19 January 2018

News Flash

कुतूहल : सर अल्बर्ट हावर्ड

जर्मनीतील जस्टीन लायबेग नावाच्या रसायनशास्त्रज्ञाने नत्र, स्फुरद व पालाश या द्रव्यांमुळे पिके जोमाने वाढतात असा शोध लावला. यात त्याने मातीचा पोत मात्र नीट लक्षात घेतला

मुंबई | Updated: February 11, 2013 12:40 PM

जर्मनीतील जस्टीन लायबेग नावाच्या रसायनशास्त्रज्ञाने नत्र, स्फुरद व पालाश या द्रव्यांमुळे पिके जोमाने वाढतात असा शोध लावला. यात त्याने मातीचा पोत मात्र नीट लक्षात घेतला नव्हता. आज जगभर शेतात एनपीके नावाने हेच त्रिकूट अधिराज्य गाजवत आहे.
१९०५ मध्ये इंग्रज शासनाने ही रसायने मातीत घालून शेती कशी करायची, हे शेतकऱ्यांना शिकवण्यासाठी अल्बर्ट हार्वर्ड या शास्त्रज्ञाला भारतात पाठविले. अल्बर्ट हार्वर्ड बिहारला पुसा या गावी शासकीय कृषी संशोधन केंद्रात रुजू झाला.  
अल्बर्ट नेहमी परिसरात बिहारी शेतकऱ्यांना शेती करताना बघायचा. त्याला प्रश्न पडे, की कुठलेही रसायन न वापरता फक्त शेणखतावर हे लोक पिके कशी घेतात? भारतीय शेतीचे त्याला मोठे आश्चर्य वाटले. आजूबाजूला फिरून त्याने तेथील शेतकऱ्यांच्या शेती करण्याच्या पद्धती शिकून घेतल्या. याचा ध्यासच लागला त्याला. हळूहळू त्याने भारतातील इतर प्रांतांतील शेतीचे अवलोकन सुरू केले. त्याला उमगले की त्यांचे शासकीय कृषी संशोधन योग्य दिशेत नाही. त्याने राजीनामा दिला व भारतीय शेतीबाबत संशोधन सुरू केले.
आपले संशोधन तपासून पाहण्यासाठी अल्बर्टला जागा हवी होती. इंदूरच्या होळकर महाराजांनी त्याला ३०० एकर जमीन लीजवर दिली. १९१८ साली त्याने इंदूरमध्ये आपल्या सेंद्रिय शेतीला भक्कम स्वरूप देण्यासाठी इन्स्टिटय़ूट ऑफ प्लांट इंडस्ट्रीजची स्थापना केली. कुठलेही रसायन न वापरता शेण, गोमूत्र व शेतातील माती मिसळून सेंद्रिय खत बनविण्याचे तंत्र त्याने शोधून काढले. त्याला इंदूर मेथड ऑफ कम्पोस्ट मेकिंग हे नाव दिले. १९३४ साली निवृत्त होऊन हार्वर्ड परतले. १९४० साली त्यांचे निधन झाले. १९४८ साली त्यांच्या पत्नीने त्यांचे अ‍ॅन अ‍ॅग्रीकल्चरल टेस्टामेंट (एका शेतीचे वारसापत्र- मराठी अनुवाद, बळीराजा, पुणे) हे पुस्तक प्रकाशित केले. ते जगभर गाजले.
अल्बर्ट हार्वर्ड शिक्षक बनून भारतात आले व विद्यार्थी बनून परत गेले. जगाला त्यांनी संदेश दिला की, सेंद्रिय शेती हीच खरी शेती. ती समजून घ्यायची असेल तर भारतीय शेतीकडे बघा.
अरुण डिके (इंदूर)   
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@
mavipamumbai.org

