१९५०च्या दरम्यान चीनमध्ये झालेल्या कम्युनिस्ट क्रांतीचा प्रभाव सिंगापुरातील चिनी जनतेवरही पडला होता. काही चिनी कम्युनिस्ट गट सिंगापूरच्या ट्रेड युनियन्समध्ये कृतिशील झाले, तर काहींनी चिनी शाळांशी जवळीक साधत साम्यवादाचा प्रसार सुरू केला. हे लोक सरकारी अधिकाऱ्यांवर छुपे गनिमी हल्ले करणे, संप करणे अशा कारवायांनी सरकारला जेरीस आणू लागले. १९५९ साली सिंगापूरच्या लोकप्रतिनिधीगृह निवडणुकीत पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीला (पीएपी) ४३ जागा मिळाल्या व हा पक्ष बहुमताने सत्तेवर आला. या पक्षाचे ली कुआन यु हे सिंगापूरचे पहिले पंतप्रधान झाले.

याच काळात मलायाचे पंतप्रधान टुंकू अब्दुल रहेमान यांनी शेजारी देशांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने मलाया, सिंगापूर, उत्तर बोर्निओ व सारावाक या देशांचा मिळून राष्ट्रसंघ (फेडरेशन) करण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्वाच्या अनुमतीने १६ सप्टेंबर १९६३ रोजी मलाया राष्ट्रसंघ स्थापन होऊन या चार देशांचे विलीनीकरण झाले व ‘मलेशिया’ हा नवा देश स्थापन केला गेला. सिंगापूर हा या नवजात मलेशियाचा भाग बनला. ब्रिटिशांकडे फक्त अंतर्गत सुरक्षा व परराष्ट्र संबंध यांचीच जबाबदारी होती.

पण मलाया राष्ट्रसंघनिर्मितीच्या प्रारंभापासूनच निरनिराळ्या राजकीय गटांचा विरोध उघड झाला. प्रथम इंडोनेशियाने राष्ट्रसंघाच्या नेत्यांवर राष्ट्रसंघ बरखास्त करण्यात यावा म्हणून सैन्यदलाकरवी दडपण आणले. इंडोनेशियाच्या या कारवाया तीन वर्षे चालू होत्या. सिंगापूरच्या जनतेत चिनी वंशाचे लोक बहुसंख्येने होते व काही चिनी गट सक्रीय कम्युनिस्ट चळवळीशी जोडले गेले होते. सिंगापुरात सत्तारूढ पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीतही काही डाव्या कम्युनिस्ट विचारसरणीचे होते. त्यांचा सिंगापूरने मलेशियात विलीन होण्यास व राष्ट्रसंघ सदस्य होण्यास विरोध होता. याशिवाय मलेशियातल्या मलाय लोकांना अधिक आर्थिक सवलती देण्याची व्यवस्था संघाने केल्यामुळे चिनी आणि इतर समाज या राष्ट्रसंघात राहण्यास राजी नव्हते. त्यात भर म्हणजे मलेशियातील अलायन्स पार्टी हा सत्तारूढ पक्ष व सिंगापूरची पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी यांच्यातले मतभेद वाढत गेले व अखेरीस मलेशियाचे प्रधानमंत्री टुंकू अब्दुल रहेमान यांनी मलेशियन संसदेत सार्वमत घेऊन त्याआधारे मलेशियातून सिंगापूरला ९ ऑगस्ट १९६५ रोजी मुक्त केले.

सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com