22 July 2019

News Flash

जे आले ते रमले.. : सर विल्यम जोन्स (१)

कायद्याचा अभ्यास करून ते वकिलीची परीक्षा पास झाले. वकिली करतानाच त्यांनी कायद्यावर अनेक पुस्तके लिहिली.

सर विल्यम जोन्स

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केलेले विल्यम जोन्स यांची खरी ओळख भाषाशास्त्री, प्राच्यविद्यापंडित, विधिशास्त्री आणि एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलचे संस्थापक म्हणून आहे. लंडनमध्ये वेस्टमिन्स्टरमध्ये १७४६ साली जन्मलेल्या विल्यमचे वडील हे वेल्समधील एक विख्यात गणितज्ञ होते. त्यांनीच ‘पाय’ (स्र्) ही संकल्पना शोधून काढली. विल्यमचे शिक्षण हॅरो स्कूल आणि ऑक्स्फर्डच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये होऊन ते एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. भाषाशास्त्राची आवड उपजतच असलेल्या विल्यमने इंग्लिश आणि वेल्श या मातृभाषांव्यतिरिक्त ग्रीक, लॅटीन, पर्शियन, अरेबिक, हिब्रू या भाषांवर तरुण वयातच प्रभुत्व मिळवले. शिक्षण पूर्ण झाल्यावर विल्यमनी सहा वर्षे शिकवण्या घेऊन अनुवादक म्हणून काम केले. या काळात त्यांनी डेन्मार्कच्या राजाच्या सांगण्यावरून ‘नादीर शाह’ या पर्शियन पुस्तकाचा फ्रेंच भाषेत अनुवाद केला.

कायद्याचा अभ्यास करून ते वकिलीची परीक्षा पास झाले. वकिली करतानाच त्यांनी कायद्यावर अनेक पुस्तके लिहिली. त्यांच्या ‘एसे ऑन द लॉ ऑफ बेलमेंट्स’ या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. पुढे ते ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीस लागले. १७८३ मध्ये विल्यम जोन्सची नियुक्ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कोलकाता येथील बंगाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या पदावर झाली. त्यांचे न्यायालयीन कामही वाखाणले गेले, कायद्यापुढे त्यांनी भारतीय नागरिक आणि युरोपीय नागरिक समान दर्जाचे मानून काम केले. भाषा आणि संस्कृतीचा अभ्यासक असलेल्या विल्यम जोन्सनी कोर्टातले कामकाज सांभाळतानाच येथील लोक, त्यांची जीवनशैली, संस्कृती यांचा बारकाईने अभ्यास सुरू केला. हिंदू आणि मुस्लीम कायद्यांची माहिती करून घेण्यासाठी विल्यमनी संस्कृत भाषेचा अभ्यास केला. संस्कृतातले धार्मिक ग्रंथ समजावून घेण्यासाठी संस्कृत विद्वानांची शिकवणी ठेवली. हिंदू आणि मुस्लीम कायद्यांचे संकलन करून ‘इन्स्टिटय़ूट्स ऑफ हिंदू लॉ’, ‘मोहमेडन लॉ ऑफ सक्सेशन’ वगैरे ग्रंथ लिहिले. त्यांनी भारतीय कला, संगीत, साहित्य, भूगोल आणि वनस्पतीशास्त्र या विषयांवरही पुस्तके लिहून पाश्चिमात्य लोकांना भारतीय संस्कृतीचा परिचय करून दिला.

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

First Published on September 12, 2018 1:29 am

Web Title: sir william jones article 1