14 December 2017

News Flash

सीताकांत महापात्र : मराठी अनुवाद

युरोपातील बहुतेक भाषांमधून अनुवादित झालेले ते अग्रगण्य कवी आहेत.

मंगला गोखले | Updated: August 3, 2017 5:10 AM

डॉ. सीताकांत महापात्र यांच्या जीवनदृष्टीचे आणि काव्यदृष्टीचे एक अनन्यसाधारण वैशिष्टय़ हे आहे, की त्यांनी ओदिशामधील आदिवासींच्या गाण्यांमधील काव्यसृष्टी जगाच्या नजरेसमोर आणण्याचे महान कार्य अत्यंत संवेदनक्षम पद्धतीने केले आहे. १९७२ ते १९९२ पर्यंत या संदर्भातील त्यांचे आदिवासी मौखिक परंपरेचे नऊ संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘अन एन्डिंग ऱ्हिदम्स पोएट्री ऑफ द इंडियन ट्राइब्ज’ हा संग्रह १९९२ मध्ये प्रकाशित झाला आहे.

युरोपातील बहुतेक भाषांमधून अनुवादित झालेले ते अग्रगण्य कवी आहेत. त्यांच्या आठ कवितासंग्रहाचे इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या निवडक कवितांचा  (कृष्णाचे  निर्वाण व अन्य कविता) संग्रह हिंदीमध्ये प्रसिद्ध झाला आहे. फ्रेंच, जर्मन, स्वीडिश, डॅनिश, स्पॅनिश आणि रोमानियन भाषांमधून त्यांच्या निवडक कवितांचे संग्रह प्रकाशित झाले असून, हिंदीमध्ये आठ काव्यसंग्रह, बंगाली आणि उर्दूमध्ये दोन, मल्याळममध्ये दोन आणि मराठीत एक काव्यसंग्रह अनुवादित झाला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार, सोव्हिएत लँड पुरस्कार, तुलसी सन्मान, सरस्वती सन्मान, उडिया कल्चर अ‍ॅवॉर्ड व  ज्ञानपीठ पुरस्काराने डॉ. महापात्र यांना सन्मानित करण्यात आले आहे.

१९९० मध्ये प्रसिद्ध झालेल्या डॉ. महापात्र यांच्या ‘चिढेइ रे तु कि जाणु’ या उडिया संग्रहाचा ‘चिरई री तू क्या जाने’ या डॉ. राजेंद्रप्रसाद मिश्र यांच्या हिंदी अनुवादावरून  ‘चिमणे ग बाई तुज काय ठावे’ हा मराठी भावानुवाद प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी केला आहे. या संग्रहात विविध विषयांवरच्या ३४ कविता आहेत. सामान्य परिस्थितीतील माणसाचे चित्रण करताना कवी म्हणतात, त्याला साधं जरासं गुणगुणणंही शक्य नाही.

‘त्याच्या स्मिताआड

कण्हण्याचा मंद स्वर ऐकू येतोय..

तृषित अंतरात्म्याला साक्षी ठेवून

तो माणूस गुपचूप बसून राहतो’

आजच्या मानवाचं चित्रण करताना कवी म्हणतात-

‘सारी सत्यं, सारं ज्ञान ढीगच्या ढीग

पोथ्या कॉम्प्युटरमध्ये सजवून

हाताच्या अंतरावर ठेवल्यात म्हणून नव्हे

तर यासाठी आहोत आम्ही मानव की

चष्मा कुठे तरी ठेवून

वेडय़ासारखं शोधत फिरतोय

प्रत्येक ठिकाणी सारी सकाळ.’

 

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

फ्लोसायटोमीटर

जीवशास्त्रीय अभ्यासात पेशींच्या संख्येचं मापन अनेक ठिकाणी आवश्यक ठरतं. यात पेशींची संख्या प्रत्यक्षात मोजणं किंवा एखाद्या नमुन्यात असलेलं पेशींचं तुलनात्मक प्रमाण ठरवणं, याचा समावेश होतो.

वैद्यकशास्त्रामध्ये रोगाचं निदान आणि उपचार करणं यासाठी रक्तातल्या पेशींचं प्रमाण माहीत असणं आवश्यक ठरतं. तसंच एखाद्या रुग्णाच्या रक्तात विशिष्ट रोगाचे जिवाणू, विषाणू किंवा इतर रोगजंतू किती प्रमाणात आहेत हे मोजलं तर त्यावरून त्या रोगाचा प्रादुर्भाव कितपत झाला आहे आणि रोग्याची रोगप्रतिकारक्षमता किती आहे हे ठरवता येतं.

सेल थेरपीमध्ये रुग्णाला विशिष्ट प्रकारच्या रक्तपेशी देण्यात येतात. ह्य़ा पेशी किती प्रमाणात द्यायच्या हे ठरवण्यासाठी त्यांच्या संख्येचं मोजमापन आवश्यक ठरतं. त्याचप्रमाणे, रेण्वीय जीवशास्त्रातील संशोधनकार्यातही पेशींच्या संख्येचं मापन गरजेचं असतं. हिमोसायटोमीटरसारख्या उपकरणाने पेशींची संख्या प्रत्यक्ष मोजावी लागते. आणि ते थोडंसं क्लिष्ट ठरतं. पण आता इतरही काही आधुनिक उपकरणांचा वापर पेशींची संख्या मोजण्यासाठी केला जातो.

फ्लो सायटोमेट्री ही पेशींच्या संख्या मोजण्याची एक अत्याधुनिक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये फ्लो सायटोमीटर या उपकरणामधील एका अत्यंत कमी व्यासाच्या माíगकेतून ज्यातील पेशी मोजायच्या आहेत त्या द्रवाचं वहन केलं जातं. ह्य़ा माíगकेच्या विशिष्ट भागातून लेसर किरण सोडलेले असतात. माíगकेतून जाणाऱ्या प्रत्येक पेशीवर लेसर किरण आदळतात आणि पेशींवर आदळून परावíतत होतात. परावíतत झालेले हे लेसर किरण प्रकाशसंवेदकामार्फत ग्रहण केले जातात. संगणकीय प्रणालीमार्फत परावíतत लेसर प्रकाशकिरणांचं विश्लेषण केलं जातं आणि त्यावरून केवळ पेशींची संख्याच नव्हे तर पेशींचा आकार, त्यांची बाह्य़ आणि अंतर्रचना, पेशीतील विशिष्ट प्रथिनाचं आणि इतर रासायनिक पदार्थाचं प्रमाण अशा अनेक गोष्टी समजून घेता येतात.

फ्लो सायटोमीटर वापरून पेशींचं मोजमापन करण्याची आणि त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याची ही पद्धत सोपी असली तरी खर्चीक आहे. त्यामुळे शक्यतो जिथे फक्त पेशींची संख्या मोजायची आहे तिथे फ्लो सायटोमीटरचा उपयोग केला जात नाही.

प्रिया लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on August 3, 2017 5:10 am

Web Title: sitakant mahapatra part 2