आजचे महाराष्ट्रसारस्वत : ११ फेब्रुवारी
१८५१ > मराठी शुद्धलेखन पद्धतीचे अभ्यासक ग्रंथकार शंकर रामचंद्र हातवळणे यांचा जन्म. ‘मराठी भाषेची लेखनपद्धती’ आणि ‘हिंदुस्थानात एक भाषा होईल किंवा नाही’ ही त्यांची भाषाविषयक पुस्तके, तर ‘सुशिक्षित स्त्री’ ही कादंबरी त्यांनी लिहिली.
१८८१ > होमिओपॅथीवरील पुस्तकांचे लेखक डॉ. सदाशिव पळसुले यांचा जन्म. ‘होमिओपॅथीचा छोटा निघंटु’ , ‘बालरोग व त्यांची होमिओपॅथिक चिकित्सा’ ही त्यांची पुस्तके मराठीजनांना होमिओपॅथीचा अभ्यास करण्यास उपयुक्त ठरली.
१९४२ > बुद्धिनिष्ठ स्त्रीच्या भावभावनांचा वेध घेणाऱ्या ‘तेरुओ आणि काही दूपर्यंत’, ‘दुस्तर हा घाट आणि थांग’, ‘चंद्रिके गं सारिके गं’, ‘मुक्काम’ या कादंबऱ्या तसेच वेगळ्या वाटेवरच्या स्त्रीचे मनोगत मांडणारे ललितलेख लिहिणाऱ्या गौरी देशपांडे यांचा जन्म. रिचर्ड बर्टनच्या ‘अरेबियन नाइट्स’चे भाषांतर गौरी यांनी केले होते, तर अनेक देशांतील मुक्कामानंतर विंचुर्णी (ता. फलटण) येथील वास्तव्याच्या अनुभवांवर आधारित ‘विंचुर्णीचे धडे’ हे त्यांच्या हयातीतले अखेरचे पुस्तक ठरले. ‘कथा गौरीची’ (संपा. विद्या बाळ व अन्य) आणि ‘महर्षी ते गौरी’ (मंगला आठलेकर) ही पुस्तके गौरी देशपांडे यांच्या वाङ्मयीन कार्याचा वेध घेतात.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस : चक्कर येणे : भ्रम
रोग्याला चक्कर येणे मोठे धोकादायक आहे. चक्कर येणे याचा अर्थ इथे पित्तामुळे किंवा मेंदूला रक्तपुरवठा पुरेसा न झाल्यामुळे फेकल्यासारखे व गळल्यासारखे होणे, एवढा अर्थ घेतला आहे. फीट्स किंवा फेफरे यामुळे येणारी चक्कर विचारात घेतलेली नाही. या विकाराची अनेक कारणे आहेत. मानेच्या मणक्यांमधील अंतर कमी अधिक होणे, त्यामुळे त्यातील जाणाऱ्या रक्तवाहिन्या दबल्या जाऊन मेंदूला रक्तपुरवठा न होणे, अति विचार, झोप कमी, पोषण कमी यामुळे रक्ताची उत्तमांगाला म्हणजे डोक्याकडे गरज वाढूनही प्रत्यक्षात रक्तपुरवठा मुळात कमी असणे, रक्तदाबक्षय, खूप मोठी उशी घेणे, तीव्र ताप दीर्घकाळ राहणे, शरीरात बनणाऱ्या आहाररसाचे प्रमाण कमी होणे, रसक्षय होणे इ. या विकाराची निश्चिती करण्याकरिता रुग्णाने डोळे मिटून, दोन्ही पाय जुळवून आधाराशिवाय उभे राहावे. दोन्ही हात बाजूला ताठ चिकटवावे. पडेल की काय किंवा डोलल्यासारखे होते का, पापण्या फडफडतात का, एकदम काळोखी येते का हे पहावे. काहींना या विकारात झोप कमी येत असते. हाताच्या बोटांना मुंग्या येतात, मानेच्या मणक्यांत दोष असतो. रक्ताचे प्रमाण कमी झालेले असते. रुग्ण चिंताग्रस्त असतो. मानेवर नेमक्या जागी सूज असते.
   माझ्या चव्वेचाळीस वर्षांच्या वैद्यकीय कारकीर्दीत मला अनेक सन्मित्र मार्गदर्शक लाभले. आगाशी (विरार) येथील डॉ. अच्युत जोगळेकर यांनी मला चंद्रकला हे औषध वापरावयाचा आग्रह केला. ते औषध वापरायला लागल्यापासून मला या विकाराकरिता चिकित्सेत अपयश माहीत नाही. या विकाराकरिता चंद्रकला, लघुसूतशेखर, गोक्षुरादि, लाक्षादि गुग्गुळ, सुवर्णमाक्षिकादि वटी प्रत्येकी ३ गोळय़ा बारीक करून दोन वेळा घ्याव्यात. झोप येत नसल्यास निद्राकरवटी ६ गोळय़ा, एक चमचा आस्कंदचूर्णाबरोबर घ्याव्या. रक्तपुरवठा कमी असल्यास चंद्रप्रभा, कुष्मांडपाक, शतावरी कल्प, च्यवनप्राश, अश्वगंधापाक यातील औषधे तारतम्याने निवडावी. उशी टाळावी. सायंकाळी लवकर जेवावे. जागरण किंवा व्यसने टाळावीत. मधुमेह व रक्तदाब असल्यास रसायनचूर्ण एक चमचा दोन वेळा घ्यावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. : जनुकांमधील अस्थिरता
