इ.स. १६७९ ते १६९० या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबईच्या कारभाराचा डेप्युटी गव्हर्नर आणि सुरतच्या वखारीचा प्रेसिडेंट म्हणून काम केलेला सर जॉन चाइल्ड आपल्या अधिकारात स्वत निर्णय घेऊन त्याची तडकाफडकी अंमलबजावणी करण्यात वाकबगार होता. एखादे काम करायचे त्याने मनावर घेतल्यास मग त्यात न्याय-अन्याय किंवा बरे-वाईटपणा याचा तो विचार करीत नसे. धाडसी आणि मतलबी कृत्यांनी त्याने कंपनीस झालेले कर्ज फेडून  मोठी किफायत करून दाखवली. कंपनीच्या वखारीतल्या कर्मचाऱ्यांना खासगी व्यापार करायला सुरुवातीला असलेली परवानगी पुढे रद्द करण्यात आली. तरीही अनेक जण खासगी व्यापार करताना आढळल्यावर जॉनने त्यांना जबरदस्त शिक्षा ठोठावल्यामुळे त्याची मोठी दहशत कर्मचाऱ्यांमध्येही तयार झाली होती.

१६८२ मध्ये जॉनची सुरतच्या वखारीचा प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती झाली. पुढे कंपनीने आपला सुरतचा कारभार नाममात्र ठेवून १६८७ साली जॉन चाइल्डला मुंबईचा बंदोबस्त करण्यासाठी मुंबईस पाठवले. या काळात बंगालमध्ये मोगल आणि इंग्रजांमध्ये व्यापारी सवलतींवरून चकमकी झडत होत्या. जॉनने पश्चिम किनाऱ्यावर मोगल यात्रेकरूंची जहाजे पकडल्यावर बादशाहाने सुरत, मछलीपट्टण, विशाखापट्टण वगैरे ठिकाणच्या कंपनीच्या वखारी काबीज करून मुंबईवर जंजिऱ्याचा याकूब खान याला पंचवीस हजार सनिकांसह मुंबईवर पाठवले. जॉननेही मोगलांचे ‘गंजी सवाई’ हे मोठे जहाज आणि इतर जहाजे पकडून चढाई करायचा प्रयत्न केला परंतु याकूब खान सिद्दीने तोफा डागल्या आणि मध्यरात्री माजगाव घेऊन तिथे तोफखाना चढवून माहीमचा किल्ला घेतला. जॉनपुढे आता बादशाहाला शरण जाण्याहून दुसरा पर्याय उरला नाही. अखेरीस त्याने बादशहाकडे आपले दोन वकील माफीनामा घेऊन पाठवले. औरंगजेबाने हा माफीनामा कबूल केला पण दोन अटींवर, एक तर कंपनीने बादशहाला दीड लाख रु. दंड म्हणून द्यावे आणि यापुढे जॉन चाइल्डची ईस्ट इंडिया कंपनीने नोकरीतून हकालपट्टी करावी आणि त्याला भारताबाहेर हद्दपार करावे. कंपनीने निमूटपणे दंड भरला परंतु बादशहाचे माफीचे फर्मान कंपनीला मिळण्यापूर्वीच १६९० साली जॉन चाइल्डला मुंबईतच मृत्यूने गाठले!

सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com