माणसं ही त्यांच्यामध्ये असलेल्या बुद्धिमत्ता आणि लहानपणापासून मिळणारे अनुभव यांच्या आधारे घडत जातात. प्रत्येकामध्ये दोन ते तीन बुद्धिमत्ता या प्राधान्यक्रमाने असतात. काही मध्यम स्वरूपाच्या तर काही फारच कमी प्रमाणात  असतात. काही उदाहरणांवरून हे स्पष्ट होतं. रवींद्रनाथ टागोर लहान असताना त्यांना शाळेत जायला अजिबात आवडायचं नाही.  आपल्या पोराला शाळेत त्याच्या मनाविरुद्ध दामटून पाठवायचं हे त्यांच्या वडिलांच्या प्रगल्भ मनाला पटलं नाही.  ते त्याला घेऊन एका निसर्गरम्य ठिकाणी गेले. दिवसातला काही काळ ते त्याला झाडाखाली, झऱ्याकाठी बसवून औपचारिक विषयांचं शिक्षण द्यायचे, तर उरलेला संपूर्ण वेळ रवींद्रनाथ निसर्गात, हवा तसा घालवायचे. या वातावरणाचा फारच सखोल परिणाम रवींद्रनाथांच्या मनावर झाला. त्यांचं रवींद्र संगीत हे निसर्गाच्या खूप जवळ जाणारं आहे. निसर्ग आणि मानवी स्वभाव यांच्या संदर्भातल्या कविता प्रसिद्ध आहेत. त्यासाठी संगीतविषयक बुद्धिमत्ता, व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता आणि भाषिक बुद्धिमत्ता यांचा संगम रवींद्रनाथांमध्ये दिसून येतो.

अल्बर्ट आइनस्टाइन. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ. बुद्धिमत्तेचं सर्वमान्य प्रतीक. सापेक्षतेचा फार महत्त्वाचा आणि मूलभूत सिद्धांत त्यांनी मांडला.

पण लहानपणी अभ्यासाची पुरेपूर बोंब होती. ‘तू आयुष्यात पुढे काहीच करू शकणार नाहीस,’  असं त्यांची शिक्षिका म्हणाली होती. अखेर एक दिवस त्यांनी शाळा सोडून दिली. आई-वडिलांची काळजी फारच वाढली. शाळेचं शिक्षण त्याला पूर्ण करता आलं नाही. अखेर झुरिच पॉलिटेक्निक ही संस्था प्रवेशपरीक्षेच्या गुणांवर प्रवेश द्यायची. या परीक्षेत गणित- विज्ञानात चांगले गुण मिळाले. बंद पडलेलं शिक्षण पुन्हा चालू झालं. पुढे शिक्षणात कधीच खंड पडला नाही. स्वत:त रमण्याची सवय आणि प्रयोगशील स्वभाव असल्यामुळे ते पुढे मोठे शास्त्रज्ञ झाले. गणिती, दृश्य – अवकाशीय आणि व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता यामुळे हे घडलं असणार.

कॅप्टन कूल धोनी हा खेळाडू आहे. गणिताच्या साहाय्याने तो खेळतो. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या मनोरचनेचा अभ्यास करून तो डावपेच आखतो. याचा अर्थ त्याच्यामध्ये शरीर- स्नायूविषयक बुद्धिमत्ता, गणिती-तार्किक आणि व्यक्तीअंतर्गत या बुद्धिमत्ता असणार. डॉ. गार्डनर म्हणतात त्याप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकाचा बुद्धिमत्तांचा एक सेट असतो, तो शोधायला हवा.

श्रुती पानसे contact@shrutipanse.com