तरुण मुलं मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेली असतात. त्यांना हटकलं तर ती एकदम भडकतात. याचं कारण काय असावं? कधी कधी त्यांच्या चालू टाइमपासमध्ये अडथळा निर्माण झाला म्हणून चिडू शकतात. तर असंही असू शकतं की, नुकताच मोबाइल हाती आलेल्या मुलांना दुसरं कोणी त्रास देत नाहीये ना. स्वत:ची निराशा आणि हताशा लपवण्यासाठी मुलं-मुली एकदम भडकतात का?

काही गंभीर प्रकार असेही घडतात; ज्याबद्दल सहसा मुलं कोणाशीच काही बोलत नाहीत. मुलं जसजशी मोठी होतात तशी ‘सोशल मीडिया’ हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होऊन जातो असं चित्र सध्या दिसतं आहे. तरुण मुलांना कशावरून तरी घाबरवण्याचे प्रकार ऑनलाइनही चालतात. ग्रुपमध्ये एखाद्याला मुद्दाम त्रास देणं, कोणत्याही कारणावरून हिणवणं, तुझ्याबद्दल काही तरी लिहिणार आहोत, तुझे फोटो टाकणार आहोत, अशा धमक्या काही जण देत असतात. कधी कधी हे अजिबात गंभीर नसतं. कधी कधी मात्र टोकाचं गंभीर असतं.

अनेकदा हे संवाद वाचल्यावर यात काही विशेष नाही असं वाटू शकतं. पण साध्या साध्या शब्दांच्या आडही काही धमक्या असू शकतात. एखाद्याच्या वैगुण्यांवर वाईट पद्धतीने बोट ठेवणं असू शकतं. मुलांना कोणी तरी घाबरवत असेल तर हा त्यांचा दोष नसतो. भीती दाखवणं हा मुळीच लपवण्याचा विषय नाही. जो बळी पडला आहे त्याला दोषी ठरवण्याचे प्रकार व्हायला नकोत. जर मुला-मुलींचा विश्वास असेल की काहीही घटना घडली तरी पालक- शिक्षक कोणीही त्याच्या पाठीशी उभे आहेत, तर मुलं कोणतीही त्रासदायक गोष्ट घरी येऊन नक्की सांगतात. म्हणून याविरोधात योग्य ती कृती करावी लागेल. अशा प्रकारे ऑनलाइन घाबरवण्याचे प्रकार शाळेतल्या मुलांच्या पातळीवर, कॉलेजवयीन मुलांच्या बाबतीत घडू शकतात. ग्रुपमध्ये काय चालतं यावर कोणाचंही नियंत्रण नसतं.

ऑनलाइन त्रास देणं ही तशी साधीसोपी गोष्ट वाटत असली तरी ती भयंकरही आहे. यामुळे मुलंमुली बेचन होतात, निराश होतात, अभ्यासाकडे लक्ष जात नाही. चिंतातुरता वाढते. नकारात्मक भावना मनात साचून राहिल्यामुळे व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com