपडा पाण्यात बुडवल्यास तो रंग पाण्यात विरघळू शकतो. परिणामी कापडाचा रंग फिका पडतो आणि कापड खराब दिसू लागते.

विजय रोद्द (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 

कूच बेहार राज्यस्थापना

सध्या पश्चिम बंगालमधील जिल्हय़ाचे ठिकाण असलेले कूच बेहार हे ब्रिटिशराज काळात ब्रिटिशअंकित संस्थान होते. या प्रदेशात पूर्वी कुच या घराण्याचे ‘कामता राज्य’ होते. कामता राजा विश्वसिंह (१५२३-१५५४) याने सुम्भरा, बिजनी हे परगणे घेऊन मोठा राज्यविस्तार केला तसेच भूतानचा राजा धर्मराजा याला पराभूत करून त्याला खंडणीदार केले. पुढे राजा नर नारायण याच्या मृत्यूनंतर कामता राज्याची दोन शकले होऊन पश्चिमेकडील कूच बेहार येथे लक्ष्मी नारायण (इ.स. १५८७ ते १६२६) याच्याकडे राजेपद आले. लक्ष्मी नारायण हा एक मवाळ, दुबळा शासक होता. अकबराच्या आणि पुढे जहांगीराच्या काळात मोगल सेनेने कूच बेहारवर अनेक वेळा आक्रमण करून निम्माअधिक राज्य प्रदेश हडप केला. लक्ष्मी नारायणाने अखेरीस जहांगीर बादशाहाकडे दिल्लीस जाऊन त्याला अनेक नजराणे देऊन तह केला. या तहान्वये राज्याचा गेलेला काही प्रदेश परत मिळविण्यात लक्ष्मी नारायण यशस्वी झाला.
दिल्लीहून परतताना त्याने वास्तुरचनातज्ज्ञ बरोबर आणून कूच बेहारात महालांचे बांधकाम करून घेतले. प्राण नारायण या राजाची कारकीर्द इ.स. १६२६ ते १६६५ अशी झाली. त्या काळात औरंगजेब आणि त्याच्या भावांमध्ये वारसा हक्कावरून संघर्ष चालू होता. त्या गोंधळाचा फायदा घेऊन प्राण नारायणने १६६१ मध्ये मोगलांच्या बांगा या परगण्याची राजधानी ढाका घेतली. त्यावर औरंगजेबाने त्याचा सेनापती मीर जुमला यास पाठवून कूच बेहारचा बराच प्रदेश घेतला. १६६४ साली औरंगजेबाने कूच बेहारचा उरलासुरला प्रदेश घेण्यासाठी शाहिस्तेखान या सेनानीस पाठविले. राजा प्राण नारायणाने मात्र या वेळी त्याच्याशी युद्ध न करता धूर्तपणे तह करून खानाला रिकाम्या हाती परत पाठविले आणि त्यानंतर प्राणने आपला राज्यविस्तार पूर्वेस आसामपर्यंत केला.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com