22 April 2019

News Flash

जे आले ते रमले.. : जॉन चाइल्डचा राजेशाही थाट (३)

सर जॉन चाइल्ड हा सुरत येथील कंपनीच्या वखारीचा प्रेसिडेंट म्हणून १६८२ ते १६९० या काळात होता.

सुरतेची वखार

क्रॉमवेलने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची व्यवस्था आणि भारतातील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नीतीनियम ठरवल्यावर त्यांचे कर्मचारी, अधिकारी आणि व्यापारी यांची येथील राहणी सुखाची होऊ लागली. भारतात आल्यावर त्यांचे राहणीमान उंचावल्यामुळे ते इथे आरामाने राहत. सुरतच्या वखारीतील अनेक अधिकाऱ्यांनी पंचक्रोशीत आलिशान निवासस्थाने बांधली होती.

सर जॉन चाइल्ड हा सुरत येथील कंपनीच्या वखारीचा प्रेसिडेंट म्हणून १६८२ ते १६९० या काळात होता. सुरतेतील त्याचे राहणीमान कसे होते हे याचे उदाहरण म्हणून पाहणे समर्पक होईल. सुरतच्या प्रेसिडेंटची म्हणजे जॉन चाइल्डची स्वारी घराबाहेर पडताना मोठय़ा थाटाने पालखीत बसून बाहेर पडत असे. बरोबर नगारखाना, शिंगे वगैरे वाद्य्ो आणि सजवलेले घोडे असत. छत्री, मोरचेल आणि पंखा धरणारे बरोबर असून पालखीच्या दोन्ही बाजूस युरोपियन शिपायांची रांग चाले. प्रेसिडेंट बाहेरगावी जाताना कौन्सिलर मंडळी घोडय़ांवर, तर त्यांच्या पत्नी पालखीत बसून जात. त्याचप्रमाणे प्रेसिडेंटबरोबर घोडे, पालख्या, वैद्य, शस्त्रवैद्य, नोकर असा लवाजमा असे.

प्रेसिडेंटच्या निवासस्थानी भोजनासाठी कोणीतरी बडा पाहुणा आणि त्याचे खूशमस्करे हमखास असत. भोजनाचा थाट तर काही औरच असे. भोजनाच्या वेळी सुस्वर वाद्य्ो वाजत आणि पदार्थ बाहेर वाढावयास येताना शिंग वाजत असे आणि तो पदार्थ आणणाऱ्याबरोबर चांदीची छडी धारण केलेला चोपदार असे. बंगल्यात वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर प्रेसिडेंटसाहेबांची स्वारी येताच त्यास सलामी होत असे.

सुरतेची वखार एका मोठय़ा भव्य प्रासादात होती. हा प्रासाद सुरतेतल्या एका मोगल अधिकाऱ्याकडून भाडेकरारावर घेतलेला होता. मजबूत, दगडी आणि सुंदर असा हा प्रासाद सुरतच्या इतर इमारतींमध्ये उठून दिसत असे. सभोवार मोठमोठे सज्जे आणि लाकडावर कोरीव नक्षीदार काम होते. या प्रासादाच्या अर्ध्या भागात वखारीचा प्रेसिडेंट राहत असे. अशा प्रकारच्या राजेशाही राहणीची सवय लागल्यावर हे गोरे अधिकारी आपल्या मायदेशी परतण्यासाठी फारसे उत्सुक नसत!

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

First Published on September 5, 2018 12:12 am

Web Title: sir john child british east india company article 3