आइन्स्टाइनने १९१५ साली व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धान्त मांडला. त्यानंतर आइन्स्टाइनच्या व्यापक सिद्धान्तावर आधारलेले, विश्वरचनेविषयीचे सैद्धांतिक स्वरूपाचे संशोधन सुरू झाले. विश्व हे स्थिर स्वरूपाचे असल्याचा निष्कर्ष सुरुवातीस काहींनी काढला. परंतु अलेक्झांडर फ्रिडमन या रशियन शास्त्रज्ञाचे संशोधन मात्र, विश्व हे प्रसरण पावत असल्याचे दर्शवत होते. विश्वाच्या या प्रसरणाविषयीचा पुरावा एडविन हबल या अमेरिकी खगोलशास्त्रज्ञाच्या संशोधनातून मिळाला.

सर्व दीर्घिकांत ‘सेफिड’ या नावे ओळखले जाणारे तारे आढळतात. या ताऱ्यांची तेजस्विता ठरावीक पद्धतीने बदलत असते आणि या बदलाची वारंवारिता त्या ताऱ्यांच्या मूळ तेजस्वितेवर अवलंबून असते. त्यामुळे अशा ताऱ्यांच्या तेजस्वितेतल्या बदलाची वारंवारिता मोजून त्यावरून त्यांची मूळ तेजस्विता कळू शकते. ताऱ्याची पृथ्वीवरून दिसणारी तेजस्विता मापून या तेजस्वितेची मूळ तेजस्वितेशी तुलना केली की त्या ताऱ्याचे आपल्यापासूनचे अंतर कळू शकते. हबलने एकूण २४ दीर्घिकांतील अशा सेफिड ताऱ्यांचा वेध घेऊन त्यावरून त्या ताऱ्यांचे आणि पर्यायाने त्या दीर्घिकांचे आपल्यापासूनचे अंतर काढले. माउंट विल्सन येथील अडीच मीटर व्यासाच्या दुर्बिणीतून त्याने ही निरीक्षणे केली.

व्हेस्टो स्लिफर या अमेरिकी खगोलशास्त्रज्ञाने लॉवेल वेधशाळेतल्या दुर्बिणीतून विविध दीर्घिकांचे वर्णपट घेतले होते. यातील बहुसंख्य दीर्घिकांच्या वर्णपटांतील विविध रेषा या तांबडय़ा रंगाच्या दिशेने सरकलेल्या त्याला आढळल्या. क्रिस्टियान डॉप्लरच्या नावे ओळखल्या जाणाऱ्या परिणामानुसार, रेषांचे हे विस्थापन या दीर्घिका आपल्यापासून दूर जात असल्याचे दर्शवत होते. हे विस्थापन जितके अधिक, तितकी ती दीर्घिका आपल्यापासून अधिक वेगाने दूर जात असते. या विस्थापनांवरून स्लिफरने या दीर्घिकांच्या वेगाचे गणित मांडले. हबलने, स्वत: काढलेली या दीर्घिकांची आपल्यापासूनची अंतरे आणि स्लिफरने काढलेले त्यांचे वेग अभ्यासून- सर्व दीर्घिका आपल्यापासून दूर जात असल्याचा निष्कर्ष काढला. दीर्घिकांचे हे दूर जाणे, विश्व प्रसरण पावत असल्याचे दर्शवत होते! हबलने विश्वाच्या प्रसरणाचा वेग गणिती नियमाच्या स्वरूपात मांडून १९२९ साली हे संशोधन ‘प्रोसीडिंग्ज् ऑफ नॅशनल अ‍ॅकॅडेमी ऑफ सायन्सेस्’ या नियतकालिकात प्रसिद्ध केले. याच सुमारास जॉर्जेस लेमाइटर या बेल्जियन शास्त्रज्ञानेही याच प्रकारचे संशोधन केल्याने विश्वाच्या प्रसरणाच्या या नियमाला ‘हबल-लेमाइटर नियम’ या नावे ओळखले जाते.

 डॉ. वर्षां चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org