प्राचीन आणि मध्ययुगीन काळात सिंगापूरवर प्रथम मलाक्का येथील हिंदू राजवट आणि त्यानंतर विविध मुस्लीम सल्तनतींचे राज्य होते. या काळात श्रीविजयन परमेश्वर याने सिंगापूर बंदराचा मोठा विकास केला. मागील लेखांकात नमूद केल्याप्रमाणे, १६१३ साली पोर्तुगीजांनी सिंगापुरात येऊन प्रचंड धुडगूस घातला, सिंगापूर बंदर बेचिराख करून टाकले. या काळात डच लोकांनी या प्रदेशात आपले व्यापारी बस्तान बसवले होते आणि व्यापाराचा एकाधिकार मिळवला होता. पोर्तुगीजांनी डचांना आव्हान देऊन सिंगापूरच्या काही प्रदेशावर ताबा मिळवला. अशा तऱ्हेने सिंगापूर आणि मलाय द्वीपकल्पात युरोपीय लोकांचा प्रवेश झाला.
आधुनिक सिंगापूरचा इतिहास १८१९ साली सुरू होतो. या काळात इथे डच लोकांनी सिंगापूरच्या आसपासची सर्व लहान बेटे आपल्या कब्जात ठेवली होती. मसाल्यांच्या व्यापाराच्या दृष्टीने सिंगापूरचा प्रदेश हा भारत-चीन व्यापारी मार्गावर असल्याने सर्वच युरोपीय राष्ट्रांच्या दृष्टीने सिंगापूरवर कब्जा करणे महत्त्वाचे होते.
ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील तत्कालीन व्हॉइसरॉय यांनी सिंगापूरमध्ये ब्रिटिशांची १५-२० घरांची छोटी वस्ती वसवली. सिंगापूर आणि मलायद्वीपाचा व्यापारी फायदा उठवून तिथे व्यापारी ठाणे बसविल्यास चीनशी अफूचा व्यापारही वाढविता येईल, असा धूर्त विचार त्यामागे होता. सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफेल्स या कार्यक्षम, दूरदर्शी अधिकाऱ्यास भारतीय व्हॉइसरॉयने सिंगापूरच्या ब्रिटिश वस्तीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून १८१९ साली नियुक्त केले. सिंगापुरात मोक्याच्या जागेवर बंदर उभारून तिथे आपली वखार कशी सुरू करता येईल, याची चाचपणी करण्याच्या सूचना रॅफेल्सला देण्यात आल्या.
रॅफेल्सने सिंगापूरचा अभ्यास करून बंदरासाठी एक ठिकाण नक्की केले आणि कंपनीच्या वरिष्ठांकडून या कामासाठी अनुमती मिळविली. त्याने तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांबरोबर अनेक व्यापारी करारमदार केले आणि बंदर उभारणीच्या कामास धडाक्यात सुरुवात केली. या भागात व्यापार करण्यास प्रमुख विरोध होता डचांचा. रॅफेल्सने मोठय़ा धूर्तपणे डचांशी समझोता करण्याचे नाटक करून त्यांच्याबरोबर काही व्यापारी करार केले आणि ब्रिटिशांच्या उत्कर्षांचा मार्ग मोकळा केला.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis94@gmail.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2021 12:45 am