06 March 2021

News Flash

कुतूहल : नागदरवाडीची गोष्ट

पिण्याच्या पाण्याची समस्या बऱ्याचदा मानवनिर्मित असते. २०० ते ३०० मिलिमीटर पाऊस पडत नाही असा भाग महाराष्ट्रात फार थोडा असेल. परंतु पुरेसा पाऊस पडूनही त्याची साठवण

| April 23, 2013 12:55 pm

पिण्याच्या पाण्याची समस्या बऱ्याचदा मानवनिर्मित असते. २०० ते ३०० मिलिमीटर पाऊस पडत नाही असा भाग महाराष्ट्रात फार थोडा असेल. परंतु पुरेसा पाऊस पडूनही त्याची साठवण आपण करत नाही. धावणारे पाणी, त्याला धावण्याऐवजी रांगायला लावून ते जिरवले पाहिजे. त्यासाठी त्या भागात राहणाऱ्यांनी पावसाचे स्वरूप समजून घेऊन कृती केली पाहिजे.
नांदेड जिल्ह्यातील नागदरवाडी या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई अन्य हजारो गावांसारखीच होती. डोंगराळ भाग, मुरमाड जमीन, ओसाड प्रदेश, झाडी नाही, उतारामुळे पडणारा पाऊसही वाहून निघून जायचा. त्यामुळे विहिरी कोरडय़ा पडायच्या. जानेवारी महिन्यापासूनच गाव टँकरवर अवलंबून असे. टँकर आला की गावकरी हातातील काम सोडून पळत.
सगरोळीच्या संस्कृती संवर्धन मंडळाने पुढाकार घेऊन या गावात ग्रामसभा घेतली. गावकऱ्यांनी पाणलोट क्षेत्र विकासाच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार केला. १९९९ मध्ये इंडो-जर्मन प्रकल्पामधून हनुमंत केंद्रे या स्थानिक तरुणाच्या नेतृत्वाखाली दोनशे हेक्टर जमिनीवर जल व माती संधारणाची कामे सुरू झाली. पावसाचे पाणी अडविण्यासाठी या डोंगराळ भागात सम पातळी चर, मातीचे बांध व सिंमेंटचे बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे धो-धो वाहून जाणारे पाणी अधिक काळ पाणलोट क्षेत्रात थांबून भूगर्भात जिरायला सुरुवात झाली.
नागदरवाडीत २०० मिलिमीटर इतका कमी पाऊस होतो आणि त्यापकी फक्त ५० टक्के पाऊस जरी अडवला तरी दहा लाख घनमीटर इतका प्रचंड पाणीसाठा निर्माण होऊ शकतो. २००५ पर्यंत क्रमाक्रमाने या गावात १००० हेक्टरवर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे होत गेली. सिमेंटचे २२ बंधारे व मातीचे तीन बंधारे बांधण्यात आले. परिणामी कोरडय़ा विहिरींना भरपूर पाणी उपलब्ध झाले. मार्चच्या कडक उन्हातही गावात भरपूर पाणी आले.
  नागदरवाडी आता शेजारच्या दोन गावांनाही आपल्या विहिरीतून पाणीपुरवठा करीत आहे. गावकऱ्यांनी पाच लाख झाडे लावली आहेत. त्यामुळे सरपणाचीही सोय झाली आहे. पाणी ही विकासाची किल्ली आहे. म्हणजे पाठोपाठ रस्ते, वीज, नळ आले. गावाचे नाव मोठे झाले.
-उपेंद्र कुलकर्णी (नांदेड)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..:     भन्नाट स्त्रिया
