‘आपण ऐकलेले स्वर कुठे तरी कोरून ठेवता आले तर किती बरे होईल?’ हा विचार खूप पूर्वीपासून किती तरी जणांच्या मनात येऊन गेला असेल. असेच काहीसे करण्याचे प्रयत्न सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी सुरू झाले. १८५७ साली फ्रेंच संशोधक एदुआर्द लिऑन स्कॉट याने ‘फोनोऑटोग्राफ’ नावाचे साधन तयार केले. ध्वनीची नोंद करणाऱ्या या उपकरणात एका पातळ पटलाला एक जाडसर तंतू जोडलेला होता. हे पटल जेव्हा ध्वनिलहरींमुळे कंप पावायचे, तेव्हा हा तंतू एका सिलिंडरवर गुंडाळलेल्या कागदावरच्या काजळीवर त्या कंपांनुसार रेषा काढायचा. हा सिलिंडर हाताने फिरवण्याची सोय केलेली असे. थोडक्यात, हे उपकरण ध्वनिलहरींचा चढ-उतार दृश्य स्वरूपात दाखवणारा आलेख होता; पण यात आवाज पुन्हा ऐकण्याची काही सोय नव्हती.

यापुढचा टप्पा गाठला तो अमेरिकेतील संशोधक थॉमस एडिसन याने. मात्र, या शोधाचे मूळ वेगळेच होते. तारयंत्रातून किंवा दूरध्वनीतून येणारा संदेश पुन:पुन्हा पाठवता येणारे यंत्र एडिसनला बनवायचे होते. त्यातूनच त्याला हे साधन तयार करण्याची कल्पना सुचली. एदुआर्द स्कॉटने वापरलेल्या साधनाची त्याला माहिती होती. एडिसनने त्यातल्या, सिलिंडरला गुंडाळलेल्या कागदावर काजळीऐवजी पॅराफिनचा लेप दिला आणि त्यावर ध्वनीने निर्माण केलेल्या कंपनांची नोंद केली. त्यामुळे त्याला या कंपनांनी कोरलेल्या रेषांतून पिन फिरवून, या पिनच्या कंपनाचे दुसऱ्या पटलावरील कंपनात आणि पर्यायाने ध्वनीत रूपांतर करणे शक्य झाले. अल्पकाळातच एडिसनने ध्वनीच्या कंपनांच्या नोंदींसाठी कथलाच्या पातळ पत्र्याचा वापर सुरू केला. एडिसनने १८७७ साली आपल्या या ‘बोलणाऱ्या यंत्रा’चे म्हणजे ‘फोनोग्राफ’चे प्रात्यक्षिकही दाखवले.

ध्वनीची कंपने कथलाच्या पत्र्यावर नोंदवणे नाजूक आणि अवघड काम होते. याला ग्रॅहॅम बेलने १८८६ सालच्या सुमारास पर्याय शोधला. त्याने ध्वनीच्या कंपनांची नोंद करण्यासाठी पॅराफिन लिंपलेला कागद वा पत्रा वापरण्याऐवजी मेणाचा सिलिंडर वापरला. या सिलिंडरवर टोकदार सुईने खोल खाच पाडून कंपनाची नोंद केली जात होती. यामुळे

या नोंदींचा टिकाऊपणाही वाढला. कालांतराने अमेरिकी संशोधक एमिल बर्लिनर याने ही कंपने सिलिंडरऐवजी राळेच्या किंवा कडक रबराच्या एका आडव्या तबकडीवर नोंदवायची पद्धत १८८७ च्या सुमारास शोधून काढली आणि स्वर ऐकवण्याचे काम अधिकच सुलभ झाले.

 सुनील सुळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org