कोठलाही क्षण पुढच्या क्षणासारखा नसतो असे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. तसेच या जगात काही कायम स्वरूपाचे म्हणण्याजोगे असेल तर तो म्हणजे बदल असेही एक चक्रावणारे वाक्य आहे. अगदी किमान अणुरेणूंची बनलेली जनुके आपल्या अवाढव्य शरीराचा गाडा हाकतात. एवढेच नव्हे, तर जरी आपण मी मी करत असलो तरी आपल्या शरीरातल्या एकूण पेशींइतकेच जीव जीवाणू आपल्या त्वचेत आणि आतडय़ांमध्ये असतात त्यांनाही जनुके असतात. आपण आणि हे जीवाणू शांततामय सहजीवन जगतो एवढेच नव्हे तर हे सहजीवन नुसतेच एकमेकांना उपद्रव न देणे या तत्त्वावर अधारित नसून त्याला विधायक स्वरूप असते. आपल्या आतडय़ातले अर्धे पचन हे जीवाणू करतात असा एक होरा आहे. थोडे काही झाले की antibiotice घेणाऱ्या अट्टहासामुळे हे आपले मित्र असलेले काही जीवाणू मरतात आणि काही बिथरतात. त्यांच्यातल्या जनुकांमध्ये नव्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी बदल घडतो आणि हे आपले पूर्वीचे मित्र आता शत्रू होतात. एक तर पचनक्रियेतली त्यांची मदत संपते आणि जर मूळ आजारामुळे आपली परिस्थिती खालावली तर हे जीवाणू गुदद्वारामधून बाहेर पडून शरीरभर पसरून आणखीनच नवा आजार निर्माण करतात. आपल्या जनुकांची काळजी घेणे आपले काम आहे. जी जनुके आपण जन्मत:च घेऊन येतो त्याला तर आपण बदलू शकत नाही. त्याला आपल्या तत्त्वज्ञानात प्रारब्ध म्हणतात. त्यातली काही काही विशिष्ट आजारांना किंबहुना कर्करोगाला धार्जिणी असतात हे आपण पाहिलेच आहे. परंतु जन्मल्यावर आपली जीवन शैली काय आहे यावरही आपल्या जनुकांचे भवितव्य ठरते. जगात कोणी सवतासुभा मांडू शकत नाही. आपण सगळे गुंतलेले असतो. जनुकांसारख्या अतिउच्च आणि कार्यकुशल पेशीचे तेच असते. निसर्गातच माणसाने अन्न शोधले आहे. त्याचे मांसाहार आणि शाकाहार असे दोन प्रकार असले तरी हिरव्या किंवा फळभाज्यांचा दुस्वास आणि मांसाहाराचा अतिसोस यामुळे मोठय़ा आतडय़ाच्या पेशींमधल्या जनुकांचे नीट पोषण होत नाही आणि त्यांच्यात बदल होऊन ती जनुके दहशतवादी अतिउपद्रवी पेशी जन्माला घालतात असा एक जवळजवळ नक्की झालेला कयास आहे. म्हणून मांसाहाराचा अतिरेक असलेल्यांमध्ये मोठय़ा आतडय़ाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असते. दुसरी एक शरीरातली आश्चर्यजनक गोष्ट अशी आहे की शरीरातल्या प्रत्येक पेशीचा मरणाचा दिवस ठरलेला असतो, त्या दिवशी त्या स्वमरण स्वीकारतात आणि नव्या पेशी जन्माला येतात. जनुकांवर आपल्या जीवनशैलीमुळे (उदा. खूप खाणे, कमी झोपणे, वजन वाढणे, जास्त श्रम करणे, व्यायामाचा पत्ता नाही) झालेल्या परिणामापासून हा कार्यक्रम बंद पडतो आणि म्हाताऱ्या पेशींचा प्रादुर्भाव वाढतो. उतार वयात जसा आजारपणा येतो तसेच या म्हाताऱ्या पेशींचे होते आणि आजारांचे प्रमाण वाढते.
रविन मायदेव थत्ते 
rlthatte@gmail.com

First Published on February 11, 2013 12:40 pm

Web Title: sir albert haward
  1. No Comments.