मला ज्यांनी ज्योतिषशास्त्राचे धडे दिले त्या बाई हल्लीच भेटल्या. त्या म्हणत होत्या हल्ली ज्योतिष सांगणे फार अवघड झाले आहे. पुण्यासारख्या शहरात आपल्या समाजातल्या लग्न झालेल्या पन्नाशीच्या बायका दुसरीच्या नवऱ्याबरोबर मौजमजा करतात आणि तो पुरुष बायकोला सोडायला तयार नसला तर कुंडली घेऊन काही योग आहे का विचारतात. तेच तरुण मुलींचे. तिशीतल्या या मुली कमावत्या. सेक्स काय सहज शक्य आहे. त्यासाठी लग्न करायला सांगू नका, असे बजावतात. बाकी भविष्य काय आहे ते सांगा असे म्हणतात. या बाई सर्द झाल्या होत्या. Loose morals  किंवा चालूपणाबद्दल आमच्या शास्त्रात संकेत आहेत, पण इथे तर सगळ्याच कुंडल्या चालू पडल्या आहेत म्हणाल्या. मी त्यांना म्हटले, आगामी घटनांची चाहूल पहिल्यांदा पुण्यात लागते हे काही खोटे नाही.
 बायका भन्नाट असणे याला आपल्याकडे इतिहास आहे. महाभारत खरेतर सत्यवतीची गोष्ट आहे. ही कोळ्यांची मुलगी कुमारी माता होती. मुलाचे नाव व्यास. मग हिने शंतनूला भुलवले त्यातून झालेल्या विचित्रवीर्याला बायका आणण्याचे काम हिने भीष्मावर सोपविले. काही व्हायच्या आधी विचित्रवीर्य गेला, तेव्हा पुढच्या पिढीसाठी तिने व्यासाला आपल्या मुलाला पाचारण केले. त्या वेळी एक भीतीने पांढरी फट्ट पडली म्हणून पंडू (पांढरा) जन्माला आला. शापामुळे तो संग करू शकत नसे. त्याची बायको कुंती भोजराजाची दत्तक कन्या हिला दुर्वासाने एक वर दिला होता. राहवले नाही म्हणून तिने तो सूर्यावर वापरला तेव्हा ती आजेसासू बाईसारखी कुमारी माता झाली. पुढे नैसर्गिकरीत्या शक्य नाही म्हणून हिने नियोगाने (म्हणजे काय?) पुत्र प्राप्ती करून घेतली. मुलांच्या बायकोला बघायच्या आधीच तिला वाटून घ्या सांगणारी हीच. द्रौपदी झाली कशी तर द्रुपदाला मुले होत नव्हती म्हणून त्याने यज्ञ करून अग्नीला निमंत्रण दिले आणि त्या अग्नीमुळे मुले झाली (कुणाला?).  भीमाने हिडिंब नावाच्या राक्षसाला मारले. त्याची बहीण हिडिंबा. आपल्या भावाच्या मारेकऱ्याच्या शक्तीवर ही भाळली. भीमाला माझ्याशी लग्न कर म्हणू लागली. तेव्हा कुंतीने भुवया चढविल्या. तेव्हा ती म्हणाली यांच्यापासून मला गर्भ हवा आहे. जर गर्भ धरला तर मी भीमाला आणि तुम्हाला मोकळे करीन. उत्तरेत मनालीनजीक रानावनात हिडिंबेचे देऊळ आहे ते मी बघितले. तेव्हा तेथे चार-पाच हिप्पी परदेशी बायका पूजेसारखे काहीतरी करीत होत्या. भन्नाट बायकांनो आगे बढो आणि सर्वात महत्त्वाचे येनकेन प्रकारेण ‘सुखी राहा’ पण कट कट करू नका!
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस : तोंड येणे : मुखपाक भाग -२
मुखपाक विकार हा नव्यानेच उद्भवला असल्यास जिभेचा वरचा, खालचा भाग, गालाची आतील बाजू, टाळा, घसा येथे लाली किंवा फोड आहेत का हे पहावे. मलप्रवृत्ती साफ नसल्यास रिकाम्या पोटी; पोट तपासावे. सार्वदेहिक उष्णता वाढली आहे का? हे बघण्याकरिता, डोळे लाल आहेत का, हे तपासावे. त्वचेची स्निग्धता, रुक्षता याकरिता लक्ष द्यावे. या विकारात सामान्यपणे जिभेच्या खाली, वर लाली किंवा फोड आलेले असतात. रुग्णाला किंचितही तिखट, आंबट, खारट पदार्थ सहन होत नाहीत. घश्याशी, गळ्याशी आग होत असते. मलावरोध, संडासच्या जागची आग अशी ही लक्षणे असतात.
