20 January 2021

News Flash

नवदेशांचा उदयास्त: सिंगापूर

१९६५ साली सिंगापूर हे एक स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र निर्माण झाले.

पोर्तुगीज नकाशाकार मॅन्युएल गोदिन्हो देरएडिया याने १६०४ साली बनवलेला ‘सिंगपुरा’चा नकाशा.

१९६५ साली सिंगापूर हे एक स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र निर्माण झाले. ९ ऑगस्ट २०१५ रोजी सिंगापूरकरांनी त्यांच्या स्वातंत्र्याचा ५० वा वर्धापन दिन मोठय़ा थाटामाटात साजरा केला. औद्योगिक, आर्थिक प्रगतीची उत्तुंग भरारी घेणाऱ्या पूर्वेकडच्या मोजक्या देशांमध्ये सिंगापूर हे एक आहे. आग्नेय आशियातील सर्वात छोटे राष्ट्र असलेले सिंगपुरा ऊर्फ सिंगापूर हे केवळ ७०४ चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेले एक नगरराज्य म्हणजेच नगरराष्ट्र आहे. या नगरराष्ट्रात मुख्य भूमीव्यतिरिक्त ६३ लहान बेटांचाही समावेश आहे.

ओरांग लाऊट या जमातीचे मलायी कोळी हे खरे सिंगापूरचे मूलनिवासी. आकाराने मुंबईहून थोडे लहान असलेल्या सिंगापूरची लोकसंख्या सुमारे ५८ लक्ष आहे. त्यापैकी साधारण ६१ टक्के जनता ही मूळची सिंगापुरी नागरिक आहे. आठ ते दहा टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. सुरुवातीपासूनच सिंगापूरच्या सरकारने तिथे बहुवंशीय म्हणजे कॉस्मोपॉलिटन संस्कृतीला प्रोत्साहनच दिले आहे.

सिंगापूरचा उत्कर्ष झाला याचे प्रमुख कारण तिथले उत्कृष्ट नैसर्गिक बंदर हेच आहे. व्यूहात्मक दृष्टिकोनातून आग्नेय आशियातील मोक्याच्या जागी वसलेले सिंगापूर मसाला व्यापार मार्गावरील महत्त्वाचे बंदर आहे. याकडे सुरुवातीपासूनच पोर्तुगाल, नेदरलँड्स आणि ब्रिटन यांसारख्या व्यापारी राष्ट्रांची नजर होती.

सिंगापूर हे मलेशियाच्या जोहोर या प्रांताशी दोन पुलांद्वारे जोडले गेले आहे. कॉस्मोपॉलिटन सिंगापुरात बहुसंख्य लोक बौद्ध धर्मीय आहेत, तसेच हिंदू, मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्मीयसुद्धा मोठय़ा संख्येने आहेत. सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने नांदणे हे सिंगापूरचे वैशिष्टय़च आहे. अगदी मध्ययुगीन काळात- १४ व्या शतकातही सिंगापूर हे एक प्रसिद्ध व्यापारी ठाणे म्हणून महत्त्वाचे समजले जात होते. त्या काळात सिंगापूरवर राजा परमेश्वरची राजवट होती. पुढे सिंगपुरा हे राज्य मलाक्काच्या सल्तनतीत आणि नंतर जोहोरच्या सुलतानाच्या अखत्यारीत आले. चीनबाहेर मोठय़ा प्रमाणात चिनी लोक राहात होते ते सिंगापुरातच. १६ व्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगीज मलाक्का राज्यात येऊन त्यांनी सिंगापूरचा विध्वंस करून ते पूर्ण बेचिराख करून टाकले.

– सुनीत पोतनीस
sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 1:01 am

Web Title: singapore mppg 94
Next Stories
1 इतिहासातून आकलनाकडे..
2 नवदेशांचा उदयास्त: मान्यताप्राप्त देश
3 इसवीसनपूर्व भारतीय गणित
Just Now!
X