मोठय़ा कारखान्यातील किंवा प्रयोगशाळेतील साहित्यापासून ते अगदी घरच्या तव्यापर्यंत सर्वत्र वापरले जाणारे टेफ्लॉन म्हणजे प्लास्टिकच्याच प्रकारातले एक बहुवारिक आहे. पीटीएफई (पॉली टेट्रा फ्लुओरो इथिलिन) हे रासायनिक नाव असणाऱ्या या प्लास्टिकचा शोध अपघातानेच लागला. १९३० च्या दशकात, अमेरिकेतील डय़ुपॉण्ट या कंपनीतील रॉय प्लंकेट हा पदार्थ थंड करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शीतकांवर (रेफ्रिजरंट) संशोधन करत होता. ही शीतके फ्लुओरिन आणि क्लोरिन यांपासून बनलेल्या फ्रिऑन गटातील होती. याच गटातील नवी शीतके बनवण्यासाठी प्लंकेट टीएफई (टेट्रा फ्लुओरो इथिलिन) या वायूची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर होणारी रासायनिक अभिक्रिया अभ्यासत होता. यासाठी त्याने टीएफई वायूची निर्मिती करून तो वायू वेगवेगळ्या सिलिंडरमध्ये भरून ठेवला. कॅनमधला दाब कमी राखण्यासाठी हे कॅन सुक्या बर्फाच्या पेटय़ांत ठेवले होते.

हे प्रयोग चालू असताना एक दिवस, हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया घडवण्यासाठी त्याने नेहमीप्रमाणेच टीएफईच्या सिलिंडरची झडप उघडली. मात्र झडप पूर्ण उघडूनही टीएफई वायू काही बाहेर येईना. सिलिंडर तर पूर्ण भरलेला असल्याचे त्याच्या वजनावरून स्पष्ट होत होते. कचरा अडकल्यामुळे झडप बंद झाली असल्यास, तो साफ करण्यासाठी झडपेत तार घालून पाहण्यात आली. परंतु झडप मोकळी होती. त्यानंतर प्लंकेटने सिलिंडरची झडप काढून टाकली व सिलिंडर उलटा करून जोरात हलवला. सिलिंडरमधून पांढऱ्या रंगाची भुकटी खाली पडली. प्लंकेटला शंका आली, टीएफई वायूचे रेणू एकमेकांना जोडले जाऊन बहुवारिक तर निर्माण झाले नसावे?

प्लंकेटने आता अधिक निरीक्षणासाठी हा सिलिंडर कापून काढला. सिलिंडरच्या आतल्या बाजूस पांढरा थर जमा झाला होता. या पदार्थावर पाणी, तीव्र आम्ले, अल्कली, सेंद्रिय द्रावके अशा कोणत्याही रसायनाचा परिणाम होत नसल्याचे त्याला दिसून आले. या पदार्थाला उष्णतेच्या साहाय्याने प्लास्टिकप्रमाणेच हवा तो आकार देता येत होता. या पदार्थाला वंगणाचेही गुणधर्म होते. रासायनिकदृष्टय़ा अत्यंत स्थिर असणारा, प्लास्टिकच्या स्वरूपातील एक नवा पदार्थ निर्माण झाला होता. सिलिंडरमधील दाब आणि तापमान यांचे गणित जुळल्यामुळे या बहुवारिकाची निर्मिती झाली होती. कालांतराने या पदार्थाची नियंत्रित पद्धतीने पुनíनर्मिती करण्यात प्लंकेटला यश आले व भविष्यात बहुपयोगी ठरणारा हा पदार्थ ‘टेफ्लॉन’ या नावाने १९३९ साली बाजारात आला.

– डॉ. राजीव चिटणीस मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org