या विकारात कारणे रुग्णाला माहीत असणारी असतात. वैद्यकीय चिकित्सकांनी या कारणांबद्दल विचारून रुग्णाला ‘म्हणून हे घडले’; अशी जाणीव करून देणे आवश्यक असते. १) खूप तिखट, आंबट, खारट, उष्ण, तीक्ष्ण पदार्थ खाणे. २) चहा, लोणची, पापड, लिंबू, दही, मीठ, अंडी, मांसाहार यांचा सातत्याने व अतिरेकी वापर. ३) आहारात स्निग्ध व मधुररस प्रधान पदार्थाचा अभाव . ४) चुकीची औषधे. विशेषत: ताप, सर्दी, दमा, पोटदुखी या तक्रारींकरिता ‘पेन किलर’ (वेदनानाशक) उगाचच नेहमी घेत रहाणे. ५) कृमी, जंत. ६) जागरण, चिंता, उशिरा जेवण, कमी जेवण ७) दारू, सिगारेट, तंबाखू, मशेरी अशी व्यसने इ. इ.
तिखट, आंबट, खारट हे पदार्थ वज्र्य करून निव्वळ दूध पोळी, दूध भाकरी, दूध भात या आहारामुळे बरे वाटते का? हे निश्चित करावे. त्यामुळे पित्त कमी करणारी औषधे देऊन तुरन्त आराम मिळवता येतो. एक दिवस पूर्णपणे दुग्धाहारावर राहून तोंड कमी होते का? हे पाहावे. दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, कोहळा यांच्या उकडलेल्या फोडी भरपूर खाव्या. शक्य असल्यास एक दिवस फक्त गाईचे दूध, ज्वारीची भाकरी, उकडलेले मूग व काळ्या चांगल्या दज्र्याच्या मनुका असा आहार ठेवावा. कटाक्षाने ऊन टाळावे. झोपताना गरम दुधात चांगले तूप मिसळून घ्यावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २३ एप्रिल
१८५८ > ‘स्त्रीधर्मनीती’ हे पुस्तक वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी लिहून स्त्रीदास्यवादी धर्मकल्पनांचा समाचार घेणाऱ्या पंडिता रमाबाई यांचा जन्म. त्या मूळच्या रमा अनंतशास्त्री डोंगरे. कोलकात्यात ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ ठरल्यावर विनोदबिहारी मेधावींशी आंतरजातीय विवाह, पतीचे अल्पकाळात निधन अशा घटनांनंतर त्यांनी ब्रिटनला प्रयाण केले. तेथे बायबलसह अन्य धर्मशास्त्रे त्या शिकल्या आणि पुढे ख्रिस्ती धर्म स्वीकारूनही ‘बिशप वा अन्य धर्मगुरूंचे सल्ले मी मानणार नाही’ असे म्हणण्याची हिंमत दाखवून त्यांनी मुक्तीचा मार्ग कायम ठेवला. त्यांची अन्य पाचही मराठी पुस्तके ख्रिस्ती धर्मविषयक आहेत, त्यात बायबलच्या मूळ हिब्रू व ग्रीकमधून मराठीत केलेल्या भाषांतराचा समावेश आहे.
१९१३ > डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे साधार, साकल्याने तयार केलेले चरित्रग्रंथ इंग्रजीत लिहिणारे थोर चरित्रकार धनंजय कीर यांचा जन्म. मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्यातील नोकरी सांभाळून त्यांनी चरित्रसंशोधनाचे मोठे काम केले. पुढे सर्व वेळ याच कामासाठी देऊन एकंदर १२ थोरांची विश्वासार्ह चरित्रे लिहिली. ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ हे आत्मचरित्रही कीर यांनी लिहिले!
– संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2013 12:55 pm

Web Title: story of nagdarwadi
Next Stories
1 कुतूहल : रंगवासा जैविक ग्राम संस्था
2 कुतूहल -संकवके (मायकोरायझा)
3 कुतूहल – आपला आहार आरोग्यदायी आहे का?
Just Now!
X