04 June 2020

News Flash

कुतूहल – साध्या विणीचे प्रकार – २

अतिशय सल असे विणलेले सुती कापड, वजनाला एकदम हलके, स्पर्शाला मुलायम हे कापड चीज कापड म्हणून ओळखले जाते.

| August 4, 2015 05:02 am

अतिशय सल असे विणलेले सुती कापड, वजनाला एकदम हलके, स्पर्शाला मुलायम हे कापड चीज कापड म्हणून ओळखले जाते. याचा वापर चीज व बटर बांधण्यासाठी करतात. याच कापडाला कडक कांजी देऊन ते ताठ करतात आणि त्याचा वापर कपडय़ाच्या आतमध्ये लाइनिंगकरिता केला जातो. सिफॉन हा कापडाचा प्रकार बहुधा साडय़ांकरिता वापरतात. हे कापडही अतिशय मृदू/मुलायम असते. याचे उत्पादन करताना रेशमाचा तलम आणि एकेरी धागा घेऊन विणाई केली जाते. या धाग्याला नेहमीपेक्षा जास्त पीळ दिलेला असतो. या सुतापासून कापड तयार करताना डिंकाचा वापर केला जातो. त्यामुळे विणकाम सुलभ होते. कापड तयार झाल्यावर डिंक काढून टाकला जातो. यासाठी ताण्याचा आणि बाण्याचा सुतांक सारखाच असतो. इतकेच नव्हे तर ताण्याची घनता आणि बाण्याची घनता ही सारखीच असते.
वायल हा साडय़ांकरिता वापरला जाणारा प्रकार सर्वाना माहीत आहेच. याकरिता नेहमीपेक्षा जास्त पिळाचे सूत वापरले जाते. आणि तलम सुताचा वापर केला जातो वायल विणण्याकरिताचे धागे एक गरम कॉइलवरून पाठवले जातात. त्यामुळे सुताच्या बाहेरील तंतू जळून जातात आणि या धाग्याला मऊपणा येतो. ताणा आणि बाणा दोन्हीकरिता ही प्रक्रिया केली जाते. याशिवाय वायल विणताना ताणा आणि बाणा यांचे धागे दुपदरी करून त्याचा उपयोग केल्यास तयार होणाऱ्या वायलला ‘फुलवायल’ म्हणून ओळखले जाते. बहुतांश वायल विणताना ताण्याचा आणि बाण्याचा सुतांक एकच असतो. तसेच ताण्याची आणि बाण्याची घनताही सारखीच असते.
कापडात विविधता आणण्यासाठी अनेक मार्गाचा वापर केला जातो. साधी वीण आधारभूत ठेवून ताण्याच्या किंवा बाण्याच्या दिशेने बदल करतात. याला रिब परिणाम असे संबोधले जाते. त्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. ताण्याच्या दिशेने ‘रिब’ असेल ते कापड ‘वार्परिब’ तर बाण्याच्या दिशेने रिब असेल तर ते ‘वेफ्टरिब’ या नावाने ही कापडे ओळखली जातात. या प्रकारचे कापड विणताना सुती, लोकरी, रेशमी असे नैसर्गिक पण भिन्न प्रकारचे धागे वापरले जातात. सूटिंग आणि ड्रेसमटेरियलमध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जातो. वेगवेगळ्या मापाचे रिब तयार करून वेगवेगळ्या सुतांकाचे सूत वापरून, कमी जास्त धागे रिबकरिता वापरून रिबमध्ये वेगळेपणा आणता येतो.
– सतीश भुटडा (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – मार्बल सिटी किशनगढ
nav02किशनगढचे संस्थानिक स्वतच्या नावाआधी ‘उमदाई राजाही बुलंद महाराज श्री’ अशी बिरुदावली लावून घेत. रायसिंगजी हा राजा जसा कुशल योद्धा होता, तसाच साहित्य कलांचा भोक्ता होता. ‘बहुविलास’ आणि ‘रसपेयनायक’ हे त्याचे काव्यसंग्रह.  अठराव्या शतकातील महाराजा सामंतसिंग हाही एक कुशल योद्धा, उत्तम प्रशासक होता. तो स्वत उत्तम चित्रकार आणि काव्यशास्त्रातला जाणकार होता. संस्कृत, पíशयन आणि मारवाडी पंडीत असलेला सामंतसिंग ‘नागरीदास’ या नावाने काव्यरचना करीत असे. त्याच्या उत्तेजनामुळे बणीठणी या शैलीची चित्रकारिता लोकप्रिय झाली. राजा मदनसिंग बहादूरची कारकीर्द इ.स. १९०० ते १९२६ अशी झाली.
याने राज्यात कालवे, पाटबंधारे यांचे मोठय़ा प्रमाणात बांधकाम करून अनेक सामाजीक सुधारणा केल्या, कापूस उद्योगासाठी जिनींग, प्रेसींगचे कारखाने सुरू केले. त्याने ब्रिटीश सन्यदलातही लेफ्टनंट कर्नलच्या हुद्यावर काम केले. फ्रान्स-ब्रिटन युद्धात मदनसींगाने मर्दुमकी गाजविल्यामुळे ब्रिटीशांनी त्याला व्यक्तिश १७ तोफ सलामींचा मान दिला. सध्या ‘मार्बल सिटी’ म्हणून विख्यात असलेल्या किशनगढ मध्ये आशियातील संगमरवराची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. गेली चार पाच शतके किशनगढ राज्याची अर्थव्यवस्था  प्रामुख्याने संगमरवराच्या व्यापारावर अवलंबून असून राजे सामंतसिंग यांनी येथे स्थापन केलेल्या मार्बल मंडीमुळे किसनगढ राज्य वैभव  संपन्न बनले. ५००० कोटी रु.ची गुंतवणूक असलेल्या या उद्योगात सध्या खाणींमधून संगमरवर काढून त्याचे कातकाम करणारे १००० हून अधिक गँग सॉ कारखाने आहेत. मार्बल मंडीमध्ये दहा हजाराहून अधिक व्यापारी असलेल्या या बाजारपेठेत मोरवाड मार्बल, वंडर मार्बल, कटनी मार्बल आणि सावर मार्बल इत्यादी उच्च दर्जाच्या संगमरवराची मोठय़ा प्रमाणात विक्री होते.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2015 5:02 am

Web Title: simple cotton cloth stitching
टॅग Navneet
Next Stories
1 साध्या विणीचे प्रकार – १
2 साधी वीण (प्लेन विव्ह)
3 कुतूहल – विणकामाची पूर्वतयारी
Just Now!
X