News Flash

मेंदूशी मैत्री : सामाजिक विश्वास

अनेकदा हे बंध चांगल्या पद्धतीने निर्माण होण्याऐवजी त्यांना धक्का लागण्याचं काम होतं

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

आपल्याला समाजाबद्दल वाटणारा विश्वास आणि समाजाला आपल्याबद्दल वाटणारा विश्वास ही माणसाच्या जडणघडणीतली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाच्या दृष्टीने घर ही जिव्हाळ्याची, प्रेमाची, आत्मीयतेची जागा असतेच, पण त्या घराबाहेर पाऊल टाकल्यानंतर शाळेकडून, समाजाकडून, रस्त्यात, नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या जागेवर, विस्तारित कुटुंबांमध्ये, मित्रमंडळींमध्ये, अनोळखी व्यक्तींकडून, प्रवासामध्ये एकमेकांवर विश्वास असणं आणि त्यातून चांगल्या अनुभवांची भर पडणं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ज्या वेळेला असा विश्वास मिळत जातो, आपला स्वीकार केला जातो, त्या वेळेला स्वयंप्रेरणा वाढते, आत्मविश्वास वाढतो.

ज्या मुलांच्या घरामध्ये किंवा मुलं जिथे राहतात तिथे जिव्हाळ्याचं, आत्मीयतेचं नातं नसेल तर अशा मुलांना स्वत:विषयी आणि समाजाविषयी प्रेम निर्माण होणं हे अवघड असतं. घरातून प्रेम मिळत नसेल तर तो अभाव समाजाने दूर करायला हवा.

परंतु ज्या वेळेला असं होत नाही त्या वेळेला कमालीचा असुरक्षित समाज तयार होतो. अशा समाजात प्रेम नसतं, तर परस्परांबद्दल टोकाचा अविश्वास असतो. याची सुरुवात लहानपणापासून घडून येण्याची शक्यता खूपच असते. शाळेमध्ये, मित्रमंडळींमध्ये, एकमेकांमध्ये विचार, भावना, गप्पागोष्टी, खेळ यांची देवाण-घेवाण होत असते. त्याच वेळेला सामाजिक बंध निर्माण होत असतात.

अनेकदा हे बंध चांगल्या पद्धतीने निर्माण होण्याऐवजी त्यांना धक्का लागण्याचं काम होतं. एकमेकांमधला प्रेमाचा पाया भक्कम असेल, तर हा धक्कासुद्धा सहन करता येऊ शकतो. परंतु वारंवार जर असे धक्के समाजाकडून मिळत राहिले, तर समाजातल्या विविध जाती-धर्म गटांमध्ये टोकाचे भेद निर्माण होतात. आणि त्यामुळे विविधतेने नटलेल्या समाजातला कोणताही एक समाज अशा परिस्थितीत सुरक्षित राहू शकत नाही, आपल्या समाजातले ताणेबाणे एकमेकांमध्ये इतके घट्ट बांधलेले आहेत की कोणत्याही एका समाजाला दुसऱ्या समाजाबद्दल भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण करून चालणार नाही. काही गट  दुसऱ्या गटाबद्दल जाणीवपूर्वक विघातक भावना निर्माण करू बघतात. हे तर निंदनीय आहे. कारण यामुळे पूर्ण घडी विस्कटण्याचा संभव असतो. सामाजिक विश्वास या संकल्पनेवरच कुऱ्हाड मारल्यासारखं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 2:25 am

Web Title: social trust feelings about community faith in human being zws 70
Next Stories
1 पळवाट की पायवाट?
2 पुंजवादाकडची वाटचाल..
3 कंटाळा आणि सर्जनशीलता
Just Now!
X