हैद्राबादच्या दख्खनच्या मातीत विसावत, इतिहासातील एक दंतकथा बनून गेलेला मायकेल रेमंड या त्याच्या मूळच्या नावाने ओळखणारे हैद्राबादकर अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतके कमी होते. या दिलदार, सच्च्या निष्ठावंत फ्रेंच माणसाला आपल्यात पूर्णपणे सामावून घेतलं ते हैद्राबादच्या निजामानं आणि त्याहूनही अधिक ते हैद्राबादच्या जनतेनं आणि रेमंडचं बारसं केलं ते मुसाराम, मुसारहिम वगैरे देशी नावांनी! रेमंड हा पेशानं सैनिक, हैद्राबादच्या निजामाच्या फौजेचा सेनापती, सनिकी प्रशासक आणि लष्करी तंत्रज्ञ, निजामाचा आतल्या गोटातला विश्वासू माणूस!

मायकेल जोकीम मारी रेमंडचा जन्म १७५५ सालचा फ्रान्समधील गॅसफनीचा. वडील पेशानं एक सामान्य दुकानदार. मायकेलला लहानपणापासूनच साहसाचं आकर्षण असल्यामुळे जुजबी शिक्षण झाल्यावर वयाच्या विसाव्या वर्षी तो १७७५ मध्ये हिंदुस्थानातील फ्रेंच वसाहत पुद्दुचेरीत दुकान काढण्याच्या इराद्याने आला. मायकेलने पुद्दुचेरीत आपले दुकान थाटून व्यापार सुरू केला. कमाईही उत्तम व्हायला लागली. याच काळात ब्रिटिश आणि फ्रेंच सत्तांमध्ये, भारतावर वर्चस्व स्थापनेसाठी चाललेल्या संघर्षांत ब्रिटिशांची सरशी होण्याची चिन्हे दिसू लागली होती. व्यापारातून मिळणाऱ्या धनदौलतीहून मायकेलला आपल्या देशबांधवांसाठी हिंदुस्थानात ब्रिटिशांशी चाललेल्या लढतीत फ्रेंच सन्याला सहयोग करणे अधिक योग्य वाटले. पुद्दुचेरीतल्या फ्रेंच सन्याचा सेनानी बुसी त्याच्या परिचयाचा होता. बुसीच्या सल्ल्याने मायकेल फ्रेंच सन्यात दाखल झाला एक सामान्य सैनिक म्हणून. परंतु त्यानंतर वर्षभरातच ब्रिटिशांनी फ्रेंचांवर कुरघोडी करून फ्रेंचांचे पुद्दुचेरीतून उच्चाटन केले. पण या वर्षभरात मायकेलने लष्करी प्रशासन, शस्त्रास्त्रांची सखोल माहिती, दारूगोळ्याचे निर्मिती तंत्रज्ञान माहिती करून घेतले. मायकेल पुद्दुचेरी सोडून ब्रिटिशांना आपले शत्रू समजणाऱ्या म्हैसूरच्या हैदरअलीकडे लष्करात दाखल झाला. परंतु काही महिन्यांतच हैदरअलीचा मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा टिपू, म्हैसूर राज्याचा सर्वेसर्वा झाला. त्यानंतर थोडय़ाच दिवसांत काही गोष्टींवर मायकेलचा आणि टिपूचा वाद होऊन त्याच्याशी न पटल्याने मायकेल म्हैसूरची लष्करी नोकरी सोडून हैद्राबादच्या निजामाचा भाऊ बसालत जंग याच्या फौजेत भरती झाला.

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com