छायाचित्रणाची ज्याला सुरुवात म्हणता येईल अशी प्रक्रिया १७१७ साली योहान शुल्झ या जर्मन प्राध्यापकाने शोधली. यासाठी त्याने चांदीच्या क्षारांचा वापर केला. चांदीचे क्षार हे सूर्यप्रकाशात काळवंडतात. शुल्झने खडूची भुकटी आणि सिल्व्हर नायट्रेट यांचे मिश्रण सपाट पृष्ठभागावर पसरवून त्यावर अक्षरे कापलेला कागद ठेवला. थोडय़ाच वेळात अक्षरांच्या मोकळ्या जागांतून प्रकाश आत शिरून, तेवढाच भाग काळवंडून अक्षरांची निर्मिती झाली. मात्र या प्रक्रियेद्वारे मिळालेली प्रतिमा काही काळानंतर पूर्णपणे काळवंडत होती.

टिकाऊ  प्रतिमा मिळवण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न फ्रान्सच्या जोझेफ निप्स याने यानंतर एका शतकानंतर केला. १८२६-२७ साली केलेल्या प्रयोगात त्याने यासाठी ‘बिटय़ुमेन ऑफ जुडिआ’ हे सूर्यप्रकाशात घट्ट होणारे डांबर वापरले. निप्स याने धातूच्या प्लेटवर डांबर आणि लव्हेंडरच्या तेलाच्या मिश्रणाचा लेप दिला व हे डांबर वाळू दिले. त्यानंतर ही प्लेट त्याने एका पिनहोल कॅमेऱ्यात बसवली. या प्लेटवर त्याने सुमारे आठ तासांसाठी बाहेरच्या दृश्याची प्रतिमा पडू दिली. यामुळे डांबराचा अधिक प्रकाशित झालेला भाग घट्ट झाला. यानंतर त्याने घट्ट न झालेले डांबर सेंद्रिय द्रावणाने धुऊन टाकले. आता मागे राहिली ती या बाहेरच्या दृश्याची प्रतिमा. हे होते पहिलेवहिले छायाचित्र!

सन १८३९ मध्ये फ्रान्सच्या लुई डॅग्येने टिकाऊ  छायाचित्रांसाठी पुन्हा चांदीच्याच क्षारांवर आधारलेली प्रक्रिया शोधून काढली. त्याने चांदीचा लेप दिलेल्या एका तांब्याच्या प्लेटवर आयोडिनच्या वाफेचा थर देऊन सिल्व्हर आयोडाइडची निर्मिती केली. त्यानंतर या प्लेटवर पीनहोल कॅमेऱ्याद्वारे हव्या त्या दृश्याची प्रतिमा पाडली. या प्रतिमेतील प्रकाशित भागातील सिल्व्हर आयोडाइडचे रूपांतर चांदीच्या धातूत झाले. त्यानंतर त्याने सोडियम क्लोराइडच्या तीव्र द्रावणाने उर्वरित सिल्व्हर आयोडाइड धुऊन टाकले. पाऱ्याच्या वाफांच्या साहाय्याने प्लेटवरील चांदीचे मिश्रधातूत रूपांतर केल्यावर छायाचित्राची निर्मिती झाली. या प्रक्रियेत कॅमेऱ्याच्या वापराचा कालावधी आठ तासांवरून फक्त अर्ध्या तासावर आला. ‘डॅग्युरिओटाइप’ या नावे ओळखली गेलेली ही चित्रे अधिक टिकाऊही होती. यानंतर अल्पकाळातच जॉन हर्शेल याने चांदीचे क्षार धुऊन काढण्यासाठी सोडियम थायोसल्फेट (हायपो) या रसायनाचा उपयोग केला. त्यामुळे छायाचित्रातील प्रतिमा प्रदीर्घ काळासाठी टिकून राहू लागल्या आणि छायाचित्रणाची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू झाली.

सुनील सुळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org