नोकरीनिमित्ताने मंगळुरूत असणारा सचिन, परवडत असूनही, मुंबईला जाण्यासाठी विमान प्रवास टाळतो. कारण त्याला विमान अपघातातील मृत्यूची भीती वाटते. इथे प्रश्न असा उद्भवतो की, भारतात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मोटारगाडीने जाणे सुरक्षित की विमानाने? याचे उत्तर, दोन प्रकारच्या प्रवासांतील अपघाती मृत्यूंच्या संभाव्यतेची तुलना करून

मिळू शकेल. उपलब्ध आकडेवारीनुसार, व्यावसायिक विमान कंपनीच्या विमान-प्रवासात मृत्यू होण्याची संभाव्यता एक दशलक्ष माणसांमागे एक, म्हणजे १/१०,००,००० = ०.०००००१; तर मोटारगाडीच्या प्रवासात तसे होण्याची संभाव्यता एक लाख माणसांत ११ आहे म्हणजे, संभाव्यता ११/१,००,००० = ०.०००११ अशी आहे. याचा अर्थ, मोटारगाडीच्या प्रवासातील मृत्यूची संभाव्यता, विमान-प्रवासातील मृत्यूच्या संभाव्यतेच्या ११० पट अधिक आहे. यावरून, भारतात मोटारगाडीचा प्रवास विमानप्रवासाहून अधिक धोकादायक आहे! या उदाहरणात, सांख्यिकीला संभाव्यताशास्त्राची जोड दिल्यामुळे, प्रश्नाचे निश्चित उत्तर कसे मिळाले ते दिसत आहे.

संभाव्यताशास्त्रात संधीचा किंवा शक्यतेचा अभ्यास होतो. तर सांख्यिकीत विदा (डेटा) कोणत्या पद्धतीने गोळा करावी आणि कशी हाताळावी, याचा विचार होतो. संभाव्यताशास्त्र आणि सांख्यिकीच्या उत्कृष्ट मेळामुळे संख्याशास्त्रात उपयुक्त विदा विश्लेषण शक्य होते.

विशाल विदासंचांचे विश्लेषणही सांख्यिकीच्या मदतीने करता येते. निवडलेली विदा जर खरोखरीच प्रातिनिधिक नमुना असेल, तर त्यावरून संपूर्ण लोकसंख्येचे भाकीत संभाव्यताशास्त्राच्या मदतीने करता येते. एकुणात, एखाद्या घटनेचा भूतकाळ किंवा वर्तमान समजून घ्यायला सांख्यिकी उपयुक्त ठरते. तसेच सांख्यिकीमुळे मिळालेली माहिती वापरून संभाव्यताशास्त्र भविष्याचा वस्तुनिष्ठपणे वेध घ्यायला मदत करते. विदाविज्ञान या नवीन क्षेत्राच्या पायाभरणीत संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावतात.

सध्या कोविड-१९ च्या संदर्भात विविध पातळ्यांवर दररोज बाधित, बरे झालेले, मृत्यू पावलेले रुग्ण यांची माहिती गोळा होत आहे. या माहितीचे सांख्यिकी विश्लेषण योग्य प्रतिमाने वापरून करताना, त्यांत संभाव्यताशास्त्रही वापरले जात आहे. त्यामुळे रोगासंदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळवून रोगप्रसाराबद्दलचे भाकीत करता आल्याने, स्थानिक प्रशासनाला रुग्णसेवेचे नियोजन सतर्कतेने करणे शक्य झाले. कोविड-१९ चा बंदोबस्त करण्यासाठी लस तयार करण्याच्या आणि तपासण्याच्या प्रयत्नांतही सांख्यिकी आणि संभाव्यताशास्त्र यांचे मार्गदर्शन मिळत आहे. आव्हाने पेलण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णयांची अंमलबजावणी नेहमीच फायद्याची ठरते. त्यामुळे संभाव्यताशास्त्र आणि संख्याशास्त्र अभ्यासून, आपण आपले वागणे व जीवनशैली यांच्यातील जोखीम जर जाणून घेतली, तर हे जग आपल्याला जगण्यायोग्य ठेवता येईल. – डॉ. विद्या ना. वाडदेकर

 

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org