डॉ. श्रुती पानसे  contact@shrutipanse.com

विल्यम ग्रीनफ नावाच्या शास्त्रज्ञाने केलेल्या एका प्रयोगाची ही गोष्ट. त्याने उंदरांवर एक वेगळाच प्रयोग केला. दोन मोठे पिंजरे घेतले. दोन्हीत वेगवेगळ्या उंदरांना ठेवलं. एका पिंजऱ्यात खेळण्यासाठी भरपूर साधनं ठेवली. काही दिवसांनी जुनी खेळणी बदलून नवीनवी खेळणी ठेवली. दुसऱ्या पिंजऱ्यात मात्र कोणतीच खेळणी ठेवली नाहीत.

याचा परिणाम असा झाला की ज्यांना खेळायला मिळालं, नव्या नव्या खेळण्यांशी खेळताना ज्यांना आपलं डोकं चालवावं लागलं, त्यांच्या मेंदूत खूपच चांगले बदल घडले होते.

परंतु ज्यांना खेळायला खेळ नव्हते, अतिशय कंटाळवाणं वातावरण होतं. त्यांच्या मेंदूत काहीही बदल झाला नाही. ते काहीही नवीन शिकले नाहीत. त्यांनी खूपच कमी हालचाल केली, त्यांच्यासमोर कधीही कोणताही खेळ खेळण्याचं आव्हान नव्हतं. त्यांना कधीही डोकं चालवावं लागलं नाही. यामुळे असं घडलं.

जे उंदरांच्या बाबतीत घडतं, तेच आपल्या मेंदूच्या वाढीबद्दलही घडतं. म्हणून जर आपल्याला आपला मेंदू सशक्त आणि तरतरीत करायचा असेल तर खेळणाऱ्या उंदराप्रमाणे वागायला हवे, म्हणजेच वेगवेगळ्या गोष्टी करून सतत डोक्याला चालना द्यायला हवी. कोडी सोडवणं हा एक चांगला व्यायाम समजला जातो. ती देखील वेगवेगळ्या प्रकारची हवीत. किंवा मुद्दाम अवघड गोष्टी करायला हव्यात. अवघड गणितं सोडवायची. ते शिकायचे असल्यामुळे मेंदूला आव्हान मिळतं. मेंदू शिकण्यात गुंतला पाहिजे. मेंदूसमोर जितक्या अवघड गोष्टी आपण ठेवू त्यातून तो शिकत जाईल.

आपण काय करतो? नेमकं याच्याविरुद्ध करतो.

सोप्या सोप्या गोष्टी करत राहतो. अवघड गोष्टींना घाबरतो. सतत कोणाची तरी मदत मागतो. त्यापेक्षा आपलं आपण करावं. खेळताना, अभ्यास करताना अंधाऱ्या, उदास, कोंदट जागेपेक्षा मोकळ्या वातावरणात जा. ‘अमुक एक गोष्ट मला जमतच नाही, जमणारच नाही’ असं म्हणू नका. जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत जमेल की नाही, हे कसं कळणार? खूप खूप वेळा एकाच जागी जखडल्यासारखे बसून राहू नका.

यातल्या जेवढय़ा गोष्टी जमतील तेवढय़ा करा. नाहीतर त्या दुसऱ्या पिंजऱ्यातल्या उंदरासारखं